व्याख्या -
त्वच: कुर्वन्ति वैवर्ण्य दुष्टा: कुष्ठमुशन्ति तत् ॥३॥
कालेनोपेक्षितं यस्मात्सर्व कुष्णाति तद्वपु: ।
अ. सं. नि. १४ पान ७०
दुष्ट झालेल दोष त्वचेच्या ठिकाणीं वैवर्ण्य उत्पन्न करुन कालांतरानें त्वचादींचा कोथ करतात (कुजवितात) म्हणून या व्याधीस कुष्ठ (कृष्णाति इति) असें म्हणतात.
स्वभाव
दारुण चिरकारी
मार्ग
बाह्य
प्रकार
स सप्तविधोऽप्यष्टादशविधोऽपरिसंख्येयविधो वा भवति ।
दोषा हि विकल्पनैर्विकल्प्यमाना विकल्पयन्ति विकारात् ।
अन्यत्रासाध्यभावात् । तेषां विकल्पविकारसंख्यानेऽति
प्रसड्गमभिसमीक्ष्य सप्तविधमेव कुष्ठविशेषमुपदेक्ष्याम: ॥४॥
च. नि. ५/५ पान ४६०
प्रकार दोन - महाकुष्ठ व क्षुद्रकुष्ठ. महाकुष्ठाचे सात व क्षुद्रकुष्ठाचे अकरा भेद आहेत. दोषदुष्टीनेही यांचे वर्गीकरण केलें जातें. तें एकदोषज द्विदोषज, व सान्निपातिक असे सात प्रकारचे आहे. (च. नि. ५-५)
निदान -
विरोधीन्यन्नपानानि द्रवस्निग्धगुरुणि च ।
भजतामागतां छर्दि वेगांश्चान्यान्प्रतिघ्नताम् ॥४॥
व्यायाममतिसंतापमतिभुक्त्त्वोपसेविनाम् ।
शीतोष्णलंघनाहारान् क्रमं मुक्त्वा निषेविणाम् ॥५॥
घर्मश्रमभयार्तानां द्रुतं शीताम्बुसेविनाम् ।
अजीर्णाध्यशिनां चैव पंचकर्मापचारिणाम् ॥६॥
नवान्नदधिमत्स्यातिलवणाम्लनिषेविणाम् ।
माषमूलकमिष्टान्नतिलक्षीरगुडाशिनाम् ॥७॥
व्यवायं चाप्यजीर्णेऽन्ने निद्रां च भजतां दिवा ।
विप्रान् गुरुन् घर्षयतां पापं कर्म च कुर्वताम् ॥८॥
च. चि. ७/४-८ सटीक पान १०४९-५०
विरोधीन्यात्रेयभद्रकाप्यीये-'' न मत्स्यान् पयसाऽ
भ्यवहरेत् । (सू.अ. २६) इत्यादिनोक्तानि । शीतोष्णेत्यादि ।
शीतोष्णादीनां यथाक्रमेण सेव्यत्वमुक्तं, तद्विपरीतेन सेविनाम्,
एवं लंघनाहारयोरपि ज्ञेयम् । घमादिभिरार्तत्वे सति
द्रुतिमविश्रम्य शीताम्बु सेविनामिति योज्यम् । अजीर्णाध्य-
शिनामिति अजीर्णम् आममन्नम् अपक्वमिति यावत् तद्भु-
ञ्जानानाम् । अध्यशिंनामिति आहारेऽपरिणते भुञ्जनानाम् ।
पञ्चकर्मापचारिणामिति पञ्चकर्मणि क्रियमाणेऽपचारिणां
निषिद्धसेविनाम् । व्यवायं चाप्यजीर्णे इति विदग्धादिरुपेऽ
अजीर्णे स्त्रीसेवनं कुर्वताम् । पापं कर्म च कुर्वतामिति
पापकर्मणैव विप्रादिधर्षणे लब्धे पुनस्तद्वचनं विशेषहेतुत्वोप-
दर्शनार्थम् ॥४-८॥
टीका
अतिद्रव, अतिस्निग्ध, अतिगुरु, परस्परविरुद्ध असें अन्नपान करणें, छर्दीच्या वेगाचें किंवा इतर वेगांचें विधारण करणें, पुष्कळ जेवण झाल्यानंतर व्यायाम करणें, अत्यंत संतापणें वा उन्हांत जाणें. शीत व उष्ण, लंघन बृंहण या उपायांचा विशिष्ट हितकर असा क्रम सोडून व्यत्यासानें अवलंब करणें, भय श्रम उष्णता यांनीं पीडित असतांना एकदम गार पाण्याचा उपयोग करणें, वरचेवर अजीर्ण होणें, कच्चे खाणे, अध्यशन करणें पंचकर्म योग्य रीतिनें न करणें किंवा पंचकर्मानंतरचा पथ्यादीचा क्रम न पाळणें नवीन धान्यें, दहीं मासे, मीठ, आंबट पदार्थ, उडीद, मुळा, पिष्टमय पदार्थ, तीळ, म्हशीचें दूध, गूळ यांचा आहारांत अधिक प्रमाणांत उपयोग करणें, अजीर्ण झालें असता मैथुन करणें, विशेषत: अजीर्ण झाल्यानंतर दिवसा झोपणें पूजनीय विद्वान श्रेष्ठ अशा सत्पुरुषांचा अपमान करणें धर्मशास्त्रानें सांगितलेली इतर पांतकें करणें या गोष्टी कुष्ठाच्या उत्पत्तीस कारणीभूत होतात. अष्टांग संग्रहानें अगदीं थोडक्यांत कुष्ठाचें निदान सांगतांना म्हटलें आहे कीं,
मिथ्याहारविहारेण विशेषेण विरोधिना ।
साधुनिन्दावधान्यस्वहरणाद्यैश्च सेवितै: ॥१॥
पाप्मभि: कर्मभि: सद्य: प्राक्तनैर्वेरिता मला: ।
अ. सं. नि. १४. पान. ७०
पूर्वकर्मार्जित पातकें आणि विरोधी आहार विहार हा कुष्ठाच्या उत्पत्तीस विशेष करुन कारणीभूत होतो. यांतील पापकर्माचें वर्णन श्रद्धा असलेल्यांनीं धर्मशास्त्रांत पहावें. विरुद्धान्नाचे वर्णन मागें निदानपंचक-संप्राप्तिविज्ञानातील आहाराच्या संदर्भानें वर्णिलें आहे तें तेथें पहावें. (पृष्ठ ५८)
संप्राप्ती
सप्त द्रव्याणि कुष्ठानां प्रकृतिर्विकृतिमापन्नानि भवन्ति ।
तद्यथा-त्रयो दोषा वातपित्तश्लेष्माण: प्रकोपणविकृता:,
दूष्याश्च शरीरधातवस्त्वड्वांसशोणीतलसीकाश्चतुर्ध्दा दोषो-
पघातविकृता इति । एतत् सप्तानां सप्तधातुकमेवड्गतमाजननं
कुष्ठानाम्, अत:प्रभवाण्यभिनिर्वर्तमानानि केवलं शरीर-
मुपतपन्ति ॥३॥
च. नि. ५ पृ. ४५६
वातादयस्त्रयो दुष्टास्त्वग्रक्तं मांसमम्बु च ।
दूषयन्ति स कुष्ठानां सप्तको द्रव्यसंग्रह: ॥९॥
अत: कुष्ठानि जायन्ते सप्त चैकादशैव च ।
न चैकदोषजं किंचित् कुष्ठं समुपलभ्यते ॥१०॥
च. चि, ७/९-१०
तस्य पित्तश्लेष्माणौ प्रकुपितौ परिगृध्यानिल:प्रवृद्धस्तिर्यग्गा:
सिरा: संप्रपद्य समुद्धय बाह्यं मार्ग प्रति समन्ताद्विक्षिपति,
यत्र यत्र च दोषो विक्षिप्तो निश्चरति तत्र तत्र मण्डलानि
प्रादुर्भवन्ति, एवं समुत्पन्नस्त्वचि दोषस्तत्र तत्र च परिवृद्धिं
प्राप्याप्रतिक्रियमाणोऽभ्यन्तरं प्रतिपद्यते धातूनभिदूषयन् ॥३॥
सु. नि. ५-३ पान २८२
दोषा:युगपत् प्रकोपमापद्यन्ते; त्वगादयश्चत्वार: शैथिल्यम-
पिद्यन्ते; तेषु शिथिलेषु दोषा:, प्रकुपिता: स्थानमधिगम्य
संतिष्ठमानास्तानेव त्वगादीन् दूषयन्त: कुष्ठान्यभि
निर्वर्तयन्ति ॥६॥
च. नि. ५-७ पा. ४६२
वर सांगितलेल्या निदानांनीं तीनही दोष प्रकुपित होतात. त्वचा, लसिका, रक्त, मांस या धातूंना शिथिलता येते. प्रकुपित वायू दुष्ट झालेल्या पित्तकफांना घेऊन सर्व शरीरभर तिर्यक् गतीनें जाणार्या रसरक्त वाहिन्यांतून संचार करीत ज्या ठिकाणीं त्वगादि धातूंचे शैथिल्य अधिक प्रमाणांत असेल त्या ठिकाणीं स्थिर होऊन त्वगादींना दुष्ट करुन कुष्ठ उत्पन्न करतो. वात पित्त, व कफ हे तीन दोष आणि त्वचा, लसिका, रक्त व मांस हे चार धातू मिळून सात द्रव्यें कुष्ठाची अधिष्ठानभूत असतात. वर उल्लेखलेल्या सातही भावांचें जें वैगुण्य तें सामान्य स्वरुपाचें असून त्याचीं लक्षणें प्रत्येक कुष्ठांत स्वतंत्रपणें दिसतीलच असें नाहीं. त्वचेचे वैवर्ण्य आणि निरनिराळ्या स्वरुपाची दुष्टी ही मात्र व्याधीच्या वैशिष्टयानें प्रत्येक कुष्ठांत दिसतेच. विशेष संप्राप्तींत मात्र विशेष दूष्यांची लक्षणें स्पष्ट असतात.
न च किञ्चिदस्ति कुष्ठमेकदोषप्रकोपनिमित्तम्, अस्ति तु
खलु समानप्रकृतीनामपि कुष्टानां दोषांशांशविकल्पानुबन्ध
स्थानविभागेन वेदनावर्णसंस्थानप्रभावनामचिकित्सित-
विशेष: ।
च. नि. ५-४ पान ४६०
कोणतेंही कुष्ठ जरी प्राधान्यानें दोषभेदानें वर्णिलेलें असलें तरी एकदोषज नसतें. तीन्ही दोषांचा प्रकोप त्या ठिकाणीं असतोच. तसेंच कुष्ठांतील दोष कित्येक वेळां सारखे असले तरी दोषांतील अंशांश कल्पना, स्थानविभाग यामुळें कुष्ठांतील वेदना, वर्ण, आकृति, परिणाम वा लक्षणें, नांव आणि चिकित्सा यामध्यें विविध भेद उत्पन्न होतात. कुष्ठाचा उद्भव रस (लसिका) रक्तांत होतो. व्याधीचें अधिष्ठान त्वचेमध्यें असतें आणि संचार सर्व शरीरामध्यें स्थानवैगुण्यानुरुप वा धातुदुष्टीला अनुरुप असा होतो.
पूर्वरुपें -
तेषामिमानि पूर्वरुपाणि भवन्ति; तद्यथा - अस्वेदंनमंति-
स्वेदनं पारुष्यमतिश्लक्ष्णता वैवर्ण्य कण्डूर्निस्तोद: सुप्तता
परिदाह: परिहर्षो लोमहर्ष: खरत्वमूष्मायणं गौरवं श्वयथु-
वीसर्पागमनमभीक्ष्णं च काये कायच्छिद्रेषूपदेह: पक्वदग्ध-
दष्टभग्नक्षतोपस्खलितेष्वतिमात्रं वेदना स्वल्पानामपि च
व्रणानां दुष्टिरसंहोरणं चेति ॥७॥
च. नि. ५-८ पान ४६२
अतिश्लक्ष्णखरस्पर्शस्वेदास्वेदविवर्णता: ।
दाह: कंडूस्त्वचि स्वापस्तोद: कोठोन्नति: श्रम: ॥११॥
व्रणानामधिकं शूलं शीघ्रोत्पत्तिश्चिरस्थिति: ।
रुढानामपि रुक्षत्त्वं निमित्तेऽल्पेऽपि कोपनम् ॥१२॥
रोमहर्षोऽसृज: कार्ष्ण्य कुष्ठलक्षणमग्रजम् ।
वा. नि. १४/११-१३ पान ५२५
खूप घाम येणें, मुळींच घाम न येणे, त्वचा अत्यंत खरखरीत वा अत्यंत गुळगुळीत होणें, त्वचेचा रंग बदलणें, खाज सुटणें टोचल्याप्रमाणें वेदना होणें, आग होणें, झिणझिण्या येणें, मुंग्यायेणें रोमांच रहाणें, उकडणें, अवयव जड होणें, वरचेवर सुजणें, विसर्प होणें, शरीर चिकट वाटणें, मलिन वाटणें (काय च्छिद्रषेपदेह:), भाजणें, पोळणें, चावणें, व्रण होणें, मार लागणें, यांच्यामुळें त्वचेच्या ठिकाणीं नेहमीं होतात त्यापेक्षां अधिक प्रमाणांत वेदना होणें, व्रण लवकर होणे, तो लवकर भरुन न येणें, वा पसरत जाणें, व्रणाची दुष्टी होणें, व्रण भरुन आले तरी त्या ठिकाणची कातडी रुक्ष रहाणे, आणि थोडया कारणांनीं व्रण पुन्हां उत्पन्न होणें, रक्त काळवंडणें, अंगावर मंडले कोठ उत्पन्न होणें, थकवा वाटणे ही लक्षणे पूर्वरुपे म्हणून होतात.
रुपें
वैवर्ण्य, विस्फोट, कंडू, दाह, मंडलोत्पत्ती, शोथ, स्त्राव, बधिरपणा, ही लक्षणें कुष्ठामध्यें रुपें म्हणून होतात.
महाकुष्ठ -
इह वातादिषु त्रिषु प्रकृपितेषु त्वगादश्चिंतुर: प्रदूषयत्सु
वातेऽधिकतरे कपालकुष्ठमभिनिर्वर्तते, पित्ते त्वौदुम्बरं,
श्लेष्मणि मण्डलकुष्ठं, वातपित्तयोऋष्यजिह्वं, पित्तश्लेष्मणो
पुण्डरीकं, श्लेष्ममारुतयो: सिध्मकुष्ठं, सर्वदोषाभिवृद्धौ
काकणकमभिनिर्वर्तते; एवमेष सप्तविध: कुष्ठविशेषो भवति ।
स चैष भूयस्तरतमत: प्रकृतौ विकल्पमानायां भूयर्सी
विकारविकल्पसंख्यामापद्यते ॥
च. नि. ५-६ पान ४६१
महाकुष्ठें सात आहेत. त्यांचीं नांवें पुढीलप्रमाणें आहेत. कापाल, औदुंबर, मंडल, ऋष्यजिव्ह, पुंडलीक, सिध्म, काकणक.
तेषां महत्त्वं क्रियागुरुत्वमुत्तरोत्तरं धात्वनुप्रवेशादसाध्यत्वं
चेति ॥७॥
सु. नि. ५-७ पान २८४
लक्षणांचें आधिक्य, पीडाकरत्व, चिकित्सेंतील कष्ट, कुष्टाचा होत जाणारा उत्तरोत्तर धातुप्रवेश आणि असाध्यत्व या कारणानें वरील सात कुष्टांना महाकुष्टें म्हणतात. स्वभावत:च यापेक्षां उलट लक्षणें (विपर्यय) असली म्हणजे कुष्टांना क्षुद्रकुष्ठ म्हणतात. क्षुद्रकुष्टांमध्यें उत्तरोत्तर धातु प्रवेश होत नाहीं हें व्यवच्छेदक लक्षण मानतां येईल.
कापाल कुष्ठ
कृष्णारुणकपालासं रुक्षं सुप्तं खरं तनु
विस्तृतासमपर्यतं दूषितैर्लोमभिश्चितम् ।
तोदाढ्यमल्पकंडूकं कापालं शीघ्रसर्पि च ॥१४॥
वा. नि. १४/१३-१४ पान ५२५
परुषानि तनूनि उद्वृत्तबहिस्तनूनि अल्पदाहंपूय
लसीकानि आशुभेदीनि जंतुमन्ति ।
च. नि. ५.९
कापालकुष्ठ हें वातप्रधान असून तें काळें, अरुणवर्णाचें व खापरासारखें रुक्ष दिसणारें असतें. त्याच्या कडा खरखरीत, ओबडधोबड, उचललेल्या, अधिक क्षेत्र व्यापणार्या (पसरट) असतात. कुष्टाचीं मंडलें फारशी उचललेलीं नसून जाडीला कमी असतात. कुष्टाच्या ठिकाणीं स्पर्शज्ञान नसतें. त्या जागेंत रोमांच उभे राहिलेलें असतात. टोचल्यासारख्या वेदना फार होतात. कंडू, दाह, पूय, लसिकास्त्राव यांचे प्रमाण कमी असतें. हें कुष्ट लवकर उत्पन्न होते, लवकर पसरतें, लवकर व्रणयुक्त होतें, यामध्यें कृमी उत्पन्न होतात.
औदुंबर कुष्ठ
पक्वोदुंबरताम्रत्वग्रोमगौरसिराचितम् ।
बहलं बहलक्लेदरक्तं दाहरुजाधिकम् ॥१५॥
आशूत्थानावदरणकृमिं विद्यादुदुंबरम् ।
वा. नि. १४/१५ पान ५२५
बहुपूयलसिकानि कंडुकोथपाकवंति ससंतापानि
च. नि. ५.१०
औदुंबरकुष्ठ हे पित्तप्रधान असून तें ताम्रवर्ण, तांबूस, खरखरीत, रोमराजीनीयुक्त, पुष्कळ क्षेत्र व्यापणारें, रक्त, पूय, लसिका यांचा स्त्राव अधिक प्रमाणांत होणारें, कंडू, क्लेद, कोथ, दाह, पाक या लक्षणांनी युक्त; शीघ्रगति असें असतें. यांत कृमी पडतात. ज्वर हे लक्षण असते. या कुष्टामध्ये त्वचा फाटण्याची भेगाळण्याची क्रिया अल्प कालांत होते. सिरा उमटून दिसतात.
मंडलकुष्ठ
स्थिरं स्त्यानं गुरु-स्निग्धं श्वेतरक्तमनाशुगम् ।
अन्योन्यसक्तमुत्सन्नं बहूकंडूस्त्रुतिकृमि ॥१७॥
श्लक्ष्णपीताभपर्यंतं मंडलं परिमंडलम् ॥१७॥
वा,नि. १४/१६-१० पान ५२५
शुक्लरोमराजीसंतनानि शुक्लपिच्छिलस्त्रावीणि बहुक्लेदयुक्तानि
च. नि. ५-११
हे कुष्ठ कफप्रधान असून लवकर न वाढणारें, लवकर न पसरणारें, स्थिर, स्त्यान, स्निग्ध, गुरु, श्लक्ष्ण, श्वेतरक्तवर्ण, शुक्लरोमराजीयुक्त, पांढरापिच्छिलस्त्राव येणारे, क्लेद, कंडू, कृमी अधिक प्रमाणांत असणारें, आकृतीनें मंडलासारखें गोल असलेलें व उत्सेधयुक्त (जाड उंच असें) असतें. याच्या कडा गुळगुळीत गोल व जाड असतात.
ऋष्यजिहूव
परुषं तनु: रक्तांतमंत:श्यावं समुन्नतम्
सतोददाहरुकक्लेदं कर्कशै: पिटिकैश्चितम्
ऋष्यजिह्वाकृति प्रोक्तमृक्षजिह्वं बहुकृमि ॥१९॥
वा. नि. १४/१८.१९ पान ५२५
नीलपीतताम्रावभ्रासानि आशुगतिसमुत्थानानि अल्पकण्डू
क्लेदकृमीणि भेदपाकबहलानि, शूकोपहतोपमवेदनानि
उत्सन्नमध्यानि तनुपर्यतानि दीर्घपरिमण्डलानि ऋष्यजि-
ह्वाकृतीनि ।
च. नि. ५-१२
ऋष्य़जिह्व हें कुष्ठ वातपित्तप्रधान आहे. याचा वर्ण बाहेरुन तांबूस व आंत काळसर असतो. नील, पीत, ताम्र अशा वर्णाच्या छटांही त्यांत दिसतात. या कुष्ठाचीं मंडलें लांबट गोल असून मध्यें उंच व कडेला उतरतीं पातळ होत गेलेलीं असतात. या मंडलावर खरखरीत टणक अशा पुटकुळ्या असतात. तुसे घातल्याप्रमाणें वेदना होतात. कंडू व क्लेद अल्प असतो. दाह, भेद, पाक, ही लक्षणें अधिक असतात. हें कुष्ठ लवकर वाढतें, पसरतें. याचा कोथ होऊन त्यांत कृमी पडतात. चरकाच्या मतें कृमींची उत्पत्ती थोडी असते. तर वाग्भटानें कृमी पुष्कळ प्रमाणांत होतात असें सांगितले आहे. या कुष्ठाचें विशेष स्वरुप ऋष्य या प्राणिविशेषाच्या जिभेप्रमाणें असतें. वाग्भटानें `ऋष्य' असा अस्वल या अर्थाचा शब्द वापरला आहे. ऋष्य ही एक हरणाची जात असून त्याला कांहींनीं `रोही' असे लौकिक नांव सांगितलें आहे.
पुंडरीक कुष्ठ
रक्तांतमंतरा पांडु कंडूदाहरुजान्वितम् ।
सोत्सेधमाचितं रक्तै: पद्मपत्रमिवांशुभि: ॥
धनंभूरिलसीकासृक्प्रायमाशुविभेदि च
पुंडरीकम् ।
वा. नि. १४/२६ पान ५२३
कृमिपाकवन्ति शुक्लरक्तावभ्रासानि आशुगतिसमुत्थानभेदीनि
च. नि. ५-१३
पुंडरीक कुष्ठ पित्तकफप्रधान असून त्याचा वर्ण पांडरट तांबूस असा असतो. विशेषत: मध्ये पांढुरका व कडेला तांबडा असा वर्ण असतो. कमळाच्या पाकळीसारखा याचा आकार असून कुष्ठाचा हा भाग उचलेला व रक्तवर्ण सिरानीयुक्त (रेघा) असतो. यामध्यें रक्तपूय लसिका भरल्यासारखी असते. कंडू, दाह, पाक, कृमी, ही लक्षणें असतात. हें कुष्ठ त्वरित उत्पन्न होणारें पसरणारें व फुटणारें असतें.
