एका हरिणाचा एक डोळा फुटला म्हणून ते नेहमी समुद्राकाठी चरत असे. समुद्राच्या बाजूने आपणास भिती नाही तेव्हा फुटका डोळा समुद्राकडे व धडका जमिनीकडे केला म्हणजे जमिनीवरून येणार्या शत्रूपासून आपला बचाव करता येईल असे त्याला वाटे. त्या हरणाची शिकार करण्यास एक शिकारी फार दिवस टपला होता. पण जमिनीच्या बाजूने त्याचा काही उपाय चालेना. मग तो होडीत बसून समुद्रातून हरणाजवळ आला व त्यावर गोळी झाडून त्याने त्याचा प्राण घेतला. प्राण जातेवेळी हरिण मनाशीच म्हणाले, 'अरे, काय हे दुर्दैव ! तुझी करणी विचित्र व अगम्य आहे. जिकडून मला धोका पोहचण्याची शक्यता होती तिकडून तो न पोचता मला सुरक्षित वाटणार्या बाजूनेच तो पोचला. खरच हा दैवयोग विचित्र आहे.'
तात्पर्य - आपण ज्याला मोठे विश्वासू समजतो, तेच प्रसंगी आपला नाश करण्यास प्रवृत्त होतात व जे आपणाला अविश्वासू वाटतात तेच प्रसंगी आपल्या उपयोगी पडतात, असे कधी कधी घडते.