एकदा एका गाढवाला असे वाटले की, आपला मालक कुत्र्यावर फार प्रेम करतो, तर त्या कुत्र्यासारखे आपणही बागडलो, शेपटी हालविली व मालकाच्या मांडीवर चढलो तर मालक आपल्यावरही प्रेम करील. असा विचार करीत असताच मालक बाहेरून आला व ओट्यावर बसला. त्याला पाहताच गाढव त्याच्या समोर जाऊन प्रथम इकडून तिकडे उड्या मारू लागले, मग मोठ्याने ओरडले. ती मजा पाहून मालक खदखदून हसला. नंतर गाढवाने मागच्या पायावर उभे राहून पुढचे पाय मोठ्या प्रेमाने मालकाच्या अंगावर ठेवले व आता तेथे बसणार तोच मालक घाबरून मोठ्याने ओरडला. ते ऐकून घरातून त्याचा नोकर धावत आला. त्याने गाढवाला काठीने खरपूस मार दिला.
तात्पर्य - देवाने आपल्याला ज्या स्वरूपात जन्माला घातले आहे त्याचा आपण विसर पडू देता कामा नये.