रक्तवहस्त्रोतस् - उपदंश

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या -

उपदंश संज्ञाच दंशनोपाधिमंतरेनापि रुढा बोद्धव्या ।
मा. नि. उपदेश १. ३२४ पान म. टीका

दंश म्हणजे चावणें. चावण्यामुळें वा चावण्यावांचूनही एक विशिष्ट प्रकारचा पिडका गुह्यभागीं उत्पन्न होते. या व्याधीस रुढीनें उपदंश असें म्हणतात.

स्वभाव

दारुण, चिरकारी.

मार्ग

बाह्य.

प्रकार

पंचोपदंशा विविधापचारै: ।
यद्यप्यभिघातक्षते मेहने उपदंश आगन्तु: षष्ठ: संभाव्यते
तथाऽपि तस्य दोषलिंगयुक्ततया दोषज एवान्तर्भाव: ॥
मा. नि. उपदंश पान ३२४ म. टिका

वातज, पित्तज, कफज, रक्तज, सान्निपातिक असे उपदंशाचे पांच प्रकार आहेत. अभिघातानें क्षत उत्पन्न होऊन गुह्यभागीं उत्पन्न होणार्‍या उपदंशास आगंत् प्रकारामध्यें वेगळें न गणतां त्यामध्येंही दोष लक्षणांनाच प्राधान्य असल्यामुळें आगंतु उपदेशाला दोषज उपदंशांतच मोजिलें आहे. वेगळा आगंतू असा सहावा प्रकार मानिला नाहीं.

निदान

तत्रातिमैथुनादतिब्रह्मवर्याद्वा तथाऽतिब्रह्मचारिणी चिरो-
त्सृष्टां रजस्वलां दीर्घरोमां कर्कशरोमां संकीर्णरोमां
निगूढरोमामल्पद्वारां महाद्वारामप्रियामकामामचौक्ष
सलिलप्रक्षालितयोनिं योनिरोगोपसृष्टां स्वभावतो वा
दुष्टायोनिं वियोनिं वा नारीमत्यर्थमुपसेवमानस्य तथा
करजदशनविषशूकनिपातनाद्वन्धनाद्धस्ताभिघाताच्चतुष्प-
दीगमनादचौक्षसलिलप्रक्षालनादवपिडनाच्छुक्रवेगवि-
धारणान्मैथुनान्ते वाऽप्रक्षालनादिभिर्मेढ्रमागम्य प्रकुपिता
दोषा: क्षतेऽक्षते वा श्वयथुमुपजनयन्ति, तमुपदंश-
मित्याचक्षते ॥

वृद्धेरन्तरमुपदंशनां हेत्वाद्यभिधानमाह - तत्राति मैथुनेत्यादि ।
अतिब्रह्मचारिण्या मैथुनातिनिवृत्त्या सड्कुचितकर्कशयोनिमुखत्वात् ।
चिरोत्सृष्टां प्रभूतकालत्यक्तां, अत्रापि स एव हेतु: ।
ब्रह्मचारिण्या जन्मन: प्रभृत्यैव मैथुनाभाव: चिरोतसृष्टायास्तु
कदाचिदेवेत्यनयोर्भेद: । रजस्वलाया दुष्टार्तवप्रसंगात् ।
दीर्घकर्कशादिरोमाभि गमने पीडनाभिघातप्रसंगात ।
संकीर्णरोमा घनरोमा । निगूढरोमा अभ्यन्तररोमा ।
अल्पद्वारायामपि स एव हेतु: । महाद्वाराय शोफहेतुश्चिन्त्य
एव, तस्मात् केचिन्न पठन्ति ।
अप्रियायां लिंगानुत्थानेनेतश्चेताभिघात प्रसंगात् ।
अकामाया: सक्थि संकोचेन द्वाराल्पत्वात् । अचोक्षसलिल
प्रक्षालितयोने: सलिलदोषात् अचोक्षमपवित्रं अप्रक्षालितयोनि
स्वेदमलदोषात् । योनिरोगोपसृष्टाया रोगदोषानुसारेण
दोषोदयात् । स्वभावतो वा दुष्टयोनेर्वातादय एव कारणम् ।
वियोनिं हस्तजड्घान्तरं, तस्य कर्कशत्वात् । करजा नखा:,
दशना दन्ता:, शूकस्य सविषजलजकीटस्य निपातनाल्लिड्गादि-
शरीरे पातनादथवा तेषां मर्दनात् पीडनात् ।
चतुष्पद्योऽजादयो रासभ्यादयो वा, तासामप्यल्पारम्ययोनित्वात् ।
अचोक्षसलिलप्रक्षालनमत्र लिंगस्य न तु योने: ॥७॥
सु. नि. १२-७ नि.सं. टीकेसह ३१६ पान.

प्रौढवयापर्यंत ब्रह्मचर्य पाळल्यामुळें किंवा दीर्घकाळपर्यंत मैथुन न घडल्यामुळें जिचें योनिद्वार संकुचित, कठिण व खरखरीत झालेलें आहे अशा स्त्रीशीं मैथुन करणें, रजस्वला, गुह्यभागावर लांब वा राठ, दाट केस असलेली, योनिमुखाशीं, विशेषत: सीवनीपाशीं किंचित् आंत वळलेले केस असलेली (निगूढरोमा) योनिमुख जन्मत:च संकुचित् असलेली, महायोनि, रोगानें पीडित, कामेच्छा जागृत न झाल्यामुळें, जिनें योनिभाग आवळून धरला आहे, किंवा कामेच्छेच्या अभावीं जिची योनि कोरडी राहिली आहे, ज्या स्त्रीनें योनीची स्वच्छता राखलेली नाहीं किंवा योनि धुण्यासाठीं जिनें घाणेरडें, पाणी वापरलेलें आहे, अनेक प्रकारच्या योनिरोगांनीं जी पीडित आहे, जिची योनि विकृत आहे (वियोनी) अशा स्त्रीसवें मैथुन करणें, तसेंच नखें दांत विषयुक्त कीटक, आवळणें (चुरगळणें) हस्तमैथुन करणें, यांनीं शिश्नावर आघात होणें, पशुमैथुन करणें, मैथुनानंतर स्वच्छता न राखणें किंवा प्रक्षालनासाठीं घाण पाणी वापरणें, न आवडणार्‍या स्त्रीमुळें, शिश्नास पुरेसा ताठपणा न आलेल्या स्थितींत मैथुनकर्म करणें या कारणांनीं शिश्नावर प्रत्यक्ष दिसणारे मोठे किंवा सहज न दिसणारे बारीक असे व्रण उत्पन्न होतात व त्या ठिकाणीं संसर्गादि कारणांमुळें दोषप्रकोप होऊन ते पिडका उत्पन्न करतात. कटु अम्ल लवणादि आहार पिडकोत्पत्तीस सहाय्यक होतो. उपदंशाच्या कारणांत अतिब्रह्मचर्य असें एक कारण दिलें आहे. त्याचा संबंध उपदंशाशीं असणें एरवी कठीण आहे. परंतु ब्रह्मचर्य राखण्याच्या तंत्रामध्यें गुह्यभागांत स्पर्शही करुं नये या कल्पनेनें आवश्यक ती स्वच्छताही राखली जात नाहीं. शिश्नमणि आणि त्यावरील त्वचा यावर एक प्रकारचा पांढुरका मल नित्य सांठत असतो तो स्वच्छ केला जात नाहीं. या मलिनतेचा परिणाम म्हणून शिश्नाभागीं व्रण होतात व ते दुष्ट झाल्यास पिडका उत्पन्न होतात. त्या पिडका अनेक स्वरुपाच्या असतात.

``क‍ट् अवम्ललवणात्जन्तो: पित्तलस्यातिसेविन: ।
रक्तं प्रदूष्यत्यम्लं तदूदुष्टमनिलेरितम् ॥
करोति मेहनं प्राप्य श्वयथुं ..... ।
कथंचिदत्युपेक्षातस्ततो रक्तकफात्मिका ।
कर्णिका जायते तत्र सकण्डूका सवेदना'' इति ।
सृ. नि. १२-९ न्या. च. टिका पान ३१७

संप्राप्ति

या उपदंशाच्या सामान्य संप्राप्तींत कफपित्त हे दोष व त्वचा, रस, रक्त हीं दूष्ये आहेत. त्यामुळें त्वचेचे ठिकाणीं विविध लक्षणांनीं युक्त असे स्फोट उत्पन्न होतात. व्याधीचा उद्भव रस रक्तामध्यें होतो, अधिष्ठान त्वचेमध्यें असतें व संचार सर्व शरीरांत असतो.

पूर्वरुपें -

गुह्यभागीं व्रण उत्पन्न होणें, त्वचेच्या ठिकाणीं चुरचुरणें, कंडू हीं पूर्वरुपें असतात.

रुपें

``मेढ्रसन्धौ व्रणा: केचित् सर्वाश्रया: स्मृता: ।
कुलत्याकृतय: केचित् केचिन्मुद्गदलोपमा: ॥
रुजा दाहपरीताश्च तृष्णामोहसमन्विता: ।
शीघ्रं केचिद्विसर्पन्ति शनै: केचित्तथाऽपरे ॥
स्त्रीणां पुंसां च जायन्ते उपदंशा: सुदारुणा:''

सु. नि. १२-९ नि. सं टीका पान ३१७

पीडका उत्पन्न होते. ही पीडका शोथयुक्त असून हिचा स्पर्श सामान्यत: मृदु असतो व आकार हुलगा (कुळीथ) मूग यांसारखा लहान मोठा असतो. दाह, वेदना यांनीं युक्त अशा या पीडका असतात. तसेंच तृष्णा मोह हीं लक्षणें या व्याधीमध्यें असतात. या पीडका कांहीं वेळां पसरतात तर कांहीं वेळां पसरत नाहींत. हा व्याधी स्त्री व पुरुष या दोघांनाही सारख्याच प्रमाणांत उत्पन्न होतो. उपदंश हा व्याधी केवळ पुरुषांनाच होतो असें सुश्रुताचा टीकाकार गयदास आणि माधवाचे टीकाकार श्रीकंठ व वाचस्पति यांनीं म्हटलें आहे. ते स्त्रियांना उपदंश होतो हें म्हणणें अनार्ष आहे असें सांगतात. परंतु त्यांचें तें म्हणणें योग्य नाहीं. प्रत्यक्ष व तंत्रांतरांतील वचनें स्त्रियांना उपदंश होतो या विधानाशीं अनुकूल अशीं आहेत.

प्रकार

तत्र वातिके पारुष्यं त्वक्परिस्फुटनं स्तब्धमेढ्रता परुष-
शोफता विविधाश्च वातवेदना:; पैत्तिके ज्वर: श्वयथु:
पक्वोदुम्बरसड्काशस्तीव्रदाह: क्षिप्रपाक: पित्तवेदनाश्च;
श्लैष्मिके श्वयथु: कण्डूमान् कठिन: स्निग्ध: श्लेष्मवदेनाश्च:,
रक्तजे कृष्णस्फोट प्रादुर्भावोऽत्यर्थमसृक्प्रवृत्ति:
पित्तलिड्गदर्शनमवदरणं च शेफस: कृमिप्रादुर्भावो
मरणं चेति ॥९॥
सु. नि. १२-९ पा० ३१७

(१) वातज -
वातज उपदंशांतील फोड खरखरीत, फुटीर त्वचेनें युक्त, तोद, भेद, शूल, इत्यादि वात लक्षणांनीं युक्त व शोथ असलेले असे असतात. यामध्यें शिश्न स्तब्ध होणें (ताठ होणें किंवा आहे तसेंच राहणें) असें लक्षण असतें.

(२) पित्तज -
पित्तज उपदंशांतील स्फोट पिकलेल्या उंबरासारखे लाल रंगाचे, मृदु, अतिशय आग होणारे, लवकर पिकणारे असे असतात. त्यांतून दुर्गंधीयुक्त स्त्राव होतो. गुह्यभागीं शोथ असतो. रुग्ण ज्वर दाह या लक्षणानें पीडित होतो.
 
(३) कफज -
या उपदंशामध्यें पीटिकेचा स्पर्श त्या मानानें कठीण व स्निग्ध असतो. त्या ठिकाणीं कंडू असते. गौरव, अल्पवेदना, पिच्छिल स्त्राव, अशीं कफाचीं इतर लक्षणेंही असतात.

(४) रक्तज -
या उपदंशामध्यें स्फोट हे कृष्णवर्ण असून त्यांतून रक्ताचा स्त्राव होतो. ज्वर, दाह, शोष अशीं पित्ताचीं इतर लक्षणें असतात.

(५) सान्निपातिक - या उपदंशामध्यें तीनही दोषांचीं लक्षणें असून गुह्यभागीं भेगा पडणें, कृमी होणें, निरनिराळ्या प्रकारचे दुष्ट स्त्राव व वेदना असणें अशीं लक्षणें असतात. या प्रकारामध्यें मृत्यूही ओढवतो. (मा. नि. उपदंश ४)

उपद्रव

संजातमात्रे न करोति मूढ: क्रियां नरो यो विषये प्रसक्त:
कालेन शोथक्रिमिदाहपाकैर्विशीर्णशिश्नो म्रियते स तेन ॥५॥
मा. नि. उपदंश ५ पा. ३२५

शोथ, पाक, मांसकोथ, कृमी पडणें, ज्वर, दाह हे उपद्रव होतात.

उदर्क

नपुंसकत्व, अवयव झडणें, मृत्यु.

साध्या साध्यता

विशीर्णमांसं क्रिमिभि: प्रजग्धं मुष्कावशेषे परिवर्जयेच्च ॥४॥
मा. नि. उपदंश पा. ३२५

मांस सडणें, कृमी पडणें, या लक्षणांनीं युक्त उपदंश असाध्य होतो. मांस सडण्याचा परिणाम म्हणून कित्येकदां संपूर्ण शिश्न नाहीसें होतें व वृषण तेवढे उरतात. ही अवस्था असाध्य आहे. उपद्रवयुक्त सान्निपातिक उपदंश असाध्य होतो.

चिकित्सा

फिरंगाप्रमाणें

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP