एका कुत्रीस काही दिवसातच पिले होणार होती म्हणून तिने दुसर्या कुत्रीस विनंती केली की, 'बाई एक महिनाभर तुमचं घर राहायला द्या. माझं बाळंतपण झालं म्हणजे मी तुमचं घर तुमच्या स्वाधीन करीन.'
दुसर्या कुत्रीने 'ठीक आहे' म्हणून पहिल्या कुत्रीच्या विनंतीस मान दिला व घर रिकामे करून दिले.
एक महिना झाल्यावर घरमालकीण कुत्री त्या बाळंतीण झालेल्या कुत्रीस भेटण्यास गेली आणि अगदी मर्यादेने म्हणाली, 'बाई तुमचं सर्व बाळंतपण सुखरूपपणे पार पडलं हे पाहून मला आनंद होत आहे. तुम्ही आता घराबाहेर पडून आपल्या पिलांसह बाहेर हिंडूफिरू लागलात म्हणजे मला फार समाधान वाटेल.' ह्या भाषणातील अर्थ समजून पहिली कुत्री म्हणाली, 'खरंच बाई, मलाही मोठी लाज वाटते. तुमची जागा मी फारच दिवस अडवून ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला फार त्रास होत असेल. पण काय करणार ? माझी पिले फारच लहान, अशक्त आहेत. ती अजून चालू शकत नाहीत. तेव्हा अजून थोडे उपकार माझ्यावर करा व पंधरा दिवस मला येथे राहू द्या.'
घरमालकीण मोठी भिडस्त होती त्यामुळे तिने अजून पंधरा दिवसांची मुदत दिली. ही मुदत संपली तरी कुत्री घराबाहेर पडण्यास तयार होईना.
तेव्हा घरमालकीण कुत्री तेथे येऊन तिला म्हणाली, 'अग, तू अजून घराबाहेर पडत नाहीस. अशाने मला तुला बळजबरीनं बाहेर काढावं लागेल. असं काही व्हावं अशी तुझी इच्छा आहे का?' त्यावर पहिली कुत्री तिला म्हणाली, 'अस्स काय ? ठीक आहे ! मग तू मला कशी घराबाहेर काढतेस तेच मी पाहते. तू बळजबरीने काढशील तेव्हाच मी येथून हालेन.'
तात्पर्य - आपली एखादी गोष्ट दुसर्यास देण्यापूर्वी ती त्याकडून परत मिळेल किंवा नाही याची पूर्ण चौकशी करावी.