मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
व्यासांना विनंती

गीत महाभारत - व्यासांना विनंती

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


भीष्म आपल्या प्रतिज्ञांवर ठाम होते. सत्यवतीची चिंता वाढत होती. विचित्रवीर्याच्या दोन्ही निरपत्य भार्यांकडे पाहून ती विषण्ण होत होती. भीष्मांनी नियोगाचा धर्म्य मार्ग तिला सांगितल्यावर तिच्या मनात आले की कृष्णद्वैपायन हा भीष्मांचा भाऊच ठरतो. तेव्हा त्या दीराला नियोगासाठी पाचारण केले तर काय हरकत आहे. तिने व्यासाला पाचारण करुन त्याची नियोगासाठी संमती मिळविली. दोन्ही सुनांनाही मनोदय कळविला. व्यास मुनींचे उग्र रुप, जटा व तेज अंबिकेला सहन झाले नाही. तिने द्वैपायनांच्या संगतीत डोळे मिटून घेतले. अंबालिकेचीही अशीच अवस्था झाली. ती निस्तेज होऊन गेली. दोघींनाही पुत्रप्राप्ती झाली पण अंबिकेचा धृतराष्ट्र अंध होता तर अंबालिकेचा पांडू फिकट वर्णाचा होता. सत्यवतीचे समाधान झाले नाही म्हणून तिने पुन्हा नियोगाचा आग्रह धरला. पण मोठया सुनेने अंबिकेने स्वतःऐवजी आपल्या दासीला शयनगृहात पाठविले. त्या दासीला जो पुत्र व्यासांपासून झाला तोच ज्ञानी विदुर !

व्यासांना विनंती

वंशज नाही कुणी कुळाला, चिंतित सत्यवती

भीष्मही खिन्न असे चिती ॥धृ॥

उदास होई माता पाहुन

रिक्‍त असे ते कुरुसिंहासन

राजमहाली प्रकाश धूसर, धूसरल्या भिंती ॥१॥

सांत्वन करुनी भीष्म सांगती

धर्मा संगत नियोग-रीती

दीर, विप्र वा ऋषिच्या द्वारा मिळवावी संतती ॥२॥

विप्रा विनवू द्रव्य देऊनी

भीष्मांचे मत ती नच मानी

पाराशर निज पुत्र आठवे या कार्यासाठी ॥३॥

कौमार्यातिल पुत्र तियेचा

शांतनवा वृत्तांत तयाचा

आठवला त्या व्यासमुनीचा, देइ त्यास संमती ॥४॥

स्मरताक्षणि हो मुनी उपस्थित

माता सांगे त्यास मनोगत

मातृवचनाला, कुलहित पाहुन, देइ मुनी स्वीकृती ॥५॥

"वंशासाठी हे स्वीकारा

पाठवीन मी शयनी दीरा"

आज्ञा वाटुन, सति-वचनाला, स्नुषा परी मानिती ॥६॥

लाल नेत्र अन् पीत जटेचे

उग्र रुप पाहिले मुनीचे

कौसल्येचे नेत्र भयाने शेजेवर मिटती ॥७॥

अंधपुत्र निपजेल हिला गे

अंतर्ज्ञानी मुनि तिज सांगे

म्हणून केले दुज्या स्नुषेला सिद्ध नियोगाप्रती ॥८॥

उग्र पाहुनी निकट तो मुनी

विगतवर्ण झाली ती शयनी

कांतिहीन सुत येईल पोटी व्यास तिला सांगती ॥९॥

निराश झाली सती अंतरी

त्यास पाठवी पुन्हा मंदिरी

स्नुषा धाडिते तिच्या दासिला निज-शेजेवरती ॥१०॥

दासी उदरी विदुर जन्मला

अंबिकेस धृतराष्ट्र जाहला

माता अंबालिका जाहली, पुत्र पाण्डु भूपती ॥११॥

प्रारब्धीं जे होते लिहिले

तसे पुत्र हे कुळा लाभले

पुत्रलाभ होऊन सतीला नसे परी तुष्टी ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP