सत्यवती मातेने अत्यंत तळमळीने केलेली प्रार्थना नव्हे आज्ञा ऐकल्यावर भीष्मापुढे पेच उभा राहिला. आपल्या दोन्ही भावांच्या मृत्यूचे दुःख त्याला होतेच पण रिक्त सिंहासन त्याला घेता येत नव्हते, कारण त्यात त्याच्या प्रतिज्ञेचा भंग होणार होता. त्याच्या कर्तव्याची कसोटी लागली होती. भीष्म महापराक्रमी होता तसाच शास्त्रवेत्ता व ज्ञानीही होता. कुळाला शोभेल, आपल्या तत्त्वनिष्ठ व उदात्त आचरणाला साजेल असाच निर्णय घेणे त्याला उचित होते. कुळावरील संकटाचा विचार करुनही तो डगमगला नाही. आपण आपल्या प्रतिज्ञांपासून ढळणार नाही असा तेजस्वी निर्णय त्याने आपल्या मातेला सांगितला.
भीष्माचे प्रत्युत्तर
वंदितो मी सांग माते धर्म माझा कोठला ?
कुंठते माझी मती गे पेच पाहुन आपुला ॥धृ॥
शोक माझ्याही मनाला बंधुनिधनाचा असे
कुरुकुलाला संकटाने वेढले माते कसे ?
शब्द मी पाळू कसा गे उचित वाटे ना मला ॥१॥
रीतिभाती ज्ञात असता काय तू हे सांगते
घेतल्या मी ज्या प्रतिज्ञा सर्वही त्या जाणते
शब्द मी प्राणाहुनीही जीवनी या रक्षिला ॥२॥
सुख पित्याचे पाहुनी मी वचन दाशासी दिले
राज्य हे चित्रांगदासी त्यामुळे मी सोपिले
मोडु त्या वचनास कैसे ? शोभते का ते मला ? ॥३॥
आजवर सत्यास धरुनी दक्षतेने चाललो
युद्धनियमा पाळुनी मी नित्य समरी जिंकलो
वाहणे गंगेस जैसे धर्म तैसा गे मला ॥४॥
शब्द पाळावा तुझा मी धर्म हा माझा जरी
मोडणे वचनास अपुल्या होय पातक ते तरी
तू नको सांगूस भीष्मा मार्ग सोडुन जायला ॥५॥
सांगतो निक्षून तुजला राज्य नच घेईन मी
दाशराजा वचन माझे, जन्मभर पाळीन मी
अन्यथा जाईल कीर्ती आजवर जपले जिला ॥६॥
जाणतो मी ह्या निपुत्रिक अंबिका अंबालिका
ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा सांग मी उल्लंघु का ?
गैर माझ्या वर्तनाने दूषवू का मी कुला ? ॥७॥
पश्चिमेला सूर्य जैसा ना कधी उगवायचा
शब्द भीष्माचा कधीहि नाही खोटा व्हायचा
शील मजला वंद्य माते, अन्य आज्ञा दे मला ॥८॥