श्री शंकराचार्य वंदना - अध्याय बारावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.

जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
आशीर्वाद गुरुंचे घेऊनि । काशी गाठी नर्मदा सोडूनि । अनुभग लाभला यात्रेतुनि । वर्णीला मागील अध्यायी ॥२॥
विश्वेश्वराचे दर्शन घेणे । भावे भवानिसी विनवणे । भोवती जे घडे ते पाहणे । त्रिकाल गंगास्नान ॥३॥
हाच नेम श्री शंकराचार्यांचा । काशीस येता सुरु झाला । वरपांगी सर्वांना विरंगुळा । प्रवासा अन्ती प्राप्त झाला ॥४॥
आचार्यांना एकच ध्यास । प्रसन्न होवो शूलपाणी । भिक्षा देवो आई भवावी । वैराग्य आणि ज्ञानाची ॥५॥
सर्व शिष्य भक्तांसाठी । करिती श्रद्धेने अनुष्ठान । घाटावर चाले प्रवचन । नित्य गंगेसाठी अध्ययन ॥६॥
श्रवणार्थ जमति जिज्ञासु । शिष्यभावाने ज्ञानपिपासु । संन्यासदीक्षेस्तव मुमुक्षु । नित्य शंकराभोवती ॥७॥
सर्वांचे करिती समाधान । वेदान्तविचारी नसावे न्यून । त्यासाठी सतत चिंतन । आणि चाले आत्मशोध ॥८॥
जैसा विचार तैसाचि आचार । हाच शुद्ध व्यवहार । वेदान्ताचा करण्या प्रसार । आचार्य पाळिती निष्ठेने ॥९॥
निर्वाणषट्काचे अंतरंग । अनुभविले जे गुरुकृपेने । लोकांपर्यंत यथार्थपणे । कैसे केव्हां पोचेल ? ॥१०॥
प्रत्येकाचे स्वस्वरूप । तेथे नाही जातिभेद । ऐसे सांगति चारी वेद । कैसे पटावे सर्वांस ? ॥११॥
एके दिवशी शिष्यभक्तांसह । मनी हाच विचार करीत । गर्दीतून वाट काढीत । निघाले विश्वेश्वर दर्शना ॥१२॥
आधीच वाट लहान । जा ये करिती थोर सान । शिवाशिवाचे राखीत भान । सर्वांची चालली लगबग ॥१३॥
दिसतां आचार्यांचा जथा । वाट देती आदरुन । दूर होती आपण होऊन । भाविक भक्त इतर जन ॥१४॥
मार्गांत एका बोळापाशी । चार कुत्री हाती धरुन । एक चांडाळ वाट अडवून । उभा दिसे शांत रीति ॥१५॥
रुढीस धरुनि आचार्य । म्हणति, चांडाळा, होई दूर । शब्द येती कानावर । परी वाट सोडेना ॥१६॥
उच्चस्वरे सांगे शंकर । “ मार्ग माझा मोकळा कर । चांडाळ तूं दूर सर । दूर सर, दूर सर ” ॥१७॥
न करता वाट मोकळी । चांडाळ पुसे शंकरासि । “ कोणास दूर सर म्हणसि । सांग जरा समजावुनि ॥१८॥
मी अज्ञानी चांडाळ । न समजे हा भेदाचा खेळ । तुझा माझा कां नाही मेळ । सांग कैसे व्हावे दूर ॥१९॥
तुझ्या माझ्या देहात । फरक कोणता निश्चित । अन्नच असते ना पोशित । अस्थिमांसमय देह आपुले ॥२०॥
आहे जर सर्वत्र एक । चेतविणारे चैतन्य । मग कां करणे दोघा भिन्न । कोण शिव कोण अशिव ? ” ॥२१॥
ऐकतां प्रश्न चांडाळाचे । सर्वजण भांबावले । म्हणति हे चांडाळ माजले । कैसे प्रश्न हे उर्मट ॥२२॥
परी आचार्य मनी उमजले । वेदान्ताचे मर्म सगळे । चांडाळमुखे स्पष्ट झाले । अंतर्यामीचा शिव प्रकटला ॥२३॥
धावुनि धरती चरण । चांडाळास जाती शरण । म्हणती गुरुसमान आपण । सर्वांसमक्ष दिधला बोध ॥२४॥
‘ देहाच्या बाह्य उपाधिमुळे । अज्ञाने भेदाभेद सगळे । जीवाने व्यर्थ हे कल्पिले । अंतर्यामी एकचि शिव ॥२५॥
हे तत्व ज्यासी कळले । कोणतेहि जाति लिंग असले । त्याची मी वंदीन पाऊले । मजसि तो गुरुसमान ॥२६॥
या घटनेचा मूळ भाव । अद्वैत तत्वाचा अनुभव । मनी राखावा सद्भाव । र्तरीच मिळेल खरी वाट ’ ॥२७॥
संतोषे हासे चांडाळ । शंकरास उठवी आलिंगून । बघता बघता गेला मिसळूण । गर्दीत कोठे दिसेना ॥२८॥
लोक पुसती “ काय घडले । स्पृश्यास्पृश्यतेचे बंधन ढिले । सर्वांसमक्ष आपणचि केले । काय कारण सांगावे ” ॥२९॥
आचार्य सांगती सर्वास । रचुनि मनीषापंचक स्तोत्रास । विसरावे बाह्य रुपास । जरी जाणणे सत्य रुप ॥३०॥
सामान्यास पटावे तत्व । म्हणति प्रकटले महादेव । घेऊनि अमंघळ चांडाळ भाव । कृपा करण्या सर्वांवरी ॥३१॥
अरे अहिंसेचे माजवून बंड । बौद्ध मतवाद्यांचा अहंगंड । अस्पृश्यतेचे निर्मि पाखंड । मांसाहारी जना ठेवी दूर ॥३२॥
करिता खोल विचार । माणसापासून माणून दूर । करणारी रुढी क्रूर । हळूंहळूं सर्वत्र फैलावली ॥३३॥
अस्पृश्यता व्हावी अमान्य । जाणावे अंतरीचे चैतन्य । मोडावी रुढी अज्ञानजन्य । म्हणुनि प्रकटले विश्वेश्वर ॥३४॥
घेऊनि विश्वेश्वराचे दर्शन । आपापल्या मार्गे जाती जन । अंतरी घुमे आचार्य वचन । भेदाभेद अमंगल ॥३५॥
शंकराचार्य मनी प्रसन्न । गैररुढींचे करण्या खंडन । कोणत्याहि रुपे भगवान । होईल मज सहाय्यवान ॥३६॥
ऐसे मनोरम प्रसंग । काशीक्षेत्री घडले कित्येक । परी त्यातील प्रत्येक । प्रकटवी वैदिक धर्म ॥३७॥
किती काळ गेला काशीत । प्रकटति सप्तरंग जीवनात । कैसे होई कार्य वृद्धिंगत । जाणावे पुढील अध्यायी ॥३८॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । बारावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥३९॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP