दुर्योधन पांडवांशी वैर धरुन दुष्टवृत्तीमुळे त्यांच्या घाताच्या योजना आखीत होता. हस्तिनापुरातील पौरजन पांडवांच्या श्रेष्ठ गुणांची व पराक्रमाची चर्चा करु लागले. अंधत्वामुळे धृतराष्ट्र ज्येष्ठ असूनही पाण्डूला राज्य मिळाले तेव्हा आता त्याच्यानंतर कुलात ज्येष्ठ तसेच तेजस्वी व गुणवान अशा युधिष्ठिरालाच ते देणे उचित होईल असे ते बोलू लागले. ईर्ष्येमुळे दुर्योधनाच्या मनाचा जळफळाट झाला. त्याने धृतराष्ट्राला आपली व्यथा ऐकवली. पांडूच्या पुत्राला राज्य मिळाले तर ते पुढे त्याच्या पुत्राला कसे कायमचे त्याच्यात वंशात राहील व आम्हाला त्यांनी टाकलेल्या तुकडयावर जगावे लागेल म्हणून हे होता कामा नये, असे त्याने बजावले. कुंतीसह पाच पांडवांना वारणावतास राहायला पाठवून तेथे जतुगृह उभारुन त्यात त्यांना जाळून मारण्याचा गुप्त बेत त्याने आखला व त्या कटाचा सूत्रधार म्हणून पुरोचच नावाच्या सचिवाला नेमले. पांडवांनी कुठलाही संशय न धरता वारणावतास जाण्यासाठी तयार व्हावे यासाठी सन्मान्य ज्येष्ठांकडून त्यांच्यावर दडपण आणले. दुर्योधनाने पुरोचनाला विश्वासात घेऊन एकान्तस्थली नेले व हा कट गुप्तपणे कसा पार पाडायचा याची त्याला सविस्तर कल्पना दिली.
लाक्षागृहदाह
वादळ हे राजकुळी, मला मुळी सहवेना ।
काळे ढग चिंतिचे जमले रे पुरोचना ॥धृ॥
नगरीतिल मान्य लोक कुंतिसुता प्रशंसिती
माझ्याहुन राज्याला धर्म योग्य ते म्हणती
तोच गुणी, तोच पात्र वाटतसे भीष्मांना ॥१॥
कठिण अशा या वेळी तू मजसी साह्य करी
कुटिल बेत रचला मी गुप्त मनी ठेव परी
सार हेच जगतातुन दूर करी शत्रूंना ॥२॥
वारणावतास दूर पाठवु या पांडवांस
सावधान ते नसता चिरनिद्रा देइ त्यांस
मिटुन टाक शत्रूंच्या सत्तेच्या स्वप्नांना ॥३॥
द्रव्य, मान, गुणगाने सचिवांना वश केले
वारणावता तयें मजशब्दे प्रशंसिले
कुंतिसुतां मग रुचले जाण्याचे त्या स्थाना ॥४॥
कुंतीसह पाठवितो नगरीला पांडवांस
पाहतील मेळा तो, करतिल ते तिथे वास
शीघ्र, तिथे जाउन तू बांध रम्य जतुसदना ॥५॥
लवकर जे पेटतील लाख, राळ, तूप, तेल
या द्रव्यें बांध भवन उपयोजुन तव कौशल
येउ नये परि कुठला संशय त्या नगरजना ॥६॥
सांग पांडवास तिथे रहा सुखे या सदनी
रथ, आसन, शय्यांनी तुष्ट ठेव त्यांस मनीं
प्राप्त करी विश्वासा, ठेव धूर्त आचरणा ॥७॥
रहा तिथे मैत्रीने त्याच गृही त्यांच्यासह
वाट बघत सर्पासम डंखण्यास त्या दुःसह
कपटाची या अपुल्या चाहुलही नको कुणा ॥८॥
जाउ दे असाच काळ; रमल्यावर ते सदनी
दाट तमी रात्रीच्या झोपलेत ते बघुनी
साध कार्यभाग तुझा, पेटवून दे भवना ॥९॥
निद्रेतच ते क्षणात होतिल रे भस्मसात
लवलवत्या अग्निशिखा त्यांचा करतील अंत
वृत्त मला ते कळता, शांती लाभेल मना ॥१०॥
जागतील नागरजन पाहतील गृह जळते
मानतील आगीतच दग्ध सर्व झाले ते
निंदतील दैवाला, पाहुन ती दुर्घटना ॥११॥
द्रव्य विपुल देईन मी, कार्याचा उचल भार
असले जरि दुष्कर हे, पार पाड तू सत्वर
जीवनभर पुरोचना आठविन मी तुझ्या ऋणा ॥१२॥