श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सातवा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र
जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
ब्रह्मचर्याश्रमीचे जीवन । शंकराचे झाले परिपूर्ण । सकलास आदर्श उदाहर्ण । वर्णिले सहाव्या अध्यायी ॥२॥
वेदविद्या शास्त्रे शिकून । शंकर आला परतून । मातेची सेवा रात्रंदिन । कर्तव्याचे करी पालन ॥३॥
आर्याम्बा जेव्हा दिसे प्रसन्न । मनीचे ध्येय दावी बोलून । माते ब्रह्मचर्य आजीवन । पाळून व्हावे मी कृतार्थ ॥४॥
मातेस कैसे पटावे । पुत्रावाचून विधवेचे जिणे । जगावे कोणत्या कारणे । आर्याम्बा राखी मौन ॥५॥
शंकर जेव्हा दिसे प्रसन्न । माय बोले मनीचा विचार । शंकरा करी रे संसार । मज वाटेल अति सुख ॥६॥
मातापुत्र आपापल्या परी । विचार करिती यथायोग्य । संसार किंवा ब्रह्मचर्य । होता होईना निर्णय ॥७॥
हेतू माझे जीविताचा । वैदिक धर्म दृढ करण्याचा । जरी आशीर्वाद ना मातेचा । कैसा पूर्णत्वा जाईल ॥८॥
कैसे आईस समजवावे । मज तो विश्वाची चिंती करणे । संसारात ना केव्हां रमणे । साध्य माझे धर्मप्रसार ॥९॥
साध्याचे या एकच साधन । वैराग्यपूर्ण असावे जीवन । त्यातून घडावे स्वरुपदर्शन । परी सर्वाचे मूळ संन्यास ॥१०॥
शब्द ऐकता संन्यास । आर्याम्बा होई कासावीस । नको रे ऐसे बोलूस । मजसि केवळ तुझा आधार ॥११॥
मातेच्या पूर्ण सम्मतीविण । संन्यासदीक्षा कोण देणार । किती काळ अजून जाणार । मातेचे मन शांतविण्या ॥१२॥
काळाची करिता विवंचना । काळचि जणू करी योजना । पूर्ण करण्या कामना । संन्यासाची शंकराच्या ॥१३॥
शांत समंजस शंकराचे । मित्रांत मित्रासम वागणे । चढाओढीने खेळणे पोहणे । हुंदडणे सर्वत्र बालपणे ॥१४॥
एके दिनी पूर्णेच्या पात्री । नित्याप्रमाणे स्नानास जाता । पैज लागली पाहता पाहता । जाईल कोण खोल नदीत ॥१५॥
आपुली शक्ति करण्या प्रकट । शंकर सुटला मोकाट । न राखता भान नीट । जाई खोल पात्री धीट ॥१६॥
साधुनि संधी नामी । मगर रुपाने काळ धावला । पाय शंकराचा धरिला । हाहाःकार कांठावर ॥१७॥
मित्र सारे घाबरले । सर्वत्र बोभाट करीत सुटले । आर्याम्बेसह सर्व धावले । त्वरित गाठति नदीकाठ ॥१८॥
शंकरासी आली जाण । भय दाखविण्या आले मरण । आदरे दोन्ही हात जोडून । विनवी आईस आर्तपणे ॥१९॥
आता तरी पुरवी कामना । संन्यासाची मनी वासना । आई तुझ्या सम्मतीविना । राहील गे अतृप्त ॥२०॥
आर्याम्बेची मति कुंठित । चित्त झाले सद्गदित । म्हणे बाळा मज सम्मत । संन्याससंकल्पे हो मुक्त ॥२१॥
मातेची मिळता सम्मती । आनंदोर्मिची उसळे शक्ति । मगरमिठीतून होई मुक्ति । पाय झाला मोकळा ॥२२॥
त्वरेनें गाठी किनारा । मातेच्या पायांचा घे आसरा । म्हणे वाचविलेस लेकरा । आज मृत्यूपासुनि ॥२३॥
मातेच्या नेत्री अश्रूंचा पूर । अभिषेक शंकर मस्तकावर । दृढ आलिंगून आर्याम्बा दूर । शंकर कावरा बावरा ॥२४॥
म्हणे बाळा मोह गेला । विवेक पुरता जागा झाला । तुला चालणे मार्ग निराळा । जग कल्याणाचा सर्वज्ञा ॥२५॥
सम्मती दिली आपत्काली । बुद्धीत परी स्थिरावली । मनास शांति प्राप्त झाली । चालवी तूं जगसंसारा ॥२६॥
तुझ्या पित्यासहि हीच ओढ । संन्यासाश्रम वाटे गोड । परी पित्याची इच्छा आड । गृहस्थाश्रम स्वीकारला ॥२७॥
पूर्ण उजळिले जीवन । सदा जाणुनि माझे मन । कुटुंबात नांदे समाधान । तुझ्या पित्याच्या त्यागानें ॥२८॥
परी शिवगुरुंची खरी कामना । सर्वज्ञ पुत्राने करावी साधना । वैदिकधर्माची पुनःस्थापना । व्हावी सर्व दिशात ॥२९॥
पित्याचे फेडावया ऋण । सात पिढ्यांचे उद्धरण । ज्ञानवैराग्याधिष्ठित संन्यास । बाळा घेई आनंदे ॥३०॥
तुझी आजवर ओढाताण । कसे दुखवावे मातेचे मन । परी आज संतुष्ट होऊन । सम्मती देते संन्यासा ॥३१॥
शंकरासी हर्ष झाला । मातेच्या चरणी झेपावला । म्हणे जन्म सार्थ झाला । आई तुझ्या अनुमोदने ॥३२॥
घेवोनीहि संन्यासाश्रम । तुझ्या अंतसमयी येऊन । अंत्यसंस्कार मीच करीन । सर्वांसमक्ष देतो वचन ॥३३॥
आर्माम्बेस कांही बोलवेना । पुत्राने जाणून मनोवेदना । आश्वस्त केले माझ्या मना । आता लागणे पुढील कामा ॥३४॥
जमलेले जन भांबावती । आदरे मस्तक नमविती । धर्मास्तव सुख त्यागिती । कैसी ही मायलेकरे ॥३५॥
संन्यास कोण देणार । शंकर कोठे जाणार । मातेची व्यवस्था कैसी करणार । जाणावे पुढील अध्यायी ॥३६॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । सातवा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥३७॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।
N/A
References : N/A
Last Updated : March 19, 2017
TOP