मोठमोठया व्यक्तींनी दुर्योधनाला समेट करण्याविषयी उपदेश केला पण तो दुराभिमानी व हट्टाग्रही असल्याने त्या उपदेशाचा काही परिणाम झाला नाही. त्याचे उत्तर ऐकल्यावर कृष्णाने अत्यंत परखड शब्दात त्याचे अक्षम्य अपराध सभेसमोर मांडले. दुर्योधनाची दृष्टी राज्यलोभामुळे अंध झाली होती. तो आपल्या मित्रांसह सभेतून उद्दामपणे निघून गेला. धृतराष्ट्राने विदुराला पाठवून त्याला व गांधारीला सभेत बोलावून घेतले. मातेने---त्या साध्वी गांधारीने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. कौरवांकडची ती धर्मनिष्ठ व सत्याचरणी अशी स्त्री सांगू लागली-----’सुयोधना, अजून जागा हो. कृष्णाचा समेटाचा सल्ला स्वीकार व हे संकट दूर कर. काम क्रोधांना जिकल्याशिवाय कोणीही राज्यलक्ष्मी टिकवू शकत नाही. तू दुःसंगती सोड व पांडवांचे राज्य त्यांना देऊन टाक. तू आपणहून कुलनाशाला कारणीभूत होऊ नको. तू पांडवांशी वैर करुन त्यांना खूप क्लेश दिले आहेस. ते ठरल्याप्रमाणे वनात राहिले. आता राज्य मागत आहेत. भीष्मांनी सर्व विचार करुन पांडूराजाला अभिषेक केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांना राज्य मिळायला पाहिजे. आता तरी तू ज्येष्ठांचा सल्ला ऐक आणि पांडवांशी समेट कर. त्यांच्या राज्यांशावर तुझा अधिकार मुळीच नाही.’
गांधारीचा उपदेश
सभेतील वृत्तांत ऐकून आले
तुला सांगते ऐक दुर्योधना रे
तुला प्रार्थितो कृष्ण प्रत्यक्ष येथे
हिताचेच ते शब्द स्वीकार सारे ॥१॥
वना धाडिले तूच त्या बांधवांना
पुढे राहिले गुप्त अज्ञातवासी
अती भोगले कष्ट कुंतीसुतांनी
करी सख्य आता तरी पांडवांशी ॥२॥
तुला सांगती ज्येष्ठ जे ऐक त्यांचे
मनःपूत वागू नको या प्रसंगी
समेटात आहे तुझे हीत, त्यांचे
तुझे राज्य दुर्योधना तेच भोगी ॥३॥
असे लोभ शत्रू तसे कामक्रोध
तिघांच्यामुळे जीवनी नाश खास
जय जिंकले ना रिपू हे मनाचे
कसे जिंकता शत्रु येतील त्यास ? ॥४॥
अती निग्रही सद्गुणी पार्थ सारे
विवेकी प्रतापी तसे नीतिमान
असे जे सदा बोलती भीष्मद्रोण
नसे ती प्रशंसा परी सत्य त्यांचे
नृपा त्यात आहे खरी न्याय-नीती
सुखासी तुझ्या राज्य अर्धे पुरे रे
करी सख्य तू जोड रे रक्त-नाती ॥६॥
पुरे आणखी दुःख त्यासी नको रे
नको पेटवू क्रोध त्यांच्या मनीचा
असे कृष्ण त्यांचा सखा दूरद्रष्टा
कसा साध्य होईल जय रे कुरुंचा ॥७॥
तुझा पक्ष घेतील युद्धात द्रोण
तसे भीष्मसुद्धा स्मरोनी मिठास
परी पांडवांच्या प्रती प्रेम त्यांचे
मनी इच्छिती ते तयांच्या जयास ॥८॥
नको वैर आता, नको सर्वनाश
नको युद्धरे या कुरुंच्या कुलात
तुला सांगते मी हिताचे तुझ्या रे
सुखे श्वास घेण्या करावा समेट ॥९॥