आंगाची माझी चोळी
भिजली गदघामा
काही मी सांगू रामा
माझ्या मनीची कल्पना ।६१।
सोरवी जाते माते
तू सोरगी चढ पावणे
बोलल्या गे बोलाये
तुझे येतील आथणे ।६२।
शेजयेन दिली भाजी
मीया खाल्लय गुमानित
तिसर्या महिन्यात
शेजयेन काठली झगडयात ।६३।
फातोडेचे वारे राती
राती कोंबडे फडफडी
रथ हो धडोधडी
सुर्य देऊ तो बाण सोडी. ।६४।
एवढया दुनियेचा
संभाळ कोणी केला
गाईच्या वासरान
त्याच्या जुंवाला रवान दिला ।६५।
देव गेले भोवडेक
किरामोरांनी वेढला रान
देवाच्या सतवान
मृग आले ते भिंगरान ।६६।
तिनानू सानू झाल्या
लक्ष्मी दारी उभी
लक्ष्मी दारी उभी
घरनी बाईचा मन बघी. ।६७।
]
मांडिलो मीया रथ
मधी पोशाच्या वाईरान
थोरली माझी सून
झगडा मांडीता पयर्यान ।६८।
देवाच्या देवळात
सोन्याच्या वडवाणी
देवाच्या ये नाईकीनी
कैर लोटीती पायर्यानी ।६९।
माझ्या नि दारावैल्यान
कोण गेलो तो जानीयाचो
चंद्रमा सोनियाचो
माझ्या दारी उगवलो ।७०।
माझी नि चाडी निंदा
करिती माझ्या दाशी
मिठाच्या केल्या राशी
दाक्षी पापनी इरगाळीश ।७१।
रुमडाचा फूल
देवाच्या शोभे गेला
देवाच्या शिरी
शिरी कंमाळ उगवला ।७२।
गोपाची सरपोळी
माते ओढूनी लाव दिवे
दिराचे भावजय
मश्री झगड घालू नये ।७३।
घाटार घातला आळां
त्याची गगना गेली वाळा
आजयाळाच्या देवा
तुझ्या वेलीची आमी फळां ।७४।
सासर्या जाते लेकी
मधी फिरान काय बघी
बापाची बागशाही
सोना पिळूनी मजकाही ।७५।