|
स्त्री. १ वाढ ; प्रगति ; सुधारणा ; उत्कर्ष . सवाई माधवराव पेशवे सवाई चढती राज्याला । - ऐपो १७६ . २ श्रेष्ठपणा ; उच्च दर्जा . जन चढती ही मानिति तीची मी झालें खालीं । - रत्न २० . ३ चलती ; बढती ; चढता पाया . [ म . चढणें ] सामाशब्द - ०उतरती स्त्री. चढउतार ; उत्कर्षापकर्ष . ०कमाण कमान - स्त्री . ( धनुष्याची वरती असलेली बाजू ) वाढत्या उत्कर्षाची स्थिति ; वाढते मान , प्रमाण ; चढती कळा ; चालता काळ ; भरभराटीचा काळ ; समृध्दीचा काळ ; उदयकाल ; वृध्दीस अनुकूल काल . ०कळा स्त्री. १ ज्या काळांत चंद्राच्या कळा वाढत जातात तो दिवस ; शुक्ल पक्षाचे दिवस . २ ( ल . ) भाग्याचे दिवस ; भरभराटीची स्थिति , अवस्था ; उत्कर्षकाल . चढतीकळा धन्याची जाणुने वीर असे भीडती । - ऐपो २६९ . ०गोष्ट फुशारकांनें , आढयतेनें , अरेरांवीनें बोलणें . सांगणें फुशारकांनें , आढयतेनें , अरेरांवीनें बोलणें . ०दौलत स्त्री. चढउतर . चढतीपडती वस्तुमात्राच्या मागें लागलीच आहे . - इलासुंदरी १०७ . ( मकरंदमाला ) २० . ०पराई पायरी - स्त्री . चढता पाया पहा . ०पराई वाढतें वय . चढती पराई जाऊन उतरती पराई लागली . [ पराई = ज्वानी ] ०बाजू स्त्री. १ गंजिफांच्या डावांत आलेलीं ( एक्का , दुरी , तिरी अशा चढत्या क्रमानें ) चांगलीं चांगलीं पाने . २ ( ल . ) भरभराटीचे दिवस ; उत्कर्षाचा काळ ; चढती कमान , कळा पहा . ०भांजणी स्त्री. ( गणित ) हलक्या परिमाणाच्या अंकास भारी परिमाणाचें रूप देण्याची कृति . उ० आण्याचे रुपये करणें वगैरे . ०भावना स्त्री. चढता , वाढता कल , चिन्ह , जोर , भर ( रोग , संपत्ति इ० चा ). ०मुदत स्त्री. वाढणारी मुदत . चढतीमुदतीची हूंडी - ज्यामनुष्याकरितां हूंडी करावयाची त्याच्या सोईसाठीं नेहमीपेक्षां ज्यास्त मुदतीची केलेली हुंडी . चढती वाढती - वि . १ एकसारखी वाढत जाणारी . चढती वाढती गोडी । भगवदभजनाची । - दा १४ . ३ . २३ . २ जास्त जास्त ; उत्तरोत्तर वाढत जाणारें . चढतें वाढतें वाढवावें । पूजन देवाचें । - दा ४ . ७ . ३ . ०वेळ वेळा - स्त्री . १ चढणारी , वाढणारी वेळ ; सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत ; सकाळ व दुपार ; पूर्वाण्ह . चढते वेळेस रक्त काढवू नये . २ भरभराटीचा , उत्कर्षाचा काळ . ०श्रेढी स्त्री. ( गणित ) या श्रेढींत संख्या एका पुढें एक वाढत जातात ; याच्या उलट उतरती श्रेढी . ०हळद स्त्री. ( लग्नांत ) पायाकडून वर हळद लावणें . ( मृत्यूनंतर वरखालीं - उतरती हळद लावितात . - बदलापूर ३५ .
|