मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
सूर्याचे आवाहन

गीत महाभारत - सूर्याचे आवाहन

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


वनवासाच्या बाराव्या वर्षी कर्णाच्या कुंडलदानाची घटना घडते. कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये अगदी सुरवातीपासून स्पर्धा होती. दोघांनीही वेगवेगळ्या प्रसंगी परस्परांच्या वधाच्या प्रतिज्ञा घेतलेल्या होत्या. पांडवपक्षाकडे विशेषतः युधिष्ठिराच्या मनात कर्णाच्या प्रतापामुळे भय होते. इंद्रालाही त्याचा पुत्र अर्जुन याच्याविषयी चिंता वाटत होती. कर्णापाशी दिव्य कवचकुंडले होती; त्यांच्यामुळे तो अवध्य होता. इंद्राने ही कवचकुंडले ब्राह्मणरुपाने येऊन मागून न्यावीत असे ठरविले. कर्णाचे असे व्रत होते की तो सूर्योपासनेच्या वेळी येणार्‍या ब्राह्मणाला, याचकाला मागेल ते दान देत असे. कर्ण सूर्यभक्‍त होता. सूर्याने ब्राह्मणरुपाने कर्णाच्या स्वप्‍नात येऊन त्याला इंद्राच्या योजनेविषयी सांगून जागृत केले. त्याने आपली प्राणरक्षक कुंडले ब्राह्मणवेषात येणार्‍या इंद्राला देवू नयेत कारण अर्जुनाच्या हितासाठी तो हे करीत आहे असे सांगितले. कर्णाला कळते की हा सूर्यदेव आहे. तो क्षमा मागतो. आपले व्रत आपण सोडणार नाही कारण ते असत्याचरण ठरेल असे तो सूर्याला सांगतो. कर्ण आपल्या निर्णयावर ठाम आहे असे पाहिल्यावर सूर्य आपल्या भक्‍ताला वाचविण्यासाठी त्याला सांगतो की कुंडले दिली तर निदान शत्रूंना मारण्यासाठी इंद्राकडून एक अमोघ शक्‍ती मागून घ्यावी. कर्ण हे स्वप्‍न उपासनेच्या वेळी सूर्यास निवेदन करतो व सूर्य हा संवाद खरा आहे असे त्यास सांगतो.

सूर्याचे आवाहन

घेऊन विप्रवेषा भेटेल इंद्र तुजला

’तो’ येत मागण्याला ह्या दिव्य कुंडलाला ॥धृ॥

कवचासहीत यांचा तुज लाभ जन्मजात

झाला अवध्य यांनी आहेस जीवनात

यांच्यावरी रिपूचा आहेच नित्य डोळा ॥१॥

आराधना रवीची होताच याचकाला

विप्रास दान देशी, मागेल ते तयाला

दाता खरोखरीचा माहीत हे जगाला ॥२॥

जाणून या व्रतासी हरण्यास कुंडलांना

प्रत्यक्ष इंद्र येथे पसरेल हात कर्णा

हे दान त्यास देता रक्षील कोण प्राणा ? ॥३॥

देतोस याचकांना गज अश्व वित्त सर्व

शाईत अमृताच्या लिहितोस दानपर्व

लौकीक या करांचा जपणे सदा व्रताला ॥४॥

अचलात श्रेष्ठ मेरु, बाणात रामबाण

नागात तो अनंत, दानात श्रेष्ठ कर्ण

परि दान कुंडलांचे देऊ नको कुणाला ॥५॥

इंद्रास अर्जुनाची आहे अतीव चिंता

हा डाव टाकलासे रक्षावयास पार्था

जाणून या रहस्या घ्यावेस निर्णयाला ॥६॥

सौख्यात लोळणारा सोडील स्वर्गलोक

दुसरे नको म्हणेल मागेल दान एक

ही वञ्चना नव्हे का ? का पाळतो व्रताला ? ॥७॥

आहेस भक्‍त माझा, आदित्य मी नभींचा

भक्‍तास जागवावे हेतू असे मनीचा

द्यावेहि दान सगळे सोडून जीविताला ॥८॥

ऐकून घेतला मी कर्णा तुझा विचार

दानव्रतावरी रे तू ठाम राहणार

कीर्तीस बाध येणे नाहीच मान्य तुजला ॥९॥

करशील श्रेष्ठ कृत्ये तू राहता जिवंत

जीवीत नष्ट होता कीर्ती ठरेल व्यर्थ

रत्‍नात तेज नसता नच मोल त्या मण्याला ॥१०॥

समजा दिले तरीही इंद्रास दिव्य दान

तू माग त्याजपाशी रक्षावयास प्राण

"वधण्यास शत्रु माझे द्यावेत अस्त्र मजला" ॥११॥

येऊन विप्ररुपे, फसवील वज्रपाणी

उद्दिष्ट साध्य करुनी घेईल कुंडलांनी

देऊन अन्य काही संतोषवी तयाला ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP