व्याख्या
शनै: शनै: घनं शोफं श्लीपदं तत् प्रचक्षक्षे ।
वा. उ. २९-१९
शिलावत् पदम् श्लीपदम् ।
मा, नि. श्लीपद ३ म. टीका
हळूं हळूं अत्यंत घन अशा स्वरुपाचा शोथ विशेषत: पायावर येतो. त्यास श्लीपद असें म्हणतात. श्लीपद ही संज्ञा पारिभाषिक असून व्युत्पत्तिदृष्टया त्याचा अर्थ सांगतां येणार नाहीं, असें गयदासानें ( सु नि १२-१० टीका) म्हटलें आहे. मधुकोशकाराने तसा उल्लेख केला असलां तरी पाय शिळेप्रमाणें जड होतो म्हणून श्लीपद म्हणतात अशी एक व्युत्पत्ती दिली आहे.
स्वभाव
चिरकारी
मार्ग
बाह्य
प्रकार
तत्र त्रिविधं वातपित्तकफनिमित्तम् इति ।
सु नि १२-१०
श्लीपदाचे तीन प्रकार होतात वातज, पित्तज व कफज.
स्थानभेदानेंही कांहीं श्लीपदाचे प्रकार पाडलेले आहेत.
निदान
पुराणोदकभूयिष्टा सर्वर्तुषु च शीतला: ।
ये देशास्तेषु जायन्ते श्लीपदानि विशेषत: ।
सु. नि. १२-१४
नि. सं. - देशविशेष एवास्योत्पत्ति दर्शयन्नाह पुराणोदक-
भूयिष्ठा इत्यादि । अनूपदेशस्य पुराणोदकभूयिष्ठता ।
जाड्गलस्योन्नतसमभूतल त्वात् सलिलं पतितं न तिष्टति,
स्थितमपि रुक्षोष्णशुष्क त्वाद्देशस्य शोषमुपैति, तेन
जाड्गलदेशस्य शीतेऽप्यशीतता ॥१४॥
श्लीपदसंभवहेतुं देशमाह - पुराणोदकेत्यादि । अनूपदेशे हि
सलिलं पतितं बहूदकं निम्नतया न शोषमुपयाति, जांगले
त्वाग्नेयोन्नतभूभागत्वान्न पुराणोदकभूयिष्ठता ।
स्तिमितस्यानूपस्य मन्दातपत्वेनोष्णर्तावपिशीततेत्यत उक्तं
सर्वर्तुषु च शीतला इति ।
करकर्णादिगतश्लीपदसंदेहे कोपद्वारेण ज्वरेण च श्लीपदावधारणं
करणीयम् ।
मा. नि. म. टीका पा. २९३
पावसाचें पाणी चांगला निचरा न होतां पुष्कळ प्रमाणांत सांचून राहिल्यामुळें जो प्रदेश दलदलीचा होतो, तसेंच सर्वच ऋतूंमध्यें ज्या प्रदेशांत थंडी अधिक असते त्या देशांमध्यें श्लीपद हा व्याधी उत्पन्न होतो. माधवनिदानांतील साध्यासाध्य वर्णनावरुन कफ़ प्रवृती व कफ़कर आहारविहार हेही श्लीपदाच्या उत्पत्तीस कारणीभूत होतात असें म्हणता येईल. योगरत्नाकरांतील चिकित्सेवरुन अमिघात हेंही श्लीपदाचें कारण आहे असें दिसतें. (यो. र. ६३१ पान)
संप्राप्ति
प्रस्थिता वंक्षणोर्वादिमध:कायं कफ़ोल्बणा: ॥१२॥
दोषा मांसास्त्रगा: पादौ कालेनाश्रित्य कुर्वते ।
शनै: शनै:घनं शोफ़ं श्लीपदं तत्प्रचक्षते ॥१९॥
वा.उ. २९ १८, १९ पान ८८२
त्रीण्यप्येतानि जानीयात् श्लीपदानि कफ़ोच्छ्यात् ।
गुरुत्वं च महत्त्वं च यस्मान्नास्ति कफ़ं विना ॥५॥
मा. नि. श्लीपद ५ पा.२९३
जंघासु पिण्डीप्रपदोपरिष्टात्
स्याच्छ्लीपदं मांसकफ़ास्त्रदोषत् ॥९८॥
च. चि. १२-९८ पा. ११३४
तथाहि पुष्कलावत: ``ग्रीवावंक्षणजंघौष्ठपाद-
कर्णकराश्रयम् । श्लीपदं मांसभेदोभ्यां विद्यात्''
च, चि. १२-९८ पा. ११३५
य: सज्वरो वंक्षणजो भृशार्ति: शोथो नृणां पादगत: क्रमेण ।
तच्छ्रीपदं स्यात् करकर्णनेत्रशिश्नौष्ठनासास्वपि केचिदाहु: ॥
मा. नि. श्लीपद पा. २९२
कफकर आहारविहारानें कफप्रधान दोष अधोगामी रसवाहिन्यांतून वहात असतांना वंक्षण (जांघाडे) उरु, जानु, जंघा पोटर्या यांमध्यें अनुक्रमें संचित हात जातात व रक्ताला दुष्ट करुन घन, निबिड) असा शोथ पायावर उत्पन्न करतात. शोथ प्रथम वंक्षणभागीं येतो आणि क्रमानें पायाच्या इतर ---- पसरत जातो. क्वचित् वा तर्हेचा घन निबिड शोथ कर, कर्ण, नेत्र, ओष्ट, नासा व शिश्न यांवरही येतो. त्याला त्या त्या अवयवांच्या आश्रयांनीं असलेलें श्लीपद असें म्हणतात. ह्या व्याधीचा उद्भव रसवाहिनी सिरामध्यें होऊन अधिष्ठान रक्तमांसमेदामध्यें असतें तर व्याधीचा संचार बहुधा वंक्षणापासून पुढच्या पायामध्यें होतो.
पूर्वरुप
वंक्षण भागी गौरव अल्पशूल असें लक्षण पूर्वरुपामध्यें असतें.
रुप
वेदना, शोथ, आणि ज्वर हीं लक्षणें असतात. मात्र कफाधिक्यामुळें क्वचित् इतर व सर्व लक्षणांचा अभिनव होऊन गौरव घनस्वरुपाचा शोथ एवढींच लक्षणें या व्याधींत दिसतात.
प्रकार
वातज, श्लीपद कृष्णवर्ण, रुक्ष, तीव्र वेदनायुक्त, मधून मधून कोणतेंही विशेष कारण नसतांना अधिक शूल होणारें, त्वचा स्फुटित असलेलें व ज्वरयुक्त असें असतें. पित्तज श्लीपदामध्यें पीतवर्ण, दाह व ज्वर हीं लक्षणें असतात आणि स्पर्शाला हें श्लीपद इतर प्रकाराइतकें घन असत नाहीं. कफज श्लीपद श्वेतवर्ण, पाण्डु, स्निग्ध, गुरु, स्थिर, वेदनाहीन ग्रंथीयुक्त आणि ज्यांच्यावर मांसांकुर वाढले आहेत असें दिसतें.
चिकित्सासंदर्भानें लक्षणें
वातव्याधी, प्लीहा, गुल्म, अरोचक, अग्निमांद्य (यो. र. ६३१)
अपचे, गलगंड, वृद्धि, अर्बुद, ग्रहणी, शोथ, अर्श (यो. र. ६३१ पान)
स्थौल्य, गुल्म, कुष्ठ (वंगसेन पान ५६७)
वृद्धिस्थान क्षय
गौरव घनता व शोथ वाढत जाणें हें व्याधिवृद्धीचें लक्षण आहे. घनता व शोथ कमी होत जाणें हें श्लीपद व्याधी बरा होत असल्याचें लक्षण आहे.
उपद्रव
क्रिया हानि-ग्रंथी उत्पन्न होणें.
उदर्क
पाददौर्बल्य, शूल.
साध्यासाध्य विवेक
बल्मीकमिव संजातं कण्टकैरुपचीयते ।
अब्दात्मकं महत्तच्च वर्जनीयं विशेषत: ।
मा. नि. श्लीपद ४ पान २९२
यच्छ्लेष्मलाहारविहारजातं पुंस: प्रकृत्याऽपि कफात्मकस्य
सास्त्रावमत्युन्नसर्वलिंगं सकण्डुरं श्लेष्मयुतं विवर्ज्यम् ।
मा. वि. श्लीपद ७ पा. २९३
वारुळाप्रमाणें ज्याच्यावर लहान मोठया ग्रंथी उत्पन्न झाल्या आहेत, ज्याच्यावर काटयासारखे मांसांकुर वाढले आहेत, जें कफप्रकृती पुरुषाला कफकर आहार विहारांनीं झालें आहे, ज्यालाअ खाज फार आहे, जें त्रिदोषलक्षणांनीं युक्त आहे ज्यांतून स्त्राव येतो आहे, जें होऊन वर्षापेक्षां अधिक काळ लोटला आहे, जें फार मोठें झाले आहे, तें श्लीपद असाध्य असों.
चिकित्सा सूत्रें
सिराकफघ्नश्च विधि: समग्र-
स्तत्रेष्यते सर्षपलपेनं च ॥९८॥
च. चि. १२-९८ पान ११३,
लड्घनालेपनस्वेदरेचनै रक्तमोक्षणै: ।
प्राय: श्लेष्महरैरुष्णै: श्लीपदं समुपाचरेत् ॥९॥
वंगसेन श्लीपद पा. ५६४
श्लीपदावर सिरादुष्टी व कफप्राधान्य लक्षांत घेऊन चिकित्सा करावी. लंघन कटुतीक्ष्ण द्रव्यांनीं आलेपन, स्वेदन, विरेचन, रक्तमोक्ष व कफघ्न उष्ण गुणात्मक उपारच करावे.
कल्प
हारितकी, गोमूत्र, शिलाजत्, गुडूचि, सहदेवी, कण्हेर, करंज, हरिद्रा, दारुहारिद्रा, एरंड, शिग्रु, निशोत्तर, वरुण, पुनर्नवा, टेंटू, दशमुळें, सोनामुखी, देवदार, चित्रक, मोहरी, धोत्रा, एरंड, निर्गुडी, शिग्रु. पिपल्यादि चूर्ण, चतुर्भुजकल्प, सूतशेखर, श्लीपदावरील काढा, आरोग्यवर्धिनी, त्रिभुवनकीर्ति, गुग्गुळ, गोमूत्र, लेपगोळी, अहिफेन. जुन्या साठे साळी, यव, हुलगे, लसूण, पडवळ, शेवगा, यांच्या भाज्या हे पदार्थ खावेत.
पिष्टान्नं दुग्धविकृतिर्गुडमानूपमामिषम् ।
स्वाद्वलं पारियात्रं च सिन्धुविन्ध्यनदीजलम् ।
पिच्छिलं गुर्वभिष्यन्दि श्लीपदी परिवर्जयेत् ॥१॥
यो. र. ६३२
पिठाचे पदार्थ, दुधाचे पदार्थ, गूळ, आनूप मांस, मधुर व आंबट रस, पिच्छिल, अभिष्यंदी, गुरु अशी द्रव्यें, विंध्य पर्वतांतून उगम पावणार्या नद्या व सिंधू यांचें पाणी व पर्वतावर रहाणें वर्ज्य करावें.