गोंदले माझे हात,
द्राक्षा पावली मुंबईत.
लाडको बंधू माझी
चुडो पाठई कागदात ।१।
काचीचो माझो चुडो,
जकाती आडयिलो.
लाडक्या बंधू माझ्या,
सोना देऊन सोडविलो. ।२।
रोहिणीच्या नि रे नागा
नागा, कोणी दुखयिलो
लाडको तान्हा बाळ,
नाग मंतिर शिकयिलो ।३।
न्हानूनी माझा घर
लप्या सप्यांनी दिसे धोर
लाडको तान्हो बाळ
भुतूर बैसलो लिनीदार ।४।
वाजेता वाजे तार,
सुटाच्या देशाचा राजा येता.
लाडको बंधू माझो,
दारी पिंपळ उजयिता. ।५।
वाजेत वाजे तार,
खुटाच्या देशाची राणी येता.
वडील भाऊजयी,
दारी तुळस उजयिता. ।६।
देवाच्या देऊळात,
पाच खेणीर पाच नाग
बहिणी बाई माझे
हात जोडूनी पुत्र माग. ।७।
दारातले तुळसी,
वाटगुळी तुझी पाना.
पिरतीची दोघाजणा,
तुळसी काढिता परदक्षणा. ।८।
दारातले तुळसी,
वाटगुळे तुझे खुर.
चहुगे माझे दीर,
सुर्यासारखा भरतार. ।९।
भरल्या बाजारात,
सुपारी झाली म्हाग.
गल्लीन येता राजा,
हिरव्या शेल्याचो बंधू माझो ।१०।
भरल्या बाजारात,
भाव बहिण भेटली.
तुझी नि माझी माया,
बंधू कशाने रे तुटली ?
काय मी सांगा भैनी,
नार अभण्णा भेटली,
अभण्णा नारीचो,
कुभण्णा गे शेजार
रीतीच्या गोस्टीसाठी
नारीन भरलो बाजार. ।११।
देवाच्या गे देवळात,
माझी निवली तानभूक.
दोघे गे माझे बंधू,
घराचे घरधनी.
तिघी गे आमी भैनी
सुखाच्या गे शेजारीणी ।१२।
गड नि रे गडाखाली,
गडा घातिली दुदीन.
लाडको बंधू माझो
घड घेईना बुधीन ।१३।
गडा नि रे गडाखाली,
गडा घातिली तवसीन.
लाडको बंधू माझो.
घड येईना हौशिन. ।१४।
दगल्या माझ्या जीवा,
जीवा, समिद्रा घेई उडी.
बांधव पैल तडी,
भैनी बाईला हात जोडी
फुलाची केली होडी
भैनी शोधिता दोनय तडी ।१५।