रक्तवहस्त्रोतस् - रोमांतिका
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
रोमकूपोन्नतिसमा रागिण्य: कफपित्तजा: ।
कासोरोचकसंयुक्ता रोमान्त्यो ज्वरपूर्विका: ॥१३॥
मा. नि. मसूरिका १३ पा. ३५७
क्षुद्रप्रमाणा: पिडका: शरीरे
सर्वाड्गगा: सज्वरदाहतृष्णा: ।
कण्डूयुता: सारुचिसप्रसेका
रोमान्तिका: पित्तकफात् प्रदिष्टा: ॥९२॥
च. चि. १२/९२ पां. ११३४
माधवनिदानादि ग्रंथांच्या टीकाकारांनीं रोमांतिका हा मसूरिकेचा प्रकार म्हणून सांगितला असला तरी त्याच्या पिडकांचें स्वरुप निराळें आहे. या पीडका अगदीं लहान फार न उंचावलेल्या व स्त्रावरहित अशा असतात. त्या रोमकूपांशी निर्माण होऊन थोडया पसरट होतात. त्यांचा वर्ण आरक्त असतो. रोमकूपाजवळ त्याची निर्मिती असल्यामुळें त्यांना रोमांतिका हें नांव प्राप्त झालें आहे. दोषदूष्यांच्या बलाबलाप्रमाणें रोमांतिका सर्व शरीरावर उत्पन्न होत असल्या तरी तोंड, पाठ, पोट, यांवर त्या विशेष दिसतात. यांच्यामध्यें ज्वर हें लक्षण पूर्वरुप व रुप या दोन्ही अवस्थेंत असतें. रोमांतिका अंतरवेगी असल्यास ज्वर, दाह, तृष्णा, मोह, अरति हीं लक्षणें अधिक उत्कटतेनें असतात. बहिर्वेगी रोमांतिकेमध्यें कंडू व आरक्तवर्ण पीडका ज्वर हीं लक्षणें विशेष असतात. अरुचि, प्रसेक हीं कफदुष्टी व अग्निमांद्य यांचीं द्योतक अशीं लक्षणें रोमांतिकेमध्यें आढळतात. व्याधी बहुधा साध्य स्वरुपाचा असतो. तीव्र ज्वरवेगयुक्त, अंतरवेगी रोमांतिका कष्टसाध्य व असाध्य होतात.
उपद्रव
कास, वातकफज्वर, रक्तपित्त, अतिसार श्वास, मूर्च्छा हे विकार उपद्रव म्हणून आढळतात. रोमांतिकेलाच लौकिकामध्यें गोंवर असें म्हणतात.
चिकित्सा
मसूरिकेप्रमाणें करावी. कोंचाचा काढा द्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP