रक्तवहस्त्रोतस् - दाह

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या :

दह्यते इति दाह: । शा. प्रथम ७/३६

आग होते, कढत वाटतें म्हणून दह म्हणतात.

स्वभाव:-

दारूण.

मार्ग:-

बाह्य, अभ्यंतर (प्रकारभेदानें)

प्रकार:-

दाहा: सप्त मतास्तया । शा. प्र. ७/३५

पित्तज, रक्तज, तृष्णानिरोधज, मद्यज, रक्तपूर्णकोष्ठज, धातुक्षयज, मर्माभिघातज, असे दाहाचे सात प्रकार होतात. क्षतज, दाह, नांवाचा एक वेगळा प्रकार जेज्जटानें सांगितला असल्याचें माधवाच्या मधुकोश टीकेमध्यें उल्लेखिलें आहे. मात्र संख्या सातच आहे. त्यानें रक्तज व पित्तज दाह एकच मानल्यासारखें दिसतें. वंगसेनानें पित्तज आणि तृष्णानिरोधज दाह एकच मानले आहेत असें दिसतें. प्राचीन पद्धतीप्रमाणें संख्या तीव ठेवण्याचा हा प्रयत्न असावा असें वाटतें. क्षतज दाहाचें वर्णन वंगसेन व योगरत्नाकर यांनीही केलेलें आहे.

निदान

तीक्ष्णं उष्णं पिबन् मद्यं दाहं प्राप्नोति मानव: ।
यो. र. दाह पान ४४१

तीक्ष्ण, उष्ण, कटुरसात्मक विदाही असे पदार्थ व मद्य यांच्या अति सेवनानें दाह हा व्याधी उत्पन्न होतो.

संप्राप्ति

निरनिराळ्या प्रकारांत उल्लेखिलेल्या वर्णनावरुन दाह व्याधीची संप्राप्ति पुढीलप्रमाणें मांडतां येईल. पित्तप्रकोप होऊन तें रक्ताचा आश्रय करतें आणि रसवाहिन्यांच्या द्वारा सर्व शरीरांत संचार करुन त्वचेच्या आश्रयानें दाह उत्पन्न करतें. हारीताचे वर्णन पुढीलप्रमाणें आहे.

समानस्संक्रुद्धो रुधिरमपि पित्तं त्वचिगतम् ।
नरस्यांगे दाहं भवति नितरां घोरमपि च ।
तदा दंतोद्धर्षो भवति मनुजां दाह उदये ।
भवेत् शीतस्यार्ति: श्वसनमपिवा शोषमरति: ।
हरित तृतीय २७ पान ३३८, ३३९

समान वायू व पित्त प्रकुपित होऊन रक्तगत होतें आणि त्वचेच्या ठिकाणीं उग्रस्वरुपाचा दाह सुरु होतो. यामुळें दांत शिवशिवणें, गार हवेंसे वाटणें, श्वास लागणें, कोरड पडणें, अरति अशीं लक्षणें होतात. व्याधीचा उद्‍भव रक्तामध्यें, अधिष्ठान त्वचेमध्यें व संचार स्थानभेदानें सर्व शरीरभर होतो.

रुपें

तृष्णा (शोष) अरति, भ्रम, श्वास, दाह. यांतील शोष व भ्रम ही लक्षणें पूर्वरूप म्हणून सांगतां येतील.

पित्तज दाह

पित्तज्वरसमः पित्तात्स चाप्यस्य विधिः स्मृतः ॥३॥
मा. नि. दाह ३

पित्तजमाह-पित्तेत्यादि ।पित्तज्वरसमः पित्तज्वरलिड्गयुक्तः
पित्तज्वरे त्वामाशयादुष्टयादयोऽधिका इति भेद: । स
चाप्यस्य विधीरिती पित्तज्वरचिकित्सा ॥३॥
टीका पान १७७

पित्तज दाहामध्यें पित्तज ज्वरप्रमाणें तीव्रज्वर, भ्रम, मद, तृष्णा, मूर्च्छा, स्वेद, प्रलाप, दाह हीं लक्षणें असतात.

रक्तज दाह :

कृत्स्नदेहानुगं रक्तमुद्रिक्तं दहति ध्रुवम ।
स उष्यते तृष्य़ते च ताम्राभस्ताम्रलोचन: ॥२॥
लोहगन्धाड्गवदनो वह्निनेवावकीर्यते ।
मा. नि . दाह २

रक्तजमाह-कृत्स्नेत्यादि । स उष्यते समीपस्येनेव वह्निना
तष्यते संच्युष्यत इति पाठान्तरे आचूषणवद्वेदनामनुभवति ।
ताम्राभ इति गात्रे । लोहगंधाड्गवदन इति लोहस्येव
गन्धोऽड्गे वदने च यस्य स यथा ॥२॥
टीका पान १७६

पित्तप्रकोप व रक्तवृद्धि होऊन पित्तदुष्ट रक्त सर्व शरीरभर संचार करतें. व दाहव्याधी उत्पन्न होतो. या प्रकारांत अग्नीजवळ शेकत बसल्यासारखें वाटणें, सर्व शरीरांत चोखल्या गेल्यासारख्या संवेदना होणें, तहान लागणें, त्वचा लाल होणें, डोळे लाल होणें, तोंडाला व शरीराला गंजलेल्या लोखंडाप्रमाणें वास येणें, अंगावर निखारे पडल्याप्रमाणें वाटणें, अशीं लक्षणें होतात. हा व्याधी रक्तपित्ताच्या पूर्वरुपासारखाही असूं शकतो. वाहिन्या फुटून स्त्राव होण्याइतकी रक्तदुष्टी अधिक नसल्यास किंवा वाहिन्यांचें बल चांगलें असल्यास पित्तदुष्ट रक्तानें केवल दाह व्याधी उत्पन्न होतो.

तृष्णानिरोधज दाह :-

तृष्णानिरोधादब्धातो क्षीणे तेज: समुद्धतम् ।
सबाह्याभ्यन्तरं देहं प्रदहेन्मन्दचेतस: ॥४॥
संशुष्कगलताल्वोष्ठी जिह्वां निष्कृत्य वेपते ।
मा. नि. दाह ४

तृष्णानिरोधजमाह - तृष्णेत्यादि । तेज: समुद्धतं पित्तोष्मा
वृद्ध इत्यर्थ: । निष्कृत्य नि:सार्य ॥४॥
टीका १७७ पान

तृष्णा लागली असतांही पाणी न प्याल्यामुळें शरीरांतील अप्‍ धातूचें शोषण होऊन तो क्षीण होतो, पित्ताची वृद्धि होते आणि हें वृद्धपित्त रसरक्तगत होऊन दाहव्याधी उत्पन्न करतें. या प्रकारांत ओष्ट, तालू व गळा हे अवयव कोरडे पडतात; जीभ आंत ओढल्याप्रमाणें वाटते व कापरें भरतें. अत्यंत उष्ण प्रदेशांत पाणी न पितां बराच वेळ उन्हांत हिंडलें आणि परत आल्यानंतरही योग्य वेळीं जलपान केलें नाहीं तर या प्रकारचा दाह उत्पन्न होतो.

मद्यज दाह

त्वचं प्राप्त: स पानोष्मा पित्तरक्ताभिमूर्च्छित: ।
दाहं प्रकुरुते घोरं पित्तवत्तत्र भेषजम् ॥१॥
मा. नि. दाह १

मदात्ययेऽपि दाहो भवत्यत: सप्तप्रकारं दाहमाह, तत्र
मद्यजमाह - त्ववमित्यादि । पानोष्मा मद्यपानकुपितपित्त-
स्यौष्ण्यं, समानोष्मेति पाठान्तरमयुक्तं, सुश्रुते पानात्यये
श्लोकस्यास्य पाठात् । पित्तजोऽप्ययं हेतुभेदापृथक् पठित: ।
टीका पान १७६

अति मद्यपानामुळें मद्यांतील तीक्ष्ण, उष्ण, व्यवायी, विकासी हे गुण पित्तास व रक्तास दुष्ट करुन दाह उत्पन्न करतात. त्वचेची आग होणें हें या प्रकारांत लक्षण असतें. मद्यामुळें पित्ताची उष्णता वाढून त्वचेची आग होते.

रक्तपूर्णकोष्ठज दाह

अंसृज: पूर्णकोष्ठस्य दाहोऽन्य: स्यात्सुदुस्तर: ॥५॥
मा. नि. दाह ५

अवगाढशस्त्रप्रहारजनितरक्तपूर्णकोष्ठजमाह - असृजमित्या-
दि न चोक्तरक्तजेनास्य पौनरुक्त्यं, कृत्स्नदेहानुगमिति वच-
नात् कारणभेदाच्च । असृज: पूर्णकोष्ठस्येति ``पूरणगुण-
सुहितार्थ'' - इत्यादिना ज्ञापकेन कर्तरि षष्ठी, रक्तेन पूरित-
कोष्ठस्येत्यर्थ: । कोष्ठशब्देन हृदयादयो गृह्यन्ते । यदाह
सुश्रुत:- स्थानान्यामाग्निपक्वानां मूत्रस्य रुधिरस्य च ।
हृदुण्डुक: फुफ्फुसश्च कोष्ठ इत्याभिदीयते'' (सु. चि. स्या. अ. १)
इ. ॥५॥
टीका पान १७६

रक्तस्त्राव होऊन कोष्ठ भरल्यास दाह उत्पन्न होतो कोष्टामध्यें होणारा हा रत्रस्त्राव अन्नवहस्त्रोतस्, पक्वाशय, बस्ती, गर्भाशय, प्लीहा, यकृत्, क्लोम, वृक्क, हृदय व फुफ्फुस यांपैकीं कोणत्याही अवयवामध्यें व्याधीचा परिणाम म्हणून, आघातानें वा शस्त्रानें होऊं शकतो.

धातुक्षयजदाह

धातुक्षयोक्तो यो दाहस्तेन मूर्च्छातृडर्दित: ।
क्षामस्वर: क्रियाहीन: स सीदेद्‍भृशपीडित: ।
मा. नि. दाह ६ पान १७७

धातुक्षयजमाह-धात्वित्यादि । धातवो रसादय: ।
क्रियाहीनो निचेष्ट: किंवा भृशपीडितो दोहन क्रियाहीन:
चिकित्साहीनो यदि भवेत्तदा सीदेन्म्रियत इत्यर्थ: ॥६॥
टीका पान २७७

निरनिराळ्या कारणांनीं रसादिधातु क्षय पावल्यामुळें पित्ताच्या उष्णतेनें हा उत्पन्न होतो. या प्रकारांत मूर्च्छा, तृष्णा, आवाज खोल जाणें, ओढल्यासारखा होणें, हालचाली मंदावणें (क्रियाहीनत्व) व दाह हीं लक्षणें दिसतात. तृष्णानिरोधज दाह आशुकारी व धातुक्षयजन्य दाह चिरकारी असा भेद आहे. एरवीं संप्राप्ती सारखीच आहे. रसादिधातूंच्या स्निग्धगुणामुळें पित्ताची उष्णता नियंत्रित रहाते आणि ती लक्षणें उत्पन्न करुं शकत नाहीं. हे धातू कमी झाल्यास पित्तावरचें नियंत्रण नाहीसें होऊन पित्तवृद्धीचीं लक्षणें उत्पन्न होतात. धातुक्षयजन्यदाह हा राजयक्ष्म्यामध्यें उपद्रव म्हणूनहि असतो.

मर्माभिघातज दाह : -

मर्माभिधातजोऽप्यस्ति सोऽसाध्य: सप्तमो मत: ।
सर्व एव च वर्ज्या: स्यु: शीतगात्रस्य देहिन: ।
मा. नि. ७

मर्माभिधातजमाह - मर्मेत्यादि । मर्माणि शिरोहृदय बस्त्यादीनि ।
जेज्जटस्तु सप्तत्वमन्यथा गणयति, `त्वचं प्राप्त' इत्यादिना प्रथम:
कृत्स्नदेहानुगं रक्तं इत्यत्र रक्तस्थाने पित्तं पठित्वा एतदादिना' स
चाप्यस्य विधि: स्मृत: इत्यन्तेन पैत्तिको द्वितीय: तृष्णानिरोधजतृतीय:,
असृज: पूर्णकोष्ठस्य इति चतुर्थ: धातुक्षयज: पञ्चम: षष्ठस्य तु
क्षतजस्य लक्षणं पठति ``क्षतजोऽनश्नतश्चान्नं शोचतश्चाप्यनेकधा ।
तेनान्तर्दह्यतेऽत्यर्थ तृष्णादाहप्रलापवान्'' इति मर्माभिधातज्स्तु
सप्तम इति ॥७॥
टीका पान १७८

शिर, बस्ती, हृदय यांसारख्या मर्मावर अत्यंत जोराचा आघात झाल्यामुळें ओजाची विकृती होऊन सर्व शरीरभर दाह हें लक्षण उत्पन्न होतें. मोह, मूर्च्छा, प्रलाप, तृष्णा, ज्वर हीं लक्षणेंहि अनुषंगानें असूं शकतात.

क्षतज दाह :-

मर्माघातजावरील मधुकोश टीकेमध्यें जेज्जटानें उल्लेखलेल्या क्षतज दाहाचें वर्णन आलेलें आहे. त्याचा अर्थ असा -
व्रणपीडित रुग्णानें चांगलें संतर्पण होईल, बृंहण होईल असा आहार घेतला नाहीं, उलट फार शोक केला, काळजी केली तर पित्तप्रकोप होऊन दाहव्याधी उत्पन्न होंतो. या प्रकारांत अभ्यंतर दाह, तृष्णा, प्रलाप, मूर्च्छा अशी लक्षणें असतात. (वंगसेनानें `तृष्णामूर्च्छा प्रलापवान्' असा पाठ सांगितला आहे.) मधुकोशाच्या पाठापेक्षां तो जास्त योग्य आहे.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें : -

ज्वर तृष्णा, शोष, रक्तपित्त (यो. र. पान ४१३. दाह) .
मूर्छा भ्रम छर्दि हृद्‍रोग उन्माद (यो. र. पा. ४१४.).
रक्तपित्त, श्वास, गुल्म, अंगदाह, शिरोदाह, शिरोविभ्रम, कामला, प्रमेह, पित्तज्वर (यो. र. ४१४ पान)

वृद्धि स्थान क्षय :-

त्वचा लाल होणें, मूर्छा, प्रलाप व अरति हीं दाहव्याधीच्या वृद्धीचीं लक्षणें आहेत. शीताची आवश्यकता न वाटणें या लक्षणानें व्याधीचा क्षय झाल असें समजावें.

उपद्रव - ज्वर, मूर्छा, रक्तपित्त.

उदर्क - दौर्बल्य, तृष्णा.

साध्यासाध्य विवेक :-

रक्तपूर्णकोष्ठज, धातुक्षयज आणि मर्माभिघातज हे प्रकार असाध्य आहेत. दाह होत असून अंग गार पडलेले असल्यास सर्वच रोगी आसाध्य होतात.

रिष्ट लक्षणें

श्वास व मूर्च्छा हीं लक्षणें रिष्टलक्षणें मानावींत.

चिकित्सासूत्रे

शीतवातजलस्पर्श: शीतान्युपवनानि च ।
पित्तज्वरहरं यच्च दाहे तत्कार्यमिष्यते ॥१४॥
वंगसेन पा. ३०६

दाहेऽतिशिशिरं तोयं क्रिया कार्या सुशीतला ।
यो. र. दाह. चिकित्सा पान ४१२

दाहव्याधीमध्यें पित्ताप्रमाणें शीतल उपचार करावेत. गार वारा आणि वृक्षवेलींनीं परिवेष्टित अशीं शीतल गृहें यांमध्यें रुग्णास ठेवावें. गार लेप द्यावा.

कल्प

चन्दन, वाळा, तृणपंचमूळ, सारिवा, गोखरु, कमल, मालतीपुष्प, जातिपुष्प शतपत्री (गुलाब) प्रवाळ, मौक्तिक, आमलकी, द्राक्षा, दाडिम. चन्द्रकलारस, सूतशेखर, वसंतकुसुमाकर, कामदुधा, शतघौतघृत.

आहार

फलरस, शीतपानक मंड पेया यूष दुग्ध.

अपथ्य

व्यायाम करणें, उन्हांत फिरणें, विष खाणें व मैथुन या गोष्टी वर्ज्य कराव्या. कटु तिक्त, उष्ण, विदाही असे पदार्थ, ताक व हिंग वर्ज्य करावे.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP