मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
कुंतीचा शोक

गीत महाभारत - कुंतीचा शोक

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


दुर्योधनाचा उन्मत्तपणा पांडव वनवासाला जायला निघाले तेव्हा पुन्हा स्पष्ट दिसला. वल्कले धारण करुन द्रौपदीसह पांडव निघाले असताना दुर्योधन व दुःशासन यांनी त्यांची हेटाळणी केली. त्यांच्या मागून त्यांची नक्कल करत चालत त्यांना दूषणे दिली; ते वनात रानोमाळ भटकतील व राज्यापासून कायमचे वंचित होतील अशी दुर्भाषणे केली. पांडव हीनदीन पेंढा भरलेल्या हरिणाप्रमाणे झालेले आहेत तेव्हा द्रौपदीने आता कौरवातीलच एखादा पती करावा. हा अपमान सहन न होऊन भीम क्रोधाने लाला झाला व यांचे रणात निर्दयपणे कंदन करुन दुःशासनाचे रक्‍त मी पिईन असा आपल्या प्रतिज्ञेचा त्याने पुनरुच्चार केला. क्रोधावेशाने सर्व पांडवांनी या दुष्टांच्या वधाच्या प्रतिज्ञा घेतल्या. अर्जुनाने कर्णाच्या, सहदेवाने शकुनीच्या व नकुलाने कौरवांच्या वधाच्या प्रतिज्ञा घेतल्या. पांडवांनी कुंती, विदुर यांचा निरोप घेतला. कुंतीने वनात जाणे योग्य नव्हे; तिचा सांभाळ आपण आपल्या घरी करु असे विदुराने सांगितले. कुंतीला पांडव वनवासात जाताना पाहून फार दुःख झाले. तिने देवाची करुणा भाकली. शोकाकुल अंतःकरणाने त्यांना निरोप दिला.

कुंतीचा शोक

माधवा, करि ह्यांचा सांभाळ

’भार्ये’ सह हे जात वनाला, तूच तया आधार ॥धृ॥

केशवचरणी तुमची भक्‍ती

शाश्वत जपली शुचिता नीती

अढळ असे सत्याची प्रीती

आपत्ती परि आलि अचानक, तुम्ही कसे सहणार ? ॥१॥

मला वाटते मीच पापिणी

दोष असे माझ्याच प्राक्‍तनी

तुम्हा क्लेश हे त्याच कारणी

कसे अन्यथा तुम्हा भोग हे, वनिचे दुःख अपार ॥२॥

गेली तुमची जरी संपदा

शील परी शस्त्रास्त्रनिपुणता

राहिल तुमच्यापाशि सर्वदा

राजसुखाविण बारा वर्षे कसे तुम्ही जगणार ? ॥३॥

वनवासाचे दुःख तुम्हाला

कळते जर का आधी मजला

तर मी नसते शतशृंगाला

आले सोडुन या नगरीला, जिथे दुःख अनिवार ॥४॥

धन्य तो पती धन्यही माद्री

पुण्यवन्त त्या नाहि पाहिली

दुर्दैवाची अशी सावली

मीच करंटी जगुन पाहते, प्रारब्धाचे वार ॥५॥

व्हाल कितीदा उदास हृदयी

फिरता रानी चालत पायी,

येतिल विघ्ने ठायी ठायी

मला तिथे न्या करीन हलका दुःखाचा हा भार ॥६॥

क्षणभंगुर ते जीवन म्हणती

अजून का नच मज चिरशांती

लिहिला विधिने जन्म ललाटी

वाटे लिहिण्या मरण विसरला भाळी जगदाधार ॥७॥

कशी राहु मी तुम्हा-वाचुनी

तुम्ही जन्मला शतनवसांनी

आठवण येइल सदोदित मनी

नक्षत्राविण रात्र तशी मी निष्प्राणच जगणार ॥८॥

डोळाभरुनी तुम्हा पाहु दे

मिठीत माझ्या तुम्हा घेउ दे

तुमचे शिर अश्रुंनी भिजु दे

कृष्णा, बनुनी नाविक माझ्या करि बाळांना पार ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP