मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
दुर्योधन-कृप-संवाद

गीत महाभारत - दुर्योधन-कृप-संवाद

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


कौरवांकडची एक मोठी शक्‍ती नष्ट केल्याचा आनंद अर्जुनाला झाला. त्याने घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. हे दारुण युद्ध पहायला इंद्रसुर्यादी देव आकाशात जमले होते व रणांगणावरील वीरही ते बघत होते. पांडवांकडे विजयाचा जल्लोष होत होता. कृष्णार्जुनांनी युधिष्ठिराला ही बातमी दिली व आता युद्धात विजय झालाच म्हणून सांगितले. युधिष्ठिराने रणांगणात जाऊन कर्णाचे मृत शरीर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले व पुन्हा कृष्णार्जुनांची त्याने प्रशंसा केली. कर्णप्रतापाच्या भयामुळे आपल्याला तेरा वर्ष नीट झोप आली नाही असे कृष्णाला सांगून त्याने त्या कर्णवधाच्या महान कृत्याचे मुख्य श्रेय कृष्णाला दिले. कर्णाचे निधन होताच रणांगणावर भीतीची छाया पसरली व योद्धे रणातून पळून जाऊ लागले. दुर्योधनाला हे वृत्त कळताच त्याने ’कर्ण, कर्ण’ म्हणून आक्रोश केला व तो शोकसागरात बुडून गेला. त्याच्या सैन्याचा, आप्तांचा, बंधूंचा नाश झाला होता. कर्णवधाच्या आधी भीमाने दुःशासनाला मारले होते व त्याचे रक्‍त प्राशन केले होते. फार थोडे वीर या संहारातून वाचले होते. दुर्योधनाचे सांत्वन करण्याकरिता कृपाचार्य आले. त्यांनी त्याला सल्ला दिला की पांडवांशी समेट करावा व उरलेल्यांचे प्राण वाचवावे. दुराग्रहाने सर्व नाश ओढवून घेणे इष्ट नव्हे. आता जयाची आशा नाही. युधिष्ठिर तुझ्यापुरते राज्य तुला देईल. पण दुर्योधनाने हा सल्ला मानला नाही. त्याने कृपांना स्पष्ट शब्दात खालीलप्रमाणे नकार दिला.

दुर्योधन-कृप-संवाद

प्रण जयांनी रणी अर्पिले

त्या सुहृदांचे ऋण ना फिटले ॥धृ॥

भीष्म, द्रोण, भ्राता दुःशासन

कर्ण जयद्रथ प्रियसुत लक्ष्मण

रक्षित होते कुरु-सिंहासन

लढता लढता प्राण वेचिले ॥१॥

संधि कराया मला सांगता

त्याग रथिंचा न ये विसरता

जीवित माझे अता रक्षिता

करतिल निंदा बांधव सगळे ॥२॥

केले मी पृथ्वीचे पालन

रिपूपुढे कर कधी न पसरिन

नको काहि मज त्यांचे हातून

राज्य अल्प जे पांडवे दिले ॥३॥

वृकोदराचा क्रोधहि दारुण

वैर न त्याच्या जाइ मनातुन

करील कंदन तो सूडातुन

मोल शमाचे त्याला कसले ? ॥४॥

प्रियभार्या जी पाचपतींची

विटंबना मी केलि तियेची

दिली यातना वनवासाची

खोल मनी त्यांच्या हे रुतले ॥५॥

अभिमन्यूच्या वधा ऐकुनी

नसे माधवा निद्रा नयनी

फाल्गुनासही शांति ना मनी

सिंह जणू हे असति दुखविले ॥६॥

पार्थहितास्तव शम करण्याला

आला केशव स्वये सभेला

दर्पाने ज्या नकार दिधला

शब्द न तो मानेल आपुले ॥७॥

महारथी मी क्षत्रिय साचा

तिरस्कार मज गृहमरणाचा

रुचेल मजला मृत्यु रणीचा

स्वर्ग-दार मज होतसे खुले ॥८॥

सारे वैभव सौख्य भोगले

या हातांनी दानही केले

शिर हे माझे कधी न नमले

कसे जगू जीवन हरलेले ? ॥९॥

माझ्या शब्दासाठी ज्यांनी

दिली आहुती प्राण अर्पुनी

त्यांचे ऋण फेडीन लढोनी

सुरु राहु द्या युद्ध आपुले ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP