हिडिम्बा तेथे असतानाच त्या रात्री तिचा भाऊ हिडिम्ब तेथे येऊन पोचला. त्याने भीमाला आह्वान दिले. नर-मांस भक्षणासाठी तो आतुर झाला होता. दोघांच्या तुंबळ युद्धात राक्षस ठार झाला. भीमाने कुंतीच्या संमतीने हिडिम्बेस स्वीकारले. तेथून पांडव एकचक्रा नगरीला आले. एका ब्राह्मणाने त्यांना आश्रय दिला. त्या भागात बकासुराचे अनाचर सुरु होते. त्याची दहशत पसरली होती. एकचक्रा नगरीतील लोकांनी बकासुराशी एक करार केला होता की गाडाभर अन्न, रेडा व एक मनुष्य असे रोज त्याच्याकडे पाठविले जाईल. ब्राह्मणाच्या कुटुंबावर आता पाळी आली होती. शोकाने सर्व रडत होते. ब्राह्मणाच्या घरातील बायको, मुलगी म्हणत होत की त्यांना पाठवा. ब्राह्मणाचे कर्तव्य होते की त्याने हे बलिदान स्वतः दिले पाहिजे. आपणच जाणार असे सांगणारा ब्राह्मण कुटुंबियांना जिव्हाळ्याने जे म्हणाला ते हृदयाला भिडणारे होते.
ब्राह्मणाचा निश्चय
बका राक्षसा देइन माझ्या प्राणांची आहुती
योग्य ही वाट दिसे संकटी ॥धृ॥
दुष्ट बकासुर इथे अधिपती
अती क्रूर त्या अचाट शक्ती
नरमांसाची त्या आसक्ती
किती मारिले दीन प्रजाजन त्यांची ना गणती ॥१॥
जुलुमांना त्याच्या कंटाळुन
करार केला भयभित होउन
रोज पाठवू बळी एकजण
क्रमाक्रमाने स्वामी घरचे एकाला धाडिती ॥२॥
दोन महिश अन् भात तीस मण
अन्नासोबत माणुस प्रतिदिन
खाद्य तयाचे असले भीषण
उद्या असे सर्वांची मजला करणे परिपूर्ती ॥३॥
नकोस भार्ये करु प्राणार्पण
मीच करावे कुटुंबरक्षण
बाळांचे तू कर संगोपन
तुझ्यावाचुनी कसे जगावे त्यांनी या जगती ? ॥४॥
पतीपूर्व तू मागशि मृत्यू
मिळेल सद्गति हा तव हेतू
निन्दित होईल पती परंतु
तुझ्यात माता सखी सचिव गे ही सगळी नाती ॥५॥
कन्या माझी ते तर परधन
ठेवस्वरुपी माझ्या स्वाधिन
कसे करु तिज असुरा अर्पण
तयार जाण्या पोर लाडकी ती प्रेमासाठी ॥६॥
जीव प्राण हे लेकही दोन्ही
जणु अपुल्या रत्नांच्या खाणी
पोरवयाचे ते अज्ञानी
क्रूरक्रूर मी ठरेन देता त्या असुरा हाती ॥७॥
इथे कसोटी कर्तव्याची
हीच मला आज्ञा धर्माची
पिता पती दोन्ही नात्यांची
करु द्या मजला प्राण देउनी त्यांची परिपूर्ती ॥८॥
नका रडू कोणी मजसाठी
ही तर आहे जगपरिपाठी
उकला ह्या स्नेहाच्या गाठी
करील रक्षण तुमचे ईश्वर, सर्व जगाचा पती ॥९॥