रक्तवहस्त्रोतस् - क्रोष्ठुकशीर्ष

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


वातशोणितज: शोथो जानुमध्ये महारुज: ।
ज्ञेय: क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूल: क्रोष्टुकशीर्षवत् ।
मा. नि. वातव्याधी ५८ पान २०७

वातामुळें रक्ताची दुष्टी होऊन वातदुष्ट रक्ताची संचिती गुढघ्याच्या सांध्यांत होते. सांधा सुजतो, त्याचा आकार कोल्ह्याच्या डोक्याप्रमाणें वर रुंद दोन्हीकडे टेंगळे व खालीं निमुळता असा होतो. सांध्यामध्यें अत्यंत तीव्र अशा वेदना होतात. सांध्यांची हालचाल करता येत नाहीं. पुढें पुढें तर सांधा जखडून स्तंभ हे लक्षण उत्पन्न होतें. क्रोष्टुक शीर्षाच्या वर्णनांतील ``वातशोणितज:'' या शब्दावर मधुकोश व आतंकदर्पण याच्या टीकांमध्यें थोडेसें वेगळें वेगळें मत उद्‍धृत केलेलें आहे.

वातशोणितज इति वातरक्ताख्यविकारज: चिकित्सा-
भेदार्थ पृथक् पठित: इति गयदास: ।
वातशोणिताभ्यां जात: इति जेज्जट: ।
दृश्यते ह्ययं वातरक्तं व्यतिरेकेणापि जानुदेशनियत्वेन
विशिष्टलक्षणत्वेन चेतरवातरक्तशो थात् भेद इति ।
मधुकोश टीका

वातशोणिताभ्यां जातो वातशोणितज: न पुनर्वातरक्तेन
व्याधिना जनित: ।
अतंकदर्पण टीका ।

गयदासान वातरक्त नांवाच्या व्याधीपासूनच विशिष्ट स्थानीं होणार्‍या या विकाराची उत्पत्ती सांगितली असून चिकित्सा वेगळी असल्यामुळें वेगळ्या नांवानें हा विकार उल्लेखिला आहे, असें तो म्हणतो. विकाराच्यामध्यें केवळ स्थानभेदानें चिकित्सेंत अंतर पडत नाहीं. स्थानाची जात एकसारखीच असतांना तर चिकित्सेत विशेष फरक पडूं नये. लहान बोटांचेंहि संधीच आणि गुढगा हा आकारानें मोठा असला तरी संधीच. त्यामुळें वातरक्ताचा प्रकार विशेष म्हणून क्रोष्ठुकशीर्ष हा व्याधी असतां तर चिकित्साभेद गयदासानें सुचविल्याप्रमाणें स्पष्ट होण्याचें कारण नाहीं. आम्हांस जेज्जटाचें व आतंकदर्पणकाराचें मत अधिक योग्य वाटतें. मधुकोशकाराचा समन्वयाचा प्रयत्नही चांगला आहे. त्यानें वातरक्त या व्याधीमुळें उत्पन्न होणारा व वातरक्त व्याधी नसतांना वातदुष्ट रक्तामुळें उत्पन्न होणारा असा व्याधीचा द्विविध भेद `अपि' या शब्दानें दर्शित केला आहे. या व्याधींत शोथामध्यें द्रवसंचिताचें प्रमाण अधिक असल्याचें स्पष्ट दिसतें. संधीतील श्लेषक कफाच्या विकृतीचा परिणाम म्हणून ही द्रवसंचिती असते असें आम्हांस वाटतें. हा व्याधी निज कारणानें व आघातासारख्या आगंतू कारणानेंही उत्पन्न होतो. व्याधीचें स्वरुप क्वचित् आशुकरी बहुधा चिरकारी असतें. आशुकारी प्रकारांत ज्वर, मूर्च्छा अशी पित्तप्रधान लक्षणें असतात.

चिकित्सा

रक्तशोधक, वातानुलोमन, शोथघ्न अशी द्रव्यें वापरावीं. विम्लपनासाठीं - लताकरंज, टेंटू, काळाबोल, धत्तूर, पुनर्नवा, कुचला, शुंठी, यांचा लेप घालावा. काळाबोळ, लताकरंज, आरोग्यवर्धिनी गंधकरसायन, त्रिफळागुग्गुळ, सूक्ष्म त्रिफळा, सारिवा, मंजिष्टा, गुडूची कडेचिराईत अशीं औषधें पोटांत वापरावीं.

दिवास्वप्नं ससंतापं व्यायामं मैथुनं तथा ।
कटूष्णं गुर्वभिष्यंदि लवणाम्लं च वर्जयेत् ॥४९॥
च. चि. २९-४९ पान १४८७
९५० (५)

दिवसा झोंपणें, रागावणें, व्यायाम, मैथुन, कटु, उष्ण, गुरु, अभिष्यंदी, लवण व अम्लरसयुक्त आहार या गोष्टी वर्ज कराव्या.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP