मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
प्रेक्षणगृह-प्रसंग

गीत महाभारत - प्रेक्षणगृह-प्रसंग

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


कुंतीने ज्या मंजुषेत घालून कर्णाला टाकले होते, ती मंजूषा धृतराष्ट्रसारथी अधिरथाला मिळाली. त्या दाम्पत्याला अपत्य नव्हते. कर्णासारखे बालक मिळताच अधिरथाची पत्‍नी राधा हिचा आनंद गगनात मावेना. त्यांनी त्याचे सूतकुळात मोठया प्रेमाने पालन केले व द्रोणांकडे शिक्षणासाठी पाठविले. द्रोणांनी शिष्यांचे शिक्षण संपल्यावर, राजकुमारांची विविध शस्त्र कौशल्ये दाखविण्यासाठी भव्य समारंभ आयोजित केला. राजघराण्यातील श्रेष्ठ व्यक्‍ती व नागरिक उपस्थित होते. कृपाचार्य एकेकाला आपले नैपुण्य दाखवण्यास सांगत होते. अर्जुनाने असामान्य प्रयोग करुन दाखवले. तेवढयात कर्ण तेथे आवेशाने आला. परवानगी घेऊन त्याने अर्जुनाने केलेले सर्व प्रयोग करुन दाखविले. दुर्योधनाने त्याचे कौतुक केले. कर्णाने अर्जुनाशी द्वंद्व युद्ध करण्याची मागणी केली. कृप म्हणाले, ’राजपुत्राशी द्वंद्व करायला राजघराण्यातील व्यक्‍ती हवी. तुझे कूळ सांग." कर्णाला जन्मदात्या मातापित्यांची कल्पना नव्हती. तो काही सांगू शकला नाही. तेवढयात दुर्योधनाने कर्णाला तिथल्या तिथे अंगराजपद बहाल केले. कर्णाने भारावून या उपकाराच्या मोबदल्यात दुर्योधनाला घनिष्ठ मैत्रीचे वचन दिले. कर्णपिता अधिरथ ’पुत्रा’, ’बाळा’ म्हणत आनंदाने पुढे आला व त्याने त्याचे अभिनंदन केले. सर्वांना कळले की कर्ण क्षत्रिय नसून सूत आहे. कुंती हे पहात होती. तिने कर्णाला ओळखले. ती बेशुद्ध झाली. सावध झाल्यावर चिंतामग्न झाली. कर्ण सूत हे कळल्यावर भीमाने तो राजा होणे अयोग्य आहे असे सांगून त्याचा पाणउतारा केला. तेवढयात सूर्यास्त झाला व कार्यक्रम संपला.

प्रेक्षण-गृह-प्रसंग

निपुण झाले राजसुत विद्येत त्यांची कौशले

पाहण्या भीष्मादि आले नगरजनही लोटले ॥१॥

भीम दुर्योधन प्रतापी येत तेथे गर्जता

चकित होती लोक पाहुन ती गदेची निपुणता ॥२॥

अर्जुनाचे थक्क केले खेळ धनुचे दावुनी

ते तसे कौशल्य नव्हते पाहिले पूर्वी कुणी ॥३॥

एक तेजस्वी युवा तो येत तेथे त्या क्षणी

घेउ द्या मज भाग येथे, हीच त्याची मागणी ॥४॥

द्रोण देती त्या अनुज्ञा शिष्य त्यांचा जाणुनी

अर्जुनाने दाविले जे, ते करी वीराग्रणी ॥५॥

तेज हे दुर्योधनाने बघुन त्या आलिंगिले

अर्जुनाशी द्वंद्व गुरुने त्यास परि नाकारले ॥६॥

"कोणते रे कूळ तूझे ?" कृप वदे त्या तेधवा

"द्वंद्व करण्या पुरुष यासम राजवंशातिल हवा" ॥७॥

होउनी लज्जीत राही मूक तो हे ऐकता

ज्ञात नव्हते, कूळ अपुले अधिरथाच्या त्या सुता ॥८॥

त्याक्षणी बोले सुयोधन हा धनुर्धर, श्रेष्ठ हा

कूळ याचे काय बघता, तेज वीराचे पहा" ॥९॥

"आज मी त्याच्या शिरावर राजमुकुटा ठेवितो

अंगदेशाचे इथे मी राज्य मित्रा अर्पितो" ॥१०॥

कर्ण वदला ’काय देऊ ह्यास मी साजेलसे ?"

बोलला युवराज "देई सख्य जिवलग जे असे" ॥११॥

सर्व भासे स्वप्‍न कर्णा देइ तो वचना झणी

"बाळ माझा" म्हणत अधिरथ येइ तेथे तत्क्षणी ॥१२॥

कर्ण वंदन करि पित्यासी अश्रु दोघे ढाळिती

सूत कुळिचा हा असे हे लोक तेव्हा जाणिती ॥१३॥

भीम चवताळून बोले "राज्य कैसे सेवका ?

सारथ्याचे कूळ तूझे, घेइ हाती चाबुका" ॥१४॥

ऐकता हे घाव त्याचे सूतपुत्रा वेदना

ज्येष्ठ कौरव देई उत्तर, येत त्याच्या रक्षणा ॥१५॥

माजला कल्लोळ तेथे सूर्य क्षितिजी मावळे

कुरुकुलाचा कलह बघुनी व्यथित जनही जाहले ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP