श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सहावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
कनकधारा स्तोत्र रचिले । कोणत्या प्रसंगे शंकरा स्फुरले । भिक्षा मागता काय घडले । वर्णिले पाचव्या अध्यायी ॥२॥
पडला पाऊस सोन्याचा । कथा ही सत्य की असत्य । कथचे कोणते नेमके तथ्य । विचारमंथन स्वाभाविक ॥३॥
प्रश्न नाही चमत्काराचा । आहे तो पूर्ण श्रद्धेचा । शक्ति करुणेची असते कां । अघटित ते घडविणारी ॥४॥
पूर्ण श्रद्धा म्हणजे काय । अंतरीचा अढळ विश्वास । आत्मबलाचा पूर्ण विकास । करुनि घडवी अघटित ॥५॥
शिवगुरु आर्याम्बेची शिकवण । शंकराचा जागविती विश्वास । भक्तिने आळविता देवास । भक्तकामना करी पूर्ण ॥६॥
पूजिता चंद्रमौलिश्वर । लाभलास आम्हां गुणज्ञ । पुत्र तूं आमचा सर्वज्ञ । ठेवी ध्यानांत सर्वदा ॥७॥
मायपित्यांचा तो स्वानुभव । शंकराच्या मनी स्थिरावे भाव । ईशशक्तिचा घेता ठाव । इच्छिले ते होईल पूर्ण ॥८॥
पाहता ब्राह्मण स्त्रीची दुर्दशा । करुणा उपजे अंतःकरणी । शंकर लागे लक्ष्मी चरणी । सुखावो ही गृहिणी ॥९॥
श्रद्धा ठेवुनि महालक्ष्मीवर । आळवी तिजला बटु शंकर । करुणालयाचा आर्त स्वर । सर्वांचे भेदी काळीज ॥१०॥
ऐकणारे लहान थोर । म्हणति यास हवे काय । जरी धरिले लक्ष्मीचे पाय । तरी ती कां येईल साक्षात् ॥११॥
ऐकतां स्तोत्राचे मधुर बोल । कांही धनिक गांवातील । विचार करिती सखोल । काय करता येईल ? ॥१२॥
भिक्षा मागता याने जाणले । झाले सज्जन दारिद्र्यग्रस्त । विवेक नाही आमुचा जागृत । आता तरी व्हावे धर्मरत ॥१३॥
आमच्यापाशी धन अपार । ते कां न कामी येणार । रक्षिण्या विद्या सदाचार । आमचे काय कर्तव्य ? ॥१४॥
एक करितो चंगळ । दुसरा राही कंगाल । सांगतो शंकर बाळ । हा नाही वैदिकधर्म ॥१५॥
लक्ष्मी तर चंचल । आज ना उद्या जाणार । शोधुनिया सत्शीलाचे घर । आपणचि तेथे पोचवावी ॥१६॥
गुपचुप गेले आपल्या घरी । मध्यरात्र झाल्यावरी । ब्राह्मणपत्नीच्या दारी । ठेविती सुवर्णराशी ॥१७॥
पहाट होता, पाहुनि धन । पतीपत्नीचे आनंदले मन । म्हणती झाली लक्ष्मी प्रसन्न । शंकराच्या शुभचिंतने ॥१८॥
देवदेवता जरी अनंत । माणसाच्या वसति मनांत । योग्य काली प्रकटुनि बुद्धित । घडविताती अघटित ॥१९॥
बाल शंकराचा पूर्ण विश्वास । मनापासून घेता नाम । प्रकटोनि करितो काम । अंतर्यामीचा परमेश्वर ॥२०॥
जीवन धन्य सांगे स्तोत्रफल । त्यापुढे वैभवाचे काय मोल । अखेरी सांगे शंकर बाळ । स्तोत्राचे हे चि अमोल मर्म ॥२१॥
कनकाची धारा अव्याहत । पृथ्वीवरी करो वर्षाव । असा सार्थ होण्या भाव । जावे धावोनि दीनास्तव ॥२२॥
स्वार्थासाठी करिती व्रते । कर्मानुसार देती दैवते । परी आळविता निस्वार्थपणे । परमेश्वर देई अपार ॥२३॥
पूर्वीहि पुराणी ऐसी कथा । ब्राह्मणासाठी मागे रघुराजा । सुवर्णवृष्टी करी कुबेरराजा । आठवण देई दसरा ॥२४॥
इप्सित साधण्या सज्जनांचे । सामर्थ्य वापरती श्रेष्ठ साचे । भक्ति, बुद्धि, शक्ति वा संपत्तीचे । साधते तेव्हां प्रजा सौख्य ॥२५॥
विवेकासह नांदे बुद्धी । मृदु कनवाळू चित्तवृत्ति । कैशा आचरति श्रेष्ठ विभूति । वैदिक धर्माचे आदर्श ॥२६॥
साक्षात् भगवान शंकर । होऊनि जगति आदिशंकर । लीलेतून घडविती साक्षात्कार । प्रत्येकातील आत्मशक्तिचा ॥२७॥
जन्मा येई जो जो प्राणी । आत्मशक्ति वसे अंतर्यामी । परी नोळखे तिज अज्ञानी । समजे स्वतःसि दुर्बळ ॥२८॥
ती आत्मशक्ति जागविणे । स्वस्वरुपास ओळखणे । नरदेहाचे सार्थक करणे । थोर शिकवण वेदान्ताची ॥२९॥
गुरुगृही शंकराचे हे वर्तन । गुरुही झाले अतिप्रसन्न । कोणती विद्या आता करु दान । मी पराभूत शिष्याकडून ॥३०॥
सांभाळण्या परी व्यवहार । सांगती शंकरा गृही परतणे । तुजला शिकविली पूर्णपणे । ज्ञात ती शास्त्रे पुराणे ॥३१॥
धरुनि चित्ती नम्र भाव । शंकर धरी गुरुचे चरण । म्हणे तुम्ही दिली शिकवण । तीच उजळे मार्ग माझा ॥३२॥
गुरुगृह सोडूनि परते घरी । आर्याम्बेस संतोष भारी । स्वाभाविक विचार करी । शंकर धरो गृहस्थाश्रम ॥३३॥
आजोळीहि तोच विचार । थाटणे शंकराचा संसार । शोधावि वधू सुंदर । आर्याम्बेसि विचारुनि ॥३४॥
काय घडले परी प्रत्यक्ष । गृहस्थाश्रमी केला का प्रवेश । मातेचा शंकरा काय आदेश । जाणावे पुढील अध्यायी ॥३५॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । सहावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥३६॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP