दुपारच्या निरे भारा
गोसावी आले भीके
धरम कर सीते
शिजलेल्या गे अन्नाचो
मुठीच्या गे दान्याचो
कितेचो धरम मोठो ।३१।
पाऊसा वाचोनी
बाहुल्या कमळणी
किरीष्णा वाचोनी
वेड्या झाल्या त्या गवळणी ।३२।
पाऊसा नि गे वाचोनी
बाहूल्या कमळणी
बापाच्या बहिणी
मला लेखती माऊळणी. ।३३।
नाचण्याचो कुणो
येईना काजकामा
लेकीच्या जलमा
नको घालू तू भगवाना ।३४।
साळीच्या तांदळात
भोंवरी निसाडली
पिरतीच्या जोड्यामधी
कोण विघ्नुली घुसडली ।३५।
इली नि लक्ष्मी
वटांगली सारनी
सुगंधी तान्ही माझी
मानावली घरनी. ।३६।
ईली नि लक्ष्मी
वटांगली गोनत्या
सुगंधी तान्ही माझी
मानावली नेणत्या``` ।३७।
भरल्या बाजारात
काळी कोंबडी ताळा तोडी
आताच्या राजीयात
म्हातारी मिरी म्होडी ।३८।
माझे मि माहेरीचे
काही दिसते राईरूक
देवाच्या देवळात
माझी निवली तानभूक ।३९।
दगल्या माझ्या जीवा
जीवा समीद्रा घेई उडी
बांधव पैल तडी,
बहिण बाईल हात जोडी
फुलाची केली होडी
बहिणी शोधिता दोनय तडी ।४०।
पानीया जाते नारी
आंचोनी खोई मिरी
येड्या जे पुरुषाची
नजार छातीवरी ।४१।
सासू नि सून भांडे
झगडा पावला गे बिदीर
जगनी काय बोलो
नार कोणा ही वर्गाची
उंच कुळीच्या सावुताची.`` ।४२।
दुपारच्या नि भारा,
भिड्यार घातली पोळी
सासु नि पिशी खुळी
नंदानी लावल्या कळी. ।४३।
भरली चंद्रभागा
पाणी खदूळ केला कोणी ?
केशवा माधवानी
जरा धुली त्या नारदानी. ।४४।
माऊळो नि गे भाचो
बैसलो एके तारी
माऊळो नि गे इच्यारी
भाच्या बाळाची जातकुळी
येड्या नि रे माम
तुझी बहिण माझी आई. ।४५।