मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
कर्णाचे सूर्यास उत्तर

गीत महाभारत - कर्णाचे सूर्यास उत्तर

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


कर्ण सूर्यभक्‍त होता तरी त्याने सूर्यदेवाच्या आवाहनाला नम्रपणे नकार दिला. त्याचे दानव्रत सर्व जगाला विदित होते. त्याच्या दानाच्या व्रतात आतापर्यंत तरी खंड पडला नव्हता. व्रतभंग करुन ब्राह्मन वेषातील इंद्राला कुंडले न दिल्याने त्याची कीर्ती नष्ट झाली असती. त्याला आपल्या व्रतावर अढळ राहायचे होते व असत्याचरण घडू द्यायचे नव्हते. त्याने सूर्याला सांगितले की तो मृत्यूपेक्षाही असत्याला भीत होता. तसेच त्याला आपली कीर्ती अबाधित राहावी असे वाटत होते. त्याने म्हटले की कीर्ती ही मातेप्रमाणे माणसाचे इहलोकी रक्षण करते व मृत्यूनंतर परलोकीही आधार देते. कीर्तियुक्‍त मरण हे लोकसंमत व श्लाघनीय आहे. सूर्याने जेव्हा म्हटले की कुंडले दिल्याने तुझे प्राण संकटात येतील, त्यावर कर्ण म्हणाला की त्याची चिंता नको. त्याच्यापाशी अर्जुनाइतकीच अस्त्रविद्या आहे, त्या विद्येच्या जोरावर तो आपले रक्षण करु शकेल. इंद्र अर्जुनासाठी येतो आहे, शिवाय मुद्दाम रुप पालटून येतो आहे हे समजल्यावरही तो आपल्या व्रतावर ठाम राहाणार आहे. स्वर्गाचा अधिपती याचक आणि मानव दान देणारा हेच मुळी रोहहर्षक आहे. जेव्हा इंद्र आला तेव्हा कर्णाने आनंदाने आपली कवचकुंडले त्याला दिली व त्याच्याकडे शक्‍ती मागितली. कार्य संपन्न झाल्याने इंद्र सुखावला. त्यानेही कर्णाला प्राण संकटात असतांना एका शत्रूचा वध करील अशी अमोघ शक्‍ती बहाल केली.

कर्णाचे सूर्यास उत्तर

सांगसी हे काय भक्‍ता, तारकांच्या नायका ।

पाठवू विन्मूख कैसे दिव्य त्या मी याचका ॥धृ॥

वध्य मी होईन देवा दिव्य माझी कुंडले

अर्जुनासाठीच येई इंद्र हे मी जाणले

सत्यधर्माला परी मी होऊ कैसा पारखा ? ॥१॥

विप्र जो येईल माझ्या अर्घ्यदानाचे क्षणी

तुष्ट त्यासी करिन ईशा प्राणही हे अर्पुनी

घेतलेल्या या व्रताला पाळु द्या या सेवका ॥२॥

सत्य एकच धर्म माझा, सत्य जपतो मी मनी

कुंडलांचे दान देणे धर्म ठरतो जीवनी

रिक्‍त हस्ते इंद्र जाणे हा प्रमादच नाही का ? ॥३॥

नेउ द्या इंद्रास माझी प्राणरक्षक कुंडले

स्वर्गलोकीचा धनी तो येतसे माझ्याकडे

श्रेष्ठतम याहून याचक मानवा लाभेल का ? ॥४॥

इंद्र लपवी आपणाला वेष घेउन वेगळा

मी परी नीतीस जाणुन दान देइन त्याजला

कीर्ति मी राखीन लोकी, हे जगाच्या पालका ॥५॥

जीविताला अर्पुनी ही जपिन कीर्ती भास्करा

लोकपरलोकातसुद्धा नित्य रक्षिल ती मला

भंग करण्या या व्रताचा, पामरा सांगू नका ॥६॥

वध्य होइन मी जरी हे दान मोठे देउनी

ज्ञात मजसी अस्त्रविद्या करिल रक्षण ती रणी

दैव पाही सत्त्व माझे, ही कसोटी नाहि का ? ॥७॥

पुत्र कोणाचा असे मी जाणले हे ना कधी

सोसिले अवमान सारे, वाढलो सूतांमधी

चूक होता दोष देतिल, मी असा हा पोरका ॥८॥

प्रार्थना मी करिन इंद्रा शब्द मानुन आपुला

शत्रु माझे मारण्याला दिव्य शक्‍ती द्या मला

अर्जुनावाचून कोणा कर्णवध हा शक्‍य का ? ॥९॥

आज मी हे चरण वंदी भक्‍त तुमचा भास्करा

आपुले हे प्रेम पाहुन कण्ठ माझा दाटला

रक्षिण्या मज सूर्यदेवा, घेतले हे कष्ट का ? ॥१०॥

माजला कल्लोळ हृदयी शब्द अपुले ऐकता

प्रीय प्राणाहून आहे सोडु कैसे या व्रता

धन्य झालो जीवनी मी हे जगाच्या नायका ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP