जात्यावरील ओव्या
न्हाननी माझा घर,
सप्या लोट्यांनी दिसे थोर.
कापसाच्या गादयेवर
पटी वाचिता माझो बाळ.
दारातले केळी,
वाकडा तुझा बौण
नेणता तान्हा बाळ
शिरी कंबाळ त्याचा तौण
जायेच्या झाडाखाली,
कोण निजलो मुशाफिर,
त्याच्या नि मस्तकावर,
जायो गळती थंडगार,
आई वडिलांशी संबंधीत ओव्या
पाऊस नि गे लागे
आदो मिरग पानी करी.
माऊली चिंता करी,
लेकी उरल्या परघरी ।१।
दारतल्या वडा,
वडा, पाखरा करी कथा.
आईक शहाण्या बापा
लेक भिवरा देऊ नका ।२।
बापा वांगड गा कोणाचो,
दारातल्या तुळशिचो.
पोरसातल्या हळदीचो,
लेकी वांगड जन्मायो. ।३।
गडा नि रे गडाखाली,
गडा घातली लसूण.
बारा वरषा पोसून,
लेक झाली शेजारीलण. ।४।
माऊल्या नि रे मामा,
भाची दिल्लय कोणा गावा.
मोठ्याच्या बाजीरावा,
चिठी येईल, तुझ्या नावा ।५।
दुपारच्या नि रे भारा
भिड्यार घातली पोळी
सासु नि पिशी खुळी
नंदानी लावल्या कळी ।६।
जामेर जाम येती,
जामेच्या कोण परी.
भरलेल्या ताटावरी
माझी माऊली याद करी. ।७।
माता गे विचारी
लेकी बाईचा नूर गेला.
काई मी सांगू माते
ताम्याची माझी दूड
माते, तळयेचा पानी दूर. ।८।
लामनी माझे केस,
डोंगराच्या गे येली.
माऊली माता माझी,
जटा बघूनी तेल घाली ।९।
माझी नि तान-भूक,
पाऊली गे घरात.
माऊली गे दारात,
ताट भरूनी वाट बघी ।१०।
जीवनी माझो गेलो,
कळला माझे आई.
दारातल्या गे जाई,
जाई फुलाया विसरल्या ।११।
जीवनी माझी गेलो,
माऊ म्हणे ता बरा झाला.
दीर नि काय बोले,
माझा वर्षाचा कापाड रवला ।१२।
पाऊस नि गे पडे,
झडी येई ती वार्याची
माऊली माता माझी
पासोडी निवार्याची ।१३।
पाऊसाचा नि गे पाणी
खोलीये साटवला
माऊलीचा नि गे बोलणा
माझ्या मनी आठवला ।१४।
बारीक गे पीठाची,
भाकरी भाजिली चहूघडी.
मातेच्या रानपाची
याद येई ती घडोघडी ।१५।
बापान दिल्या लेकी,
देऊन झाला सुखी.
माऊली चिंता मोठी,
कशा नांदती माझ्या लेकी ? ।१६।
शेजेचे उपकार
मीया फिटयन भाजी पाल्या
मातेचे उपका
नाही फिटेना काशी गेल्या ।१७।
शेजीबाई गे रुसली,
मीया जोडीन दुसरी.
माता माऊली गे रुसली,
मीया पदर पसरी ।१८।
दारातल्या नि रे वडा,
पाखरा करी कथा.
आईक शाण्या बापा,
लेक देऊ नि भिवराला. ।१९।
लामनी माझे केस,
सर शेवटी मार गाठ.
भरल्या कुटुंबात,
पित्या वाचोनी नाही सुख ।२०।
जातानी मीया ओठी,
आंगनी माझा बळ.
माऊली माते माझे
वाजनी तुझा दूद ।२१।
मांडीली धर्म सेवा
ओढू गेल्या गे ओढेना
पुण्याची आईबाप
सोन्या दिल्या ग मेळेना ।२२।
पाऊसा गे वाचोनी
पाणी लागेना शेताला
माऊली गे वाचोनी
माया लागेना लोकांना ।२३।
नऊ महिने ग पोटी,
माता हिंडता रानावनी.
चांडाळ माझा मन,
नाही पाण्याची आठवण. ।२४।
नाचाण्याचा कुणो,
येईना काजकामा.
लेकीच्या जलमा,
नको घालू तू भगवाना. ।२५।
लेकीचो गे जलम,
शेरनी तुझो पाळी.
आई बापाच्या घरी,
लेकी शेवट नाही झालो. ।२६।
बाप गे देवऋषी
माता माझी नि गे काशी
तियेचे उद्र कुशी,
पुत्र जन्मलो सूर्यंवंशी
तियेचे दाये कुशी
मीया जन्मलय वनीशी ।२७।
बापान दिल्या लेकी,
मोठ्या त्या वानीयाला.
गंगेच्या पानीयाला,
बापान लोहील्या समुद्राला ।२८।
बापान दिल्या लेकी
वाटेच्या गोसायाला
तियेच्या नशिबाला
पालकी मेळली बसायला ।२९।
मातेची येडी माया
उभी रवळी दीड पाया
गावानी जात्या बंधू
गावी जाताना सांगा मज ।३०।