मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
अनन्यभक्‍तीचा मार्ग

गीत महाभारत - अनन्यभक्‍तीचा मार्ग

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


दोन्ही पक्षाकडील सैन्य रणांगणावर स्तब्ध उभे होते. कृष्णार्जुन संवास सुरु होता. कौरवपांडवांकडील रथी महारथी उपस्थित होते. कर्ण मात्र तेथे नव्हता. युद्धाची तयारी सुरु असताना राजाच्या विनंतीवरुन भीष्मांनी कोण रथी, कोण महारथी याची गणना सुरु केली, त्याप्रसंगी त्यांनी कर्णाला ’अर्धरथी’ ठरविले. ह्या अपमानामुळे कर्णाने भीष्म पडेपर्यंत आपण युद्धात भाग घेणार नाही असे सांगितले. संजय युद्ध भूमीवरील गीतेचा उपदेश धृतराष्ट्राला कथन करु शकला कारण त्याला दिव्यचक्षू व दिव्यशक्‍ती मिळाली होती. धृतराष्ट्राने गीता ऐकली पण ती त्याच्या हृदयापर्यंत पोचली नाही. अर्जुन मात्र ज्ञानाने समृद्ध होत गेला. भगवंताने अर्जुनाला, जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरुप, क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, स्थितप्रज्ञ व त्रिगुणातीत यांची लक्षणे, विश्वाची निर्मिती व संहार, दैवी व आसुरी सम्पद, कर्मफलत्याग या सर्व विषयांचे मर्म विशद केले. त्याला आपले अगम्य, अन्चित्य असे विश्वरुप दाखविले. त्याला ईश्वराजवळ जाण्यासाठी आचरण्याला सुलभ असा निष्काम भक्‍तीचा राजमार्ग दाखविला. अर्जुन सखा होता व भक्‍तही होता म्हणून भगवंताने त्याला हे गुह्यज्ञान दिले. अर्जुनाने मोठया श्रद्धेने हे ज्ञान स्वतःच्या हृदयात रुजविले. त्याच्या बुद्धीतला मोह नष्ट झाला. भगवंताने अर्जुनाच्या द्वारा हे गीतेतील अमृत सर्वांच्या कल्याणासाठी अखिल मानवजातीला दिले आहे !

अनन्यभक्‍तीचा मार्ग

हा योग पूजण्याचा साकार ईश्वराला

भक्‍ती असे सुखाचा सोपान तारण्याला ॥धृ॥

निर्गूण तत्त्व व्यापी जगतास सर्वदूर

आराधनेत त्याच्या आहेत क्लेश फार

सगुणात तोच राही भज त्या जर्नादनाला ॥१॥

विश्वास निर्मितो मी संहारितो तयाला

विश्वापलीकडे मी, व्यापी कुणी न मजला

धाता, पिता, गती मी, आधार मी जगाला ॥२॥

विसरुन जो जगाला माझ्याच ठायि मग्न

मी तारितो तयाला संसारसिंधुतून

पाशातुनी सुटे तो वैकुंठलोक त्याला ॥३॥

संगास त्यागुनी जो आवरि सदा मनाला

सत्कर्म आचरी जो चिंती जनार्दनाला

सर्वांभूती दया ज्या तो भक्‍त प्रीय मजला ॥४॥

हा जीव अंश माझा मोहात गुंतलेला

जन्मे पुनःपुन्हा जो निजकर्म भोगण्याला

ही नाव भक्‍तिरुपी नेईल त्या तिराला ॥५॥

हा योग आचरावा हृदयात भाव धरुनी

श्रीमंत रंक अथवा स्त्रीवैश्यशूद्र कोणी

पापीहि जात तरुनी भजता जगत्पतीला ॥६॥

अचलात मी हिमाद्री, तारागणात चंद्र

आयुधात वज्र जाणा, यक्षात मी कुबेर

विभूती अनेक माझ्या भक्‍तास चिंतनाला ॥७॥

हृदयात वास माझा, चैतन्य तेच देही

हे रुप मूळ त्याचे, जीवास भान नाही

कस्तूरि नाभिकमली, परि जाण ना मृगाला ॥८॥

ही नाशवंत भूते, क्षर त्या पुरुष म्हणती

दुसरा पुरुष अक्षर, तो जाण प्रकृती ती

यांच्या पलीकडे जो त्या जाण उत्तमाला ॥९॥

निरपेक्षप्रेम देणे भक्‍ती असे खरी ही

संतुष्ट देव होई फलपुष्प अर्पुनीही

क्षय होय वासनांचा स्मरता मनी प्रभूला ॥१०॥

सत्त्वात ज्ञान वसते रज होय लोभकारी

अज्ञान-मोह-दाता तम हा विनाशकारी

सत्त्वात तेज मोठे - करि दूर मोहजाला ॥११॥

संपत्ति जाण दैवी तप, दान सद्‌गुणांची

संपत्ति आसुरी जी अज्ञान दंभ यांची

मोक्षास नेइ दैवी, असुरी अधोगतीला ॥१२॥

हे विश्वरुप माझे, बाहू मुखे अनंत

मी काळ, वीर रणिचे जाती पहा मुखात

जाणून ह्या रहस्या, राही उभा रणाला ॥१३॥

सरिता जशी वहाते सोडून रागद्वेषा

निःसंग ती मनाने, नाही तिला फलाशा

कर्मे अशी करावी, म्हणती ’अकर्म’ त्याला ॥१४॥

माझ्यात चित्त ठेवी, मजलाच येइ शरण

प्रिय तू म्हणून दिधले गुह्यात गुह्य ज्ञान

जाशील भक्‍तिपंथे अव्यक्‍त त्या पदाला ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP