मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय तेविसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
दिग्विजय यात्रेचे त्रोटक वृत्त । तत्वज्ञानाचे छोटेसे सार । कांचीत गुरुपीठाचा संकल्प । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
दिग्विजय यात्रेची दिशा बदलून । ठेविले कांचीचे प्रस्थान । आचार्यांची आज्ञा घेऊन । निघाला आधी राजशेखर ॥३॥
आचार्यास नको थोडाही त्रास । सर्वांचा यास्तव्व प्रयास । आचार्यांसी एकच ध्यास । श्रेष्ठत्व पावावे अद्वैत ॥४॥
करिता केव्हांही शास्त्रार्थ । पंथोपपंथांसी मूळ साधन । सांगून करिती समाधान । आपल्यांत घेती मिळवून ॥५॥
सर्व नद्यांचा सागरी लय । तैसे सर्व केशवमय । मध्य मूर्ती मानून ब्रह्ममय । मांडावे पूजेत पंचायतन ॥६॥
शैव, वैष्णव किंवा सौर्य । शक्ति अथवा गाणपत्य । पंथ हे भेदांचे अपत्य । जाणोनि कराव अभेद ॥७॥
ब्रह्म भासते सृष्टीरुपाने । भेद बनती जीवकल्पने । कल्पना सोडता अभेद बाणे । उरते केवळ अद्वैत ॥८॥
सर्वांस समजावे तत्वज्ञान । आचार्य देती स्पष्टीकरण । सुंदर साधे विवेचन । करती सिद्धांत, नियमांचे ॥९॥
यात्रा पोचली कांचीनगरी । धावले नगरजन प्रवेशद्वारी । नंदीवर्मन् राजा स्वागत करी । भाग्य उजळले कांचीचे ॥१०॥
नगरी होती नाना मंदीर । कामाक्षी मंदीराचे स्थान आगळे । आचार्याम्नी स्वये कोरिले । श्री चक्र, देवीच्या कर्णफुली ॥११॥
चंद्रमौलीश्वराचे दर्शन । महात्रिपूरसुंदरीचे यथार्थ पूजन । आचार्य पुसति प्रयोजन । नगरीच्या धामधूमीचे ॥१२॥
नंदीवर्मन् तथा सुरेश्वर । नम्रता आत्यंतिक धरुन । आचार्यास प्रार्थिती विनवून । करावी सर्वांची इच्छा पूर्ण ॥१३॥
सर्वज्ञ पीठाचे चालले काम । सर्वांच्या मुखी आपुले नाम । कांची बनावे आपुले धाम । चरणी सर्वांची विनवणी ॥१४॥
आचार्य करिती हास्यविनोद । पुसति “ यात्रेचा हाच कां बोध । संन्याशास कसा घराचा शोध । तो तर सदा अनिकेत ” ॥१५॥
सुरेश्वर म्हणति हासून । “ अनिकेत जरी तुम्ही आचार्य । भक्तशिष्यांना हवा ना आश्रय । निर्मिलेत ना चार मठ ॥१६॥
शिष्यांनाही वाटते मनोमन । असावे एक गुरुपीठ । राजशेखरांचीहि इच्छा उत्कट । बनते आहे कांची पीठ ॥१७॥
कांचीतील पाचवे पीटः । मानतील सर्व गुरुपीठ । सर्वज्ञांचे सर्वज्ञपीठ । मोक्षपुरीतील जणूं मुकुट ” ॥१८॥
आचार्य वदती हासून । “ राजैश्वर्य येता सहाय्यास । बद्ध करु पाहता संन्याशास । यातूनहि शोधेन मुक्तिमार्ग ” ॥१९॥
एकांती करीती विचारमंथन । अनेकातून शोधले एकत्व । तैसे कांची मठ मूळ तत्व । व्हावे इतर पीठांचे मूळपीठ ॥२०॥
आवश्यकता पडेल भविष्यांत । मठाधिपती चारी दिशातून । कांची मठात एकत्र येऊन । धर्मप्रसाराचे घेतील निर्णय ॥२१॥
सर्व आहेत जमलेले । उत्साहाने कांही ठरविले । आनंदाने कामास लागले । आता पुरवावा बालहट्ट ॥२२॥
आचार्यांचा मिळता होकार । उत्साहाला आले उधाण । सर्वज्ञ पीठावर आरोहण । केव्हां करतील आचार्य ? ॥२३॥
चौल देशाच्या राजाने । दवंडी देवविली सर्वत्र । अखेरचे हे शास्त्रार्थ सत्र । कुणीही यावे वादास ॥२४॥
अनेक पंडित उभे वादास । परी शर्ण जाती अखेरीस । अद्वैतवादी शंकराचार्यांस । विनविती करावे पीठारोहण ॥२५॥
इतुक्यात आला एक समूह । ताम्रपर्णीतीरस्थ ब्राह्मणांसह । या आठ वर्षाच्या बालकासह । म्हणती करावा शास्त्रार्थ ॥२६॥
आचार्य म्हणती, “ अवश्य । सर्वज्ञ ठरेल बालक जर । बसेल हाची पीठावर । कोणीही न मानावा संदेह ” ॥२७॥
सुरु झाला शास्त्रार्थ । तीन दिवस सतत वाद । आचार्य साधती सुसंवाद । प्रसन्न मनी बालकावर ॥२८॥
तीव्र बुद्धी, वादकौशल्य । आचार्य करिती कौतुक । परी अखेर झाला नतमस्तक । विनवी मानावे मजसि शिष्य ॥२९॥
संपला अखेरचा वाद । सर्वज्ञत्व ठरले निरपवाद। उठले श्री शंकराचार्य भगवत् पाद । सर्वांची विनंती मानून ॥३०॥
आचार्य निघाले पीठासन्निध । जमलेले मुनी, पंडित, विद्वान । पदोपदी आचार्या वंदून । अर्पिती आपापली भेट ॥३१॥
सरदार मानकर्‍यांसमवेत । नंदीवर्मन्, सुधन्वा, राजसेन । माना लाववून, कर जोडून । उभे मार्गात कटाक्षार्थ ॥३२॥
सामान्य जनांस कळले पूर्ण । विरागी संन्याशाचे श्रेष्ठपण । पंडीत, राजे धरिती चरण । सर्वस्व करिती त्या अर्पण ॥३३॥
पद्मपादाचार्यांचा हात धरुन । आनंदे पीठारुढ होऊन । सुवर्णासन केले पावन । एकमेवाद्वितीय संन्याशानें ॥३४॥
कोणी करिती वाद्यांचा गजर । कॊणी करिती जयघोष । कोणी उधळति सुवर्णपुष्प । कैसा वर्णावा तो समारंभ ॥३५॥
‘ जगद्गुरु श्री भाष्यकार । जय पूज्य पादवर्य । ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामीन् अद्वैताचार्य ’ । घोष चाले मार्गावर ॥३६॥
हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर । हाती धरती छत्र, चामर । स्वर्णदीप, तोरण, मकर । बिरदावली आणि आयुधे ॥३७॥
आचार्यांना करुनि दंडवत । प्रसन्न चित्ते गाती स्तवन । सामान्यांचे गायन, नर्तन । कलाकारही करिती वंदन ॥३८॥
घोष करिती वरचेवर । ‘ जय जय शंकर । हर हर शंकर । कांची शंकर, कामकोटी शंकर ’ ॥३९॥
समारंभाची करिता सांगता । सर्व शिष्यांना उपदेश । राजमंडळास धर्मादेश । आणि इतरा आशीर्वाद ॥४०॥
चारी शिष्यांना देती निरोप । पूर्वीच रचले मठाम्नाय । सर्वांसी आहे ते मान्य । त्याचेच घ्यावे मार्गदर्शन ॥४१॥
शिष्य जरी संन्यासी । होती तरीही कासावीस । केव्हां घडेल पुन्हा सहवास । जगद्गुरुंचे प्रसन्न दर्शन ॥४२॥
मृदू अंतःकरणाचे आचार्य । उरी धरिती शिष्य । स्पर्श तो मंगल दिव्य । शिष्यांस करी आश्वासित ॥४३॥
हस्तामलक, त्रोटक, पद्मपादाचार्य । निघती साधाया पुढील कार्य । शृंगेरी पीठाचे सुरेशराचार्य । थांबती गुरुंच्या आज्ञेने ॥४४॥
सांगती त्यास मनोगत । “ सुरेश्वरा, याही पीठावरी । नेमला पाहिजे उत्तराधिकारी । नाही उरला फार अवधी ॥४५॥
अंतीम वाद ज्याच्याशी केला । तोच शिष्य मी निवडला । मनी कांही बेत केला । पटते पाहा कां योजना ॥४६॥
गुरुपीठावर नेमला बालक । प्रौढ बसले शिष्यपीठावर । न उद्भवो कोणते अवडंबर । यामुळे पुढे भविष्यात ॥४७॥
संन्यासदीक्षा देऊन त्याला । जरी पीठाधीश केला । तरी प्रतिपाळ पाहिजे केला । त्याचा तुम्ही सुरेश्वर ॥४८॥
संसार अर्धाच टाकून । संन्यास घेतला, तूं शिष्यवर । मनी तुझ्या वात्सल्य अपार । वर्षवावे या बालकावर ” ॥४९॥
सुरेश्वर झाले सद्गदित । ऐकतां गुरुमाऊलीचे मनोगत । जाणुनि माझे हृद्गत । सुप्त वासना केली तृप्त ॥५०॥
ऐसा होता सुसंवाद । बालकास दिले दीक्षानाम । ‘ श्री चरणेन्द सरस्वती सर्वज्ञात्म ’ । सोपविले सुरेश्वराचार्यांचे हाती ॥५१॥
आत्मपूजार्थ जे पाचवे लिंग । चन्द्रमौलीश्वर नामे योगलिंग । श्री सुरेश्वराचार्यांचे हातून । दिधले श्री चरणेन्द्र सरस्वतीस ॥५२॥
काय घडले भविष्यांत । आचार्यांचे उदात्त जीवनात । मिळतो कां कांही इतिहास । जाणावे पुढील अध्यांयी ॥५३॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । तेविसावा अध्याय येथे समाप्त । कृपा होवो सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५४॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP