मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
यक्षप्रश्न

गीत महाभारत - यक्षप्रश्न

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


वनातील काळ संपत असताना पांडव काम्यक वन सोडून द्वैत वनात आले. एकदा वनात हिंडताना ते थकले व तहानेने व्याकुळ झाले. कुठे जवळ सरोवर वगैरे आहे का हे पाहण्यासाठी युधिष्ठिराने नकुलाला पाठविले. तो बराच वेळ झाला तरी परत आला नाही. म्हणून सहदेवास पाठवले. चारही भाऊ एकापाठोपाठ तपास घ्यायला गेले. पण त्यांच्यापैकी कोणीच परत आला नाही. युधिष्ठिराला काळजी वाटली. तो स्वतः गेला. त्याला आपले बंधू एका सरोवरापाशी मृत अवस्थेत दिसले. तो ओंजळीत पाणी घेऊन पिणार तेवढयात त्याला आकाशातून शब्द ऐकू आले ---"हे सरोवर माझे आहे. हे चारही पुरुष माझे न ऐकल्याने मरण पाअले आहेत. माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिलीस तर तुला पाणी पिता येईल." युधिष्ठिराला संवादातून कळले की तो यक्ष असून त्याच्या आज्ञेविरुद्ध पाणी प्याल्याने आपले भाऊ मरण पावले आहेत. यक्षाने प्रश्न विचारला. त्याचे गूढ असे प्रश्न होते. युधिष्ठिर ज्ञानी होता, त्याने समर्पक उत्तरे दिली. यक्षाने प्रसन्ना होऊन विचारले, "माझ्या वराने मी एकाला जिवंत करीन, सांग तुला कोणता भाऊ जिवंत हवा आहे ?" धर्माने विचार करुन ’नकुल हवा’ असे सांगितले. भीमार्जुन सोडून नकुल का निवडला असे यक्षाने विचारताच धर्माने सांगितले की त्याचे दोन्ही मातांवर सारखेच निपक्षपाती प्रेम आहे. त्याक्षणी यक्षरुप टाकून यम प्रकट झाला व त्याने प्रसन्न होऊन सर्व बंधूंना जिवंत केले. यमाने धर्माची परीक्षा घेतली होती.

यक्षप्रश्न

"मज आधी द्यावे उत्तर माझ्या प्रश्नी ।

मग खुशाल प्यावे सरोवरातील पाणी ॥१॥

ऐकले न माझे शब्द तुझ्या बंधुंनी

ते मरण पावले पिताच येथिल पाणी" ॥२॥

हे शब्द ऐकले नभातले धर्माने

पाण्याची ओंजळ दिली टाकुनी त्याने ॥३॥

मग प्रकट जाहला यक्ष पर्वतप्राय

त्या म्हणे युधिष्ठिर "सांग प्रश्न तो काय ?" ॥४॥

यक्ष----"भूमीहुन मोठे, उंच नभाहुन काय ?"

तू सांग नरेशा, शीघ्र हवेहुन काय ? ॥५॥

युधिष्ठिर----भूमीहुन माता, पिता नभाहुन, मोठे

हे चित्त शीघ्र मज वार्‍याहुनही वाटे ॥६॥

यक्ष----झोपेत कोण तो मिटत नाही नयनांना ?

निजगृही कोण तो मित्र, कोण मरताना ? ॥७॥

युधिष्ठिर - झोपेत मत्स्य तो मिटतो ना डोळ्यांना

बा गृहात भार्या मित्र, दान मरताना ॥८॥

गिरितुल्य यक्ष तो प्रश्न विचारित गेला

करि धर्म उत्तरे देउन तुष्ट तयाला ॥९॥

"तुज हवा कोणता बंधू एक जिवंत

हे वचन ऐकुनी धर्म पडे पेचात ॥१०॥

भीमार्जुन तेथे माद्रीचेही सूत

काहूर माजले राजाच्या हृदयात ॥११॥

"मी नकुल निवडितो" सांगे पांडव ज्येष्ठ

"का नकूल ?" पुसतो यक्ष होउनी चकित ॥१२॥

त्या वदे भूप तो धर्मरुप साक्षात

"मज दोन्ही माता समान आणिक श्रेष्ठ " ॥१३॥

प्रकटला यम तिथे सांगे आनंदाने

"घेतली परीक्षा तुझी यक्षरुपाने" ॥१४॥

हा स्नेह पाहुनी माझे चित्त प्रसन्न

या चार पांडवा देतो मी जिवदान ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP