श्री शंकराचार्य वंदना - अध्याय दुसरा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र
जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
प्रथमाध्यायी करुनि वंदन । ज्ञानावताराचा हेतू मूळ । वर्णिले आचार्यांचे कूळ । लीलामृताचा शुभारंभ ॥२॥
साकारला भूमीवरी महेश । करावया वेदान्ताचे मंडन । आणि नास्तिकांचे खंडन । केरळ प्रांती कालडी गावी ॥३॥
शिवगुरु नम्बुद्री ब्राह्मण । वेदान्ती ठेवून श्रद्धा पूर्ण । आश्रम धर्माचे आचरण । मनी इच्छा ब्रह्मचर्येची ॥४॥
परी पिता विद्याधर । एकुलत्या पुत्रावर सारा भार । सांगे करी रे संसार । चालविण्या पुढे वंश थोर ॥५॥
पित्यास द्यावे समाधान । हाच पुत्राचा सदाचार । शिवगुरु करिती स्वीकार । गृहस्थाश्रमी जाण्याचा ॥६॥
विशिष्टादेवी नामे पत्नी । आर्याम्बाहि तिजसी म्हणती । पतीसमवेत सदा राही । प्रसन्नचित्त समाधानी ॥७॥
पुत्रस्नुषेचे आनंदी जीवन । देई विद्याधरा समाधान । परी काळाचे येता निमंत्रण । झाले विद्याधरांचे निधन ॥८॥
देवोत्तरसंपत्ती झाली प्राप्त । शिवगुरुंवर पडला भार । गुरुकुलाचा वाढता विस्तार । आर्याम्बेची साथ पूर्ण ॥९॥
संपली वर्षे वर्षामागून । संसारी दिसे एक न्यून । वाटे नाही होणार संतान । आर्याम्बा काहीशी मनी खिन्न ॥१०॥
ब्रह्मचर्येची मनी ओढ । तेणे शिवगुरुसी नाही दुःख । पत्नीस कैसे द्यावे सुख । हीच चिंता मनासी जाळी ॥११॥
गृहस्थाश्रमाचा नियम । परस्परांचे राखावे मन । जाणती पूर्ण मनोमन । शिवगुरु तैसी आर्याम्बा ॥१२॥
शिवगुरुंचा योग्य विचार । पत्नीचे मनातील शल्य । काढोनि स्थापवे मांगल्य । कामनाव्रत आता अपरिहार्य ॥१३॥
शास्त्रावरती निष्ठा थोर । सर्व भ्रमाचा तेणे अंत । वंध्यत्वाची ना जाळी खंत । शिवगुरुसी एक क्षण ॥१४॥
होवो न होवो पुत्र । ऐशा त्रुटी लहानथोर । आत्मज्ञानास नाही अडसर । हाच खरा वेदान्तधर्म ॥१५॥
शिवगुरुंनी सोडिला संकल्प । पत्नीचे राखावया मन । स्वीकारिले घोर अनुष्ठान । चंद्रमौलीश्वर पूजनाचे ॥१६॥
गावाजवळ वृष पर्वत । तेथे मंदीर सुंदर शांत । चंद्रमौलीश्वर सदा जागृत । तपस्येसाठी निवडीले ॥१७॥
पतीचे जाणून मनोगत । आर्याम्बा शिवगुरु समवेत । सहाय्य करण्या अनुष्ठानात । जाउन राही मंदीरात ॥१८॥
संसारी जे घडे समोर । अनुकूल वा प्रतिकूल । रक्षिण्या आपुले घरकुल । पतिपत्नी हवेत समचित्त ॥१९॥
आहाराचे करुनि नियमन । कंदमुळे शाक खाऊन । अहोरात्र महेश्वराचे पूजन । दोघे करिती श्रद्धाभावे ॥२०॥
पुढे पुढे तेही वर्ज्य । चरणामृत मात्र सेवून । जप तप शिवाचे अर्चन । करिती मनापासून ॥२१॥
कष्टमय साधना वर्षभराची । शरीरे जरी वाळली दोघांची । प्रभा फाके आत्मतेजाची । दिसती दोघे तेजःपुंज ॥२२॥
चंद्रमौलीश्वर होई प्रसन्न । शिवगुरुंना देई स्वप्नी दर्शन । अष्टसात्विक भाव झाले उत्पन्न । दिसता कर्पूरगौर सदाशिव ॥२३॥
हसुनि बोले भक्तास । “ झालो मी पूर्ण प्रसन्न । माग हवे ते वरदान । जीवन जे वांछिसी ” ॥२४॥
शिवगुरु गेले भांबावून । भाग्याचा तो सुवर्णक्षण । धरुनि महेशाचे दृढचरण । मागणे मागति विनम्रपणे ॥२५॥
देवा तुम्ही तर सर्व जाणता । तरीहि मजसि कां विचारिता । पत्नीस गांजे नित्य चिंता । संतानप्राप्ति ना आजवरी ॥२६॥
सर्वज्ञ आणि दीर्घायु पुत्र । हीच वासना मनी धरुन । केले दोघांनी अनुष्ठान । कामना करावी देवा पूर्ण ॥२७॥
“ भक्ता तुमची तपस्या थोर । प्रसन्न मी तुम्हां दोघांवर । परी निश्चये मागे पुत्रवर । दीर्घायु अथवा सर्वज्ञ ” ॥२८॥
विनम्रतम भाव धरुन शिवगुरुंचा निश्चय विवेकपूर्ण । वेदान्तधर्माचे करण्या रक्षण । मागती पुत्र सर्वज्ञ ॥२९॥
‘ वरमेको गुणी पुत्रो ’ । ध्यानांत आणुनि सुंदर सूत्र । सुभाषिताचे जाणोनि मर्म । मागति शिवगुरु वरदान ॥३०॥
कैसे शिवगुरुंचे मागणे । विवेकबुद्धीचे अपूर्व लेणे । निःश्रेयस हित ते साधणे । सर्वज्ञ पुत्राकरवी आतां ॥३१॥
महेश्वरही मोहित झाला । शिवगुरु कुलाचा लोभ जडला । मनी निश्चय पूर्ण केला । जन्मावे आर्याम्बेच्या उदरी ॥३२॥
आश्वासुनि शिवगुरुना । आदेश दिधला घरी जाण्या । कष्टमय तप थांबविण्या । चंद्रमौलिश्वरे स्वतः ॥३३॥
म्हणे तुम्हा हवा सर्वज्ञ । तरी मीच पोटी येईन । मनोरथ पूर्ण करीन । आनंद भरीन संसारी ॥३४॥
शिवगुरु झाले जागृत । पूर्ण शरीर रोमांचित । आर्याम्बेस उठवूनि सांगत । तप झाले आपले पूर्ण ॥३५॥
येतील पोटी साक्षात् शंकर । सर्वज्ञ तो ज्ञानावतार । सुफलित आपुला संसार । होईल आता निश्चये ॥३६॥
आर्याम्बा होऊनि सद्गदित । शिवगुरुसि वारंवार पुसत । कां न घडले मज दर्शन । कसे संपवू अनुष्ठान ॥३७॥
शिवगुरु तिजसी समजावित । शंका नको निष्कारण । पूर्णत्वा गेले तपाचरण । येईळ पोटी उमारमण ॥३८॥
सुखे परतले आपुल्या घरा । अखंड ध्याती शिवशंकरा । अन्य विचारा नाही थारा । दोघे झाले शिवमय ॥३९॥
आधीच पतीपत्नीचे मनोमिलन । त्यात भगवंताचे वरदान । दिसू लागले स्पष्ट लक्षण । आर्याम्बा झाली गरोदर ॥४०॥
आनंद तर गगनी मावेना । भावना कोणा आवरेना । नित्य करिती रुद्रावर्तना । भक्तिचा दाटे महापूर ॥४१॥
साक्षात श्री दक्षिणावतार । कैसा प्रगटला भूतलावर । चरित्र रसाळ सुंदर । जाणावे पुढील अध्यायी ॥४२॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । दुसरा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४३॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।
N/A
References : N/A
Last Updated : March 19, 2017
TOP