माझ्या नि वांगडनी
बारा वाड्याच्या बारा जणी
हातात कंण्णो फणी
वासुदेवाच्या सवासणी ।७६।
सक्रान नि गे कक्रान
त्या दोघी सवती
राळ्यांच्या राशीवरी
त्यांचो मारीलो गे पती ।७७।
सवती सवतीचा झगडां
गेलो गे बिदीर
दोघीच्या वैतागानी
मेलो आपण झालो जोगी ।७८।
हातात दस्त तांब्या
नार चालली कोणा देवा
सुगंधी तान्ही माझी
आपल्या कांताची करी सेवा ।७९।
दळप मींया दळी
ह्या ग हरभर्या जनाळ्यांचा
माझे नि माहेरीचा
नंदता कूटांब कानडयांचा ।८०।
पंढरे जाऊया मन
मला सोबत नाही कोण
विठ्ठल जे रुक्मीणी
विठेवर ती उभी दोन ।८१।
येईतो गुरुबाप
उतरलो आंबेवनी
गुरु माझे भैनी
चल जाऊया गुरुचरणी.```` ।८२।
सोरगीचे गे वाटे
यमाची बहू दारी
राम काही नामाची
माझ्या पदरी आहे चिठी ।८३।
सोरगीचे गे वाटे
यमाची गे जाचणी
सोडविल गे कोणी
सदगुरु गे वाचोनी. ।८४।
माझा माझा म्हणोनी
कोणाचा घरदार
येईल यमाची वरात
सगळा राहिल घरात. ।८५।
माझा माझा म्हणोनी
कोणाचे सपे लोटे
सोरगीचे गे वाटे
आत्मा चालले गे एकटे ।८६।
माझ्या नि दारावैल्यान
सरख्या जिवन्याची गाडी गेली
चोळीयेच्य खणासाठी
नाही ओळख दाखयली ।८७।
आई बाप परास
माझे सदगुरु बाप बरो
सोरगीचे गे वाटे
निर मारग दाखयिलो ।८८।
दुरुसुन गे देखिली
गुरुबापाची पाऊले
गुरुबाघाला देखोनी
मन माझे गे निवेले ।८९।
दुरुसून गे देखिले,
गुरुबापाचे नि गे चेले
गुरुबापाला देखोनी
मन माझे गे धावले ।९०।