मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता|

प्रासंगिक कविता - श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


बरें सत्य बोला यथातथ्य चाला । बहू मानिती लोक येणें तुम्हांला ।
धरा बुद्धिपोटी विवेकें मुलें हो । बरा गूण तो अंतरामाजीं राहो ॥१॥
सदा संत घांसोनि तोंडा धुवावें ।कळाहीन तें शूद्र मूखीं नसावें ।
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे । बहूसाल हा खेळ कामा नये रे ॥२॥
दिसामाजिं कांहीं तरी तें लिहावें । प्रसंगीं अखंडीत वाचीत जावें ।
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्याचें करावें । बरें बोलणें सत्य जीवीं धरावें ॥३॥
बहू खेळ खोटा सदालस्य खोटा । समस्तांसि भांडेलची तो करंटा ।
बहूतां जनांलागीं जीवीं भजावें । भल्यासंगतीं न्याय तेथें भजावें ॥४॥
हिशोबीं सदा न्याय सांडूं नये रे । कदाचीत अन्याय होतां धका रे ।
जनीं सांडितां न्याय रे दु:ख होतें । महा सूख तेंही अकस्मात जातें ॥५॥
प्रचीतीविणें बोलणें व्यर्थ वांया । विवेकेंविणें सर्वही दंभ जाया ।
बहू सज्जला नेटका साज केला । विचारा विणें सर्वही व्यर्थ गेला ॥१६॥
वरी चांगला अंतरीं गोड नाहीं । तया मानवाचें जिणें व्यर्थ पाहीं ।
वरी चांगला अंतरीं गोड आहे । तया लगिं कोणी तरी शोधिताहे ॥७॥
सदा अंतरीं गोड तें सांडवेना । कदा अंतरीं ओखटें देखवेना ।
म्हणूनी बरा गूण आधीं धरावा । महाघोर संसार हा नीरसावा ॥८॥
भला रे भला बोलती तें करावें । बहूतां जनांचें भुखें येश ध्यावें ।
परी शेवटीं सर्व सोडूनी द्यावें । मरावें परी कीर्तिरूपें उरावें ॥९॥
बरा ओखटा सर्व संसार झाला । अकस्मात येईल रे काळघाला ।
म्हणोनी भले संगतीं सत्य चाला । जनीं दास तो बोधिताहे भुलांला ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP