धर्मराजाने धृतराष्ट्राला विदुराचे निधन झाल्याचे सांगितले. हे वृत्त कळताच धृतराष्ट्र, कुंती, गांधारी व पांडवांना अतिशय वाईट वाटले. व्यास त्यावेळी तेथे आले व त्यांनी विदुर यमाचा अंशधारी होता असे सांगितले. नंतर त्यांनी सर्वांशी सुसंवाद केला व त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या. या सर्व आप्तांना आपल्या मृत स्वजनांना पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा होती. ती इच्छा व्यासांनी आपल्या तपोबलाने पूर्ण केली. कौरव, कर्ण, सौभद्र, द्रौपदीपुत्र इत्यादी सर्व पृथ्वीवर अवतरले व आपल्या प्रियजनांना भेटले व परत गेले. नंतर पांडवांनी वृद्ध धृतराष्ट्राचा निरोप घेतला. धृतराष्ट्र आपल्या आश्रमात होमहवन व तपाचरण करीत असे; तसेच गांधारी, कुंतीही व्रतवैकल्यात मग्न असत. संजय त्यांची दक्षतेने देखभाल करीत असे. तिघेही वृद्ध तपाचरणाने व उपवासाने कृश झाले होते. एके दिवशी धृतराष्ट्राने होम आटोपला व तो त्या दोघींसह बाहेर पडला. गंगातीर थोडे अंतर चालल्यावर त्यांणा दावानल जवळ येत असल्याचे जाणवले. अग्नीचा लोळ वेगाने पुढे येत होता. धृतराष्ट्राने त्या अग्नीत आपली आहुती देण्याचे ठरविले. तिघेही वृद्ध खाली बसले. संजयाला मात्र धृतराष्ट्राने अग्नीपासून दूर जाण्याची आज्ञा केली. त्या अग्नीत तिघांचा अंत झाला. संजयाने हे नारदाला सांगितले व नारदांनी पांडवांना हे वृत्त दिले.
धृतराष्ट्र-निधन
उजाड झाले वनी तपोवन
वृत्त ऐकले दुःखद दारुण ॥धृ॥
नित्य करी धृतराष्ट्र तपाला
आहाराविण कृश तो झाला
जलाहार तो सुबलसुतेला
संजय त्यांचे करि प्रतिपालन ॥१॥
मासाचा उपवास पृथेला
नेत्र जणु ती गांधारीला
दुःख सांगती परस्पराला
येत सुतांची त्यांना आठवण ॥२॥
उग्र तपाची ती दिनचर्या
वृद्ध नृपाची झिजली काया
व्रते आचरित कुंती, भार्या
संजय राहि न त्यांना सोडुन ॥३॥
गंगेवरुनी ते येताना
दावानल दिसला वृद्धांना
अग्निज्वाळा चहू दिशांना
सुसाट वारे पेटविती वन ॥४॥
क्षीण क्षीण ती पडति पावले
लोट अग्निचे समीप आले
नृप सूताशी निक्षुन बोले
"दूर निघून जा अग्नीपासून" ॥५॥
नृपे ठरविले स्त्रियांबरोबर
अग्नी घ्यावा हा अंगावर
योग-युक्त तो बसे भूमिवर
तीन आहुती घेत हुताशन ॥६॥
राजकुळीच्या या श्रेष्ठांचा
अंत असा हा करुण जाहला
प्रिय पुत्र ते दूर नगरिला
सूत वाचला दैवे त्यातुन ॥७॥
संजय तेथुन शीघ्र निघाला
जाह्नविच्या तो काठी आला
मुनिगण तिथला वेढि तयाला
तये नारदा दिले निवेदन ॥८॥
नारद आले राजमहाली
दुःखद वृत्ते ही सांगितली
शोकाकुल ती प्रजा बोलली
शून्य भासते नगर नृपाविण ॥९॥
बाहु उभारुन रडे युधिष्ठिर
इतर पांडवा शोक अनावर
माता गेली अशी दुरवर
करु न शके कोणीही सांत्वन ॥१०॥