|
पु. १ चढण ; चढाव ; उंच भाग ; पर्वतादिकांचा उंच होत गेलेला प्रदेश . आतां सडकेला येथून चढ लागला . २ बढती ; वाढ ; उन्नति ; संवर्धन ; वृध्दि ( संपत्ति , स्थिति , हुद्दा , दर्जा , मोल , माप , किंमत , धारण यांची ). पुण्याचे मापानें मोजलेला पदार्थ कोंकणी मापानें मोजला असतां कांहीं चढ येतो . ३ वाढावा ; बरोबरी होऊन जास्त येणें . ४ वाढवलेली पट्टी , कर ; धारावाढी . ( क्रि० वसवणें ; देणें ) ५ हल्ला करणें ; एखाद्यावर तुटून पडणें ; एखद्यावर चढाव , चाल करणें ; हल्ला ; मोहीम ; चढाई . रघोजीच्या सैन्यावर चढ केल्यामुळें त्याच्या सैन्याची धांदल उडाली . - विवि ८ . ७ . १३३ . तो प्रथम चढ करून माझे अंगावर आला . ६ वरचष्मा ; वर ताण करणें ; मागें पाडणें ; जिंकणें अतिक्रम ; वरचढ ; मागें टाकणें . यांणे त्याचे मामलतीवर चढ केला . ७ पूर . उदकाचेनि अति चढें । आकाश न बुडे सर्वथा । - एभा २८ . ३४३ . - वि . श्रेष्ठ ; श्रेष्ठ दर्जाचा ; वरचढ ; जिंकणारा . एकाहुनि चढ एक जगामधिं थोरपणाला मिरवुं नको । वोवी चढी दावि वोंवी । कथा वदवी श्रीराम ॥ - भारा किष्किंधा १ . ५ . [ चढणें ; हिं . पं , गु . चड ; सिं . चडहु ] ( वाप्र . ) ०देणें १ भर घालणें ; उत्तेजन देणें . भाऊसाहेबानें चढ दिला। - ऐपो १९० . २ लिलावांत अगोदर किंमत सांगणें ; किंमत चढविणें . ०बसणें वाढणें ; जास्ती होणें . चढावर चढ देणें - जास्तींत जास्त चढणें , वाढणें ; वरवर जाणें . चढास , चढीं देणें - उत्तेजन देणे ; काम करण्यास भर देणें . चढीस भरणें , चढीस , चढीं लागणें - १ मोठया जोरानें , निश्चयानें , कितीहि संकटें आलीं तरी पिच्छा पुरविणें ; पाठीमागे लागणें . २ लिलावांत जास्त किंमत बोलणें . ३ प्रतिस्पर्धेनें , चढाओडीनें , चढाओडीनें , ईर्षेनें , इरेस पेटून एकादी गोष्ट करणें ; इरेस पेटणें . उगीच चढीं लागून पांच रुपयांचें कापड पांचशेंस घेऊं नका . सामाशब्द - ०उतर उतार - स्त्रीपु . १ चढणें व उतरणें ; चढण उतरण ; वर जाणें व खालीं येणें . विहिरींतलें पाणी आणावयास मला चढउतार करवत नाहीं . २ जास्तकमी होणें ; भरणें व कमी होणें ; कमीजास्त प्रमाण होणें . प्रमाण सारखें नसणें ( ताप , दुखणें इ० चें ). ३ उत्कर्षापकर्ष ; क्षयवृध्दि . ४ आशा निराशा ; एक वेळ दु : खाचा तर एक वेळ समाधानाचा विचार . म्हणोन मनांत चढउतार करूं लागले . परंतु बाहेर व्यंगोक्ति शब्द बोलेनात . - भाव १०३ . चढण चढणी - स्त्री . १ चढ ; चढाव ; चढती ; उंच होत गेलेली जागा . चढणीस घोडा उतरणीस , रेवणीस रेडा २ उंचपणा ; उभटपणा . चढण उतरण - चढउतर पहा . चढणारी कमान - चढती कमान पहा . पेशवाईच्या अस्ताला त्यावेळच्या मुत्सदद्यांच्या महत्वा कांक्षेची चढणारी कमान नडली . - अस्तंभा ७ .
|