सिध्मकुष्ठ
१) सिध्मं रुक्षं बहि: स्निग्धमन्तर्घृष्टे रज: किरेत् ॥
श्लक्ष्णस्पर्श तनु श्वेतताम्रं दौन्धिकपुष्पवत् प्रायेण चोर्ध्व
काये स्यात्
वा. नि. १४/२१ पान ५२५
परुषारुणानि विशीर्णबहिस्ततून्यन्त: स्निग्धानि शुक्लरक्ताव-
भासानि बहून्यल्पवेदनान्यल्पभेदक्रिमीण्यलांबुपुष्प-
सड्काशानि सिध्म कुष्ठति विद्यात् ।
च. नि. ५-१४ पान ४६३
सिध्मकुष्ठ हें कफप्रधान असून तें बाहेरुन रुक्ष व आंतून स्निग्ध असतें. त्याचा स्पर्श स्निग्ध श्लक्ष्ण असतो. कांहीं वेळां याचा स्पर्श खरखरीतही असतो (परुष). कडा दंतुर असतात. (विशीर्ण) झाडलें असतां त्याचा कोंडा निघतो. वर्ण तांबुसपांढरा असतो. या कुष्ठामध्यें वेदना, कंडू, दाह, पूय लसिका हीं लक्षणें कमी असतात. हें कुष्ठ फारसें फुटत नाहीं व त्यांत फारसे कृमी पडत नाहीत. या कुष्ठाचे स्वरुप दुध्या भोपळ्याच्या फुलाप्रमाणें असतें. हें कुष्ठ लवकर वाढतें व विशेष करुन शरीराच्या वरच्या भागांत (गळा, छाती पाठ यावर) उमटतें.
काकण कुष्ठ -
काकणं तीव्रदाहरुक् ॥
पूर्वं रक्तं च कृष्णं च काकणंतीफलोपमम् ।
कुष्ठलिंगैर्युतं सर्वैर्नैकवर्ण ततो भवेत् ॥३०॥
वा. नि. १४/२९-३० पान ५२६
काकणंतिका वर्णान्यादौ पश्चात् सर्वकुष्ठलिंगसमन्वितानि ।
च. नि. ५-१५
काकणकुष्ठ त्रिदोषप्रधान असून तें आरंभी गुंजेप्रमाणें लालवर्णाचें असतें. नंतर त्याचे ठिकाणीं इतर प्रकारच्या कुष्ठांत सांगितलेली लक्षणें व वर्ण उत्पन्न होतात. यामध्यें दाह व वेदना हीं लक्षणें उत्कटतेनें असतात.
क्षुद्रकुष्ठं
चर्माख्यमेककुष्ठं च किटिभं सविपादिकम् ।
कुष्ठं चालसकं ज्ञेयं प्रायो वातकफाधिकम् ॥
पामाशतारु र्विस्फोटं दद्रुश्चर्मदलं तथा ।
पित्तश्लेष्माधिकं प्राय: कफप्राया विचर्चिका ॥
च. चि. ७-२९-३० पान १०५२
क्षुद्रकुष्ठें हीं अकरा प्रकारचीं आहेत. त्यांचीं नांवें अशीं-वातकफ़प्रधान-एककुष्ट, चर्माख्य, किटिभ, विपादिका, अलसक, पित्तकफ़प्रधान-पामा, शतारु,; विस्फ़ोट, दद्रु, चर्मदल, कफ़प्रधान-विचर्चिका.
अस्वेदनं महावास्तु यन्मत्स्यशकलोपमम् ।
तदेककुष्ठं, चर्माख्यं बहलं हस्तिचर्मवत् ॥२१॥
श्यावं किणखरस्पर्शं परुषं किटिमं स्मॄतम् ।
वैपादिकं पाणिपादस्फ़ुटनं तीव्रवेदनम् ॥२२॥
कण्डूमद्भि: सरागैश्च गण्डैरलसकं चितम् ।
च. चि. ७. २१-२२ पान १०५१
१) एककुष्ठ हे वातकफ़प्रधान आहे. यांत घाम येत नाहीं. हें शरीराच्या अधिक क्षेत्रांत पसरलेलें असतें. याचे स्वरुप माशांच्या खवल्यांप्रमाणें दिसतें.
२) चर्माख्य हें कुष्ठ वातकफ़प्रधान असून पुष्कळ जागेवर पसरलेलें असतें व ह्त्तीच्या कातडीप्रमाणें दिसणारें असून त्याचा स्पर्श खरखरीत असतो.
३) किटिभ हें वातकफप्रधान असतें. याचा रंग काळसर व स्पर्श घट्टा पडल्याप्रमाणे खरखरीत असतो. खाज सुटतें. दिसावयास रुक्ष असतें.
४) विपादिका हें वातकफप्रधान असून यामध्यें हातापायाला भेगा पडतात. तीव्र वेदना होतात. थोडी खाज असते. लाल रंगाच्या पीटिका (पुरळ) उत्पन्न होतात.
वा.नि. १४-२३)
५) अलसक हें कुष्ठ वातकफप्रधान असून यामध्ये गांठीसारखे फोड (गंड) अंगावर उमटतात. हे गंड लाल रंगाचे असून त्यांना फार खाज सुटते.
सकण्डू रागपिडकं दद्रुमण्डलमुद्गतम् ॥
रक्तं सकण्डू सस्फोटं सरुग्दलति चापि यत् ।
तच्चर्मदलमाख्यातं संस्पर्शासहमुच्यते ॥
पामा श्वेतारुणश्यावा: कण्डूला: पिडका भृशम् ।
स्फोटा: श्वेतारुणाभासो विस्फोटा: स्युस्तनुत्वच: ॥
रक्तं श्यावं सदाहार्ति शतारु: स्याद्बहुव्रणम् ।
सकण्डू: पिडका श्यावा बहुस्त्रावा विचर्चिका ॥
च. चि. ७-२३-२६ १०५१-५२ पान
६) ददु हें पित्तकफप्रधान असून यामध्यें लालरंगाचे मंडलाकृति पुरळ शरीरावर उमटतें. त्या ठिकाणी फार खाज सुटते. कांहीं वेळां मंडलाची कड तेवढी लालपुरळ, कंडू यानी युक्त असून मधला भाग नेहमीच्या त्वचेसारखा असतो. कांहीं वेळां मंडळाच्या मधील त्वचाही श्यामवर्ण स्फुटित व कंडूयुक्त असते.
७) चर्मदल हें पित्तकफप्रधान असून त्यामध्यें रक्तवर्ण, कंडुयुक्त असे फोड येतात. या फोडांना स्पर्श सहन होत नाहीं. त्या ठिकाणीं गरम झाल्याप्रमाणें वाटतें, आग होते. टोचल्याप्रमाणें वेदना होतात. हे फोड फुटतात व त्वचेला भेगा पडतात (वा. नि. १४-२९)
८) पामा हें कुष्ठ पित्तकफप्रधान असून त्यामध्यें श्वेत श्याव रक्त वर्णाच्या पुटकुळ्या येतात. त्यांना अतिशय खाज सुटते. त्यांतून क्लेद येतो. (चिकट स्त्राव). वेदना अधिक असतात. हे फोड आकारानें लहान व संख्येनें पुष्कळ असून नितंबभाग, हात (पंजा) कोपर या ठिकाणीं विशेष उमटतात.
९) विस्फोट हें पित्तकफप्रधान असतें. यांत पुष्कळ व्रण (बारीक बारीक) उत्पन्न होतात. वेदना व दाह हीं लक्षणें जास्त असतात. व्रणांतून चिकट स्त्राव येतो. कुष्ठाचा वर्ण तांबूस काळसर असतो. व्रण मुळाशीं अधिक रुंद असतात. (स्थूल मूल) हें कुष्ठ बहुधा पर्वाच्या ठिकाणीं (पेरी) उत्पन्न होते.
वा. नि. १४/१५)
११) विचर्चिका हें कुष्ठ कफप्रधान आहे. यामध्ये स्त्रावयुक्त काळसर वर्णाच्या पीटिका उत्पन्न होतात. खाज जास्त असते व स्त्राव पुष्कळ असतो. स्त्राव लसिकेसारखा असतो.
(वा. नि. १४/१८)
तत्र सप्त महाकुष्ठानि; एकादश क्षुद्रकष्ठानि, एवमष्टादश
कुष्ठानि भवन्ति । तत्र महाकुष्ठान्यरुणोदुम्बरर्ष्य (र्क्ष)
जिह्वकपालकाकणपुण्डरीकदद्रुकुष्ठानीति क्षुद्रकुष्ठान्यपि
स्थूलारुष्कं महाकुष्टमेककुष्ठं चर्मदलं विसर्प: परिसर्प:
सिध्मं विचर्चिका किटिभं (म) पामा रकसा चेति ॥५॥
सु नि ५-५ पान २८३
सुश्रुतानें जी महाकुष्ठांची व क्षुद्रकुष्ठांची यादी दिली आहे त्यामध्यें चरकानें उल्लेखलेल्या कुष्ठापेक्षां कांहीं कुष्ठे निराळी आहेत. चरकानें सिध्म हे महाकुष्ठांत व दद्रु हें क्षुद्रकुष्ठांत उल्लेखलेलें आहे तर सुश्रुताचें वर्णन बरोबर याच्या उलट आहे. त्यानें दद्रु महाकुष्ठांत व सिध्म क्षुद्रकुष्ठांत उल्लेखलेले आहे. टीकाकारानें यावर भाष्य करतांना म्हटलें आहे कीं, दद्रुकुष्ठ सित व असित (पांढरे व काळे) असे दोन प्रकारचें असतें. यातील कृष्णवर्ण दद्रुकुष्ट महाकुष्ठांत समाविष्ट करण्यासारखें चिकित्सेला लवकर दाद न देणारें व दोषदूष्याचा अनुबंध अधिक असलेलें असें असतें. म्हणून या असित दद्रुकुष्ठाचा सुश्रुतानें महाकुष्ठांत समावेश केला आहे. चरकानें क्षुद्रकुष्ठांत समाविष्ट केलेलें दद्रुकुष्ठ सितवर्ण असून तें सुखसाध्य व अधिकाधिक गंभीर धातूंत प्रवेश न करणारें असते. त्वचेपुरतें ते मर्यादित रहातें. कुष्ठाच्या स्वरुपासंबंधीचा भेद गृहीत धरला असल्या कारणानें निरनिराळ्या ठिकाणीं वर्गीकरण करण्यांत दोष येत नाहींत.
(सु.नि. ५-८ डल्हण टीका)
दद्रुप्रमाणेच सिध्माचेही सित व असित असे दोन भेद असावेत असें सुश्रुताच्या गयदास टीकेवरुन दिसतें. महोपक्रमसाध्यत्व आणि गंभीरधातुगामित्व या दोन्ही कारणांनीं चरकानें सिध्मकुष्ठ महाकुष्ठांत समाविष्ट केले आहे असें म्हणावें लागते. अल्पप्रमाणानें सांगितलां असला तरी चरकाच्या सिध्मकुष्ठ वर्णनांत वेदना, दाह, पूय, लसिका, कृमी यांचा उल्लेख आहे. त्यावरुन चरकोक्त सिध्माचें स्वरुप महाकुष्ठाचेंच असल्याचें स्पष्ट होतें. सुश्रुतोक्त सिध्म सौम्यस्वभावी असतें. लौकिकांत यालाच शिबें असें म्हणतात. सुश्रुतानें महाकुष्ठामध्यें मंडलकुष्ठाचा उल्लेख न करितां अरुण नांवाचें कुष्ठ सांगितलें आहे. तसेंच सुश्रुताच्या क्षुद्रकुष्ठांत स्थूलारुष्क महाकुष्ठविसर्प परिसर्प कच्छुं रकसा अशी वेगळींच कुष्ठे वर्णिलीं आहेत. गयदासानें आपल्या टीकेंत भोजाच्या वचनाचा उल्लेख करुन विवर्चिका कुष्ठ केवळ हातावर होतें व विपादिका कुष्ठ केवळ पायावर होतें व त्या विपादिकेसच पाददारी असें म्हणतात. असें म्हटलें आहे. विपादिका केवळ पादगत आहे असें म्हणण्यास सुश्रुताच्या वचनाचा आधार आहे.
सास्त्रावकण्डूपरिदाहकाभि: ।
पामाणुऽकाभि: पिडकाभिरुह्या ॥
स्फोटै: सदाहैरति सवै कच्छू: ।
स्फिकूपाणिपादप्रभैर्वीनरुप्या ॥
सु नि ५/१४ पान २८६
कच्छु हा पामाकुष्ठाचाच एक उपभेद असल्याचें सुश्रुत सांगतो. हात आणि नितंब यांचे ठिकाणी उत्पन्न होणार्या तीव्रदाहयुक्त फोडांना म्हणावें असें तो म्हणतो.
अरुण कुष्ठ - सुश्रुतोक्त महाकुष्ठ
तत्र, वातेनारुणाभानि तनूनि विसर्पीणि तोदभेदस्वापयुक्ता-
न्यरुणानि । पित्तेन पक्वोदुम्बरफलाकृतिवर्णान्यौदुम्बराणि,
ऋष्य (क्ष) जिह्वाप्रकाशानि खराणि ऋष्य (क्ष)
जिह्वानि, कृष्णकपालिकाप्रकाशानि कपालकुष्ठानि,
काकणान्तिकाफलसदृशान्यतीव रक्तकृष्णानि काकणकानि;
तेषां चतुर्णामप्योषचोषपरिदाह्धूमायनानि क्षिप्रत्थान-
प्रपाकक्षेदित्वानि क्रिमिजन्म च सामान्यानि लिड्गानि ।
श्लेष्मणा पुण्डरीकपत्रप्रकाशानि पौण्डरीकाणि, अतसी-
पुष्पवर्णानि ताम्राणि वा विसर्पीणि पिडकावन्ति च दद्रु-
कुष्ठानि, तयोर्द्वयोरप्युत्सन्नता परिमण्डलता कण्डूश्चिरोत्था-
नत्वं चेति सामान्यानि रुपाणि ॥८॥
सु. नि. ५-८ पान २८४
अरुण नांवाचें कुष्ठ वातप्रधान असून त्याचा वर्ण काळसर तांबूस (अरुण) असतो. तोद, भेद, स्वाप हीं लक्षणें कुष्ठामध्यें असतात. हे कुष्ठ पसरते जातें. सुश्रुतानें औदुंबर, ऋष्यजिहव, कापाल, आणि काकणक या कुष्ठांना पित्तप्रधान मानलें असून त्यामध्यें ओष चोष, परिदाह, धूमायन, क्षित्प्रोत्थान क्षिप्रप्राक कृमीजन्मा ही लक्षणें या चारीं कुष्ठांना समान असल्याचें सांगितलें आहे. सुश्रुतानें पौडरोक आणि दद्रु हीं कफप्रधान सांगितलीं असून उत्सन्नता, परिमंडलता, कंडू चिरोत्पन्नत्व हीं लक्षणें दोघामध्यें सामान्य असतात असें सांगितलें आहे. (सु. नि. ५ ८)
स्थूलानि सन्धिष्वतिदारुणानि स्थूलांरुषि स्यु: कठिनान्यरुंषि ॥
त्वक्कोचभेदस्वपनाड्गसादा: कुष्ठे महत्पूर्ययुते भवन्ति ॥
विसर्पवत् सर्पति सर्वतो यस्त्वग्रक्तमांसान्यभिभूय शीघ्रम् ॥
मूर्च्छाविदाहारतितोदपाकान् कृत्वा विसर्प: स भवेद्विकार: ॥
शनै: शरीरे पिडका: स्त्रवन्त्य: सर्पन्ति यास्तं परिसर्पमाहु: ॥
कण्ड्वन्विता या पिडका: शरीरे संस्त्रावहीना रकसोच्यते सा ॥
सु. नि. ५ ष्टान २८५-८६
क्षुद्रकुष्ठेशु प्रधानान् दोषान्निर्दिशन्नाह-तत्रारुष्कमित्यादि ।
स्थूलारुष्करकसासिध्मेषु कफोऽधिक:, वातोद्रेकादेककुष्ठं,
वातपित्तात्तु परीसर्प; अपराणि च पित्तादेव निर्दिशेत् ।
अपराणीति विसर्पकिटिभविचर्चीविपादिकापामा: ।
सु. नि. ५-१६ पा० २८६ न्यो.च.
महाकुष्ठमेककुष्ठमपि वातात् तोदस्वापत्वक्रूसंकोचादीनां
महाकुष्ठे वातैककार्यत्वात् ; एककुष्ठेऽपि कृष्णारुणयोर्वात
कार्यत्वात्; कफादिति जेज्जट: ।
सु. नि. ५-१६ पा० २८६ न्या. च. टीका
अरुष्क हें कुष्ठ कफप्रधान असून (गयदास टीका) त्यामध्यें सांध्यांच्या ठिकाणीं अत्यंत दारुण, मोठें, कठिण, तळांशीं रुंद असे व्रण उत्पन्न होतात. वाग्भटानें चरकोक्त शतारु कुष्ठासह याचा समन्वय केला आहे असें दिसतें. (वा. बि. १४-३५)
महाकुष्ठ वातप्रधान असून (गयदास टीका) त्यामध्यें तोद, भेद, स्वाप, साद व त्वक्संकोच अशीं लक्षणें असतात. विसर्प कुष्ठ पित्तप्रधान असून त्यामध्येंझ त्वचा, रक्त मांस यांची दुष्टी असते. मूर्च्छा, विदाह, अरति, तोद, पाक हीं लक्षणें असतात. कुष्ठ प्रसरणशील असते. विसर्प या रोगापेक्षां याची पसरण्याची क्रिया सावकाश असते. परिसर्प कुष्ठ वातपित्तप्रधान असून (गयदास टीका) यामध्यें शरीरावर स्त्रावयुक्त पीडिका उत्पन्न होतात. या पीडिकांचे क्षेत्र सावकाशपणें पसरत जातें. रकसाकुष्ठ कफप्रधान असून त्यामध्यें कंडूयुक्त पीडिका शरीरावर उत्पन्न होत असतात. या पीटिकांतून स्त्राव येत नाहीं. या क्षुद्रकुष्टातील दोषविशेष सांगणारा एक श्लोक सुश्रुतामध्यें आलेला आहे.
अरु: ससिध्मं रकसा महश्च यच्चैककुष्ठं कफजान्यमूनि ॥
वायो: प्रकोपात् परिसर्पमेकं शेषाणि पित्तप्रभवाणि विद्यात् ॥१९॥
सु. नि. ५-१६ पान २८६
अत्र जेज्जटेन-एककुष्ठेऽपि कफाधिक्यं चेति
स्वकल्पित श्लोक:-``अरु: ससिध्मं रकसा महच्च यचचै
ककुष्ठं कफजान्यमूनि । वातेन विद्यात् परिसर्पमेकं शेषाणि
पित्तप्रभवाणि विद्यात्'' इति । तत्र महाकुष्ठे त्वक्संकोच
स्वापभेदाड्गसादा वातकृता:, एककुष्टेऽपि कृष्णारुणत्वं
वातकृतं; किंच कफजत्वे तु कष्टत्वमप्यस्य न स्यात् ,
कफजस्य कुष्ठजस्य सुखसाध्यत्वात्; परिसर्पस्यापि
वातकृतत्वे स्त्रावस्फोटजन्मानुपपत्ति:, वातजस्याविद्यमान-
स्त्रावपाकात् ।
सु. नि. ५-१६ न्या. च. टीका पान २८६
हा श्लोक प्रक्षिप्त असल्याचें गयदासानें म्हटलें आहे. यांतील दोषभेद गयदासास मान्य नाहीं. तो म्हणतो हा प्रक्षिप्त श्लोक जेज्जटानें आपल्या पदरचा घातला आहे. यांतील दोषांचें वर्णन अयोग्य आहे, महाकुष्ठांत सांगितलेलीं संकोच, स्वाप, भेद, साद हीं लक्षणें वाताचीं आहेत. एककुष्ठांतील कृष्णारुणत्वही वातजन्य आहे. त्याना कफज म्हणणें योग्य नाहीं. कफज कुष्ठें सुखसाध्य असतात. हीं दोन्ही कुष्ठें तशीं नाहींत. परिसर्पकुष्ठास वातज मानल्यास त्यामध्यें स्त्राव, स्फोट या लक्षणांची उपपत्ती लावतां येणार नाहीं. वातामध्यें स्त्राव व पाक असणार नाहीं. गयदासाची टीका आम्हांस योग्य वाटते. चरकानें यासाठींच क्षुद्रकुष्ठें बहुधा द्वंद्वज मानलीं आहेत. परंतु चरक विचर्चि केला कफप्रधान मानतो आणि गयदास विचर्चिकेचा पित्तजामध्यें अंतर्भाव करतो. नांव एकच असलें तरी चरकोक्त विचर्चिका व सुश्रुतोक्त विचर्चिका यांच्या लक्षणांतच फरक आहे. चरकाची विचर्चिका स्वतंत्र असून ती कंडू व स्त्रावयुक्त आहे. सुश्रुतोक्त विचर्चिका विपादिकेचा एक प्रकार असून ती रुक्ष व वेदनायुक्त आहे. लक्षणभेद असल्यामुळें नांव एकच असलें तरी व्याधी स्वतंत्र मानले पाहिजेत. व्याधिदोषामुळें दोषभेद असणें स्वाभाविक आहे. कुष्ठाचे भिन्नभिन्न वर्गीकरण व नामोल्लेख यांना अनुसरुन वाग्भटाचा टीकाकार अरुणदत्त म्हणतो कीं -
तदेतेषु कुष्ठभेदेषु यथा नामविपर्ययस्तथा लक्षणविपर्ययोऽपि ।
किन्त्वेतेऽपि कुष्ठभेदा दृश्यन्ते एव, इत्येतदपि लक्षणमादर-
णीयमेवेति मन्यामहेऽधिकं कुष्ठेषु, इत्यादि ।
वा. नि. १४-३० टीका पान ५२६
या भिन्न भिन्न नांवांच्या कुष्ठामध्यें केवल नामभेद नसून लक्षणभेदही आहे, आणि अशीं भिन्न लक्षणात्मक कुष्ठें प्रत्यक्षांत आढळतात. त्यामुळें या सर्व लक्षणांचा सग्रह केला पाहिजे, असें आम्हांस वाटतें त्यामुळें कुष्ठांची संख्या १८ पेंक्षा अधिक समजावी लागली तरी चालेल. अरुणदत्ताचें मत आम्हास ग्राह्य वाटतें.