व्याख्या
दुष्टवात व दुष्टरक्त यांच्या समूर्च्छनेंतून व्याधी उत्पन्न होत असल्यानें या व्याधीस वातरक्त असें नांव मिळालें आहे. `खुड' म्हणजे संधी त्यांच्या आश्रयानें हा व्याधी उत्पन्न होतो म्हणून त्याला `खुड' किंवा खुडवात असें म्हणतात. वाताच्या आवरणानें याला बल प्राप्त होत असल्यानें वातबलास अशी संज्ञा याला प्राप्त झाली आहे. हा व्याधी बहुधा आढयांना म्हणजे श्रीमंतांना होतो याकरितां याला आढयरोग म्हणतात.
स्वभाव
दारुण
मार्ग
मध्यम
प्रकार आश्रयभेदानें उत्तान व गंभीर असे दोन प्रकार चरकानें उल्लेखलेले आहेत. दोषदूष्यभेदानें वाताधिक, रक्ताधिक, पिताधिक, आणि कफाधिक असे चार प्रमुख द उल्लेखले असून द्वंद्वज व सांन्निपातिकाचाहीं उल्लेख केला आहे.
निदान
लवणाम्लकटुक्षारस्निग्धोष्णाजीर्णभोजनै: ।
क्लिन्नशुष्काम्बुजान्पामांसपिण्याकमूलकै: ॥५॥
कुलत्थमाषनिष्पावशाकादि पललेक्षुभि: ।
दध्यारनालसौवीरशुक्ततक्रसुरासवै: ॥६॥
विरुद्धाध्यशनक्रोधदिवास्वप्नजागरै:
प्रायश: सुकुमाराणां मिष्टान्नसुखभोनिनाम् ॥७॥
अचडक्रमणशीलानां कुप्यते वातशोणितम् ।
अभिघाताद्शुद्ध्या च प्रदुष्टे शोणिते नृणाम् ॥८॥
कषाय कटुतिक्ताल्परुक्षाहारादभोजनात् ।
हयोष्ट्रयानयानाम्बुक्रीडाप्लवनलड्घनै: ॥९॥
उष्णे चात्यध्ववैषम्याद्व्यवायाद्वेगनिग्रहात् ।
च. चि. २९-५ ते ९ पान १४८१
आग्निमारुततुल्यस्येत्यनेने वातरक्तस्य दुर्निवारत्वं शीघ्र-
कारित्वं चाह लवणेत्यादिना हेतुमाह । प्रायश: सुकुमाराणा-
मित्यनेन सुकुमारशरीरे लवणादिहेतुसेवया शीघ्रं दुष्टं
वातास्त्रं वातशोणितं भवतीति दर्शयति । मिष्टमन्नं सुखेन
भुंजते तेषां मिष्टान्नसुखभोजिनाम् । अत्र लवणादि यद्यपि
वातशोणितहेतुतयोक्तं तथाऽपि शोणितदुष्टिकारणमेतत्
प्राधान्याज्ज्ञेयं, वातदुष्टिकारणं तु कषायेत्यादिनोक्तं, ततश्च
लवणादि कषायादि च मिलितं सद् वातशोणितोत्पादकं
भवति । यत्तु `जायते वातशोणितम्' इत्यनेन लवणा-
दीनां वातशोणितकारणत्वमुक्तं, तद्वातशोणितजनक-
शोणितदुष्टिकारणद्वारा ज्ञेयम् । अशुद्ध्येति शुद्धिकालेऽ
संशोधनात् । केचित् अभिघाताशुद्ध्या' इत्यस्य
स्थाने `अशुद्धया वातवैषम्यात्' इति पठन्ति । अशुद्ध्या
चेति चकारेन लवणादि प्रजागरैरित्तंन्य शोणितदुष्टि-
कारणं समुच्चिनोति । अत्र शोणितवातस्य विच्छिद्य
हेतुबहुपाठेन द्वयोरप्यत्र स्वतन्त्रं प्रकोपं दर्शयति । हयोष्ट्र
रुपेण यानेन यानं हयोष्ट्रयानयानम् । उष्णे चात्यध्ववैष
भ्यादिति उष्णे काले अत्यध्वजनिताद्वातवैषम्यात् ।
च. चि. २९-११ च. पा. टीका पान १४८२
लवण, अम्ल, कटु, क्षार, स्निग्ध व उष्ण पदार्थ सेवन करणें, क्लिन्न (नासलेले) वा शुष्क असे जलज आणि अनूपमांस, पेंड, मुळा, हुलगे, उडीद, पावटे, वाळलेल्या भाज्या, वाळलेले मांस, ऊस, दहीं, कांजी, ताक, मध, अशा द्रव्यांचें अतिसेवन, अजीर्ण भोजन, विरुद्धाशन, अध्यशन, क्रोध, दिवांस्वांप, जागरण या कारणांनीं ज्यांची प्रकृति मुळांत सुकुमार आहे जे मिष्टान्न खाणारे व सुखासीन आहेत, विशेषत: हलचाल न करतां बसून रहाण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे अशा व्यक्तींना वातरक्त हा व्याधी होतो. वर उल्लेखिलेलीं कारणें विशेषत: रक्तप्रदूषण करणारीं आहेत. त्यांच्या जोडीला अभिघातादि कारणे घडलीं, दुष्टरक्ताचें शोधन केलें नाहीं आणि कषाय, कटु, तिक्त, अत्यंतरुक्ष असा आहार घेणें, लंघन करणें, हत्ती, उंट, घोडा अशा वहानावरुन प्रवास करणें, पोहणें, पळणें, उडया मारणें, उन्हाळ्यांत उंच सखल रस्त्यावरुन फार चालणें, अतिमैथुन करणें, वेगनिग्रह करणें, अशीं वातप्रकोप करणारीं कारणें जोडीनें घडली तर वात आणि रक्त दोन्ही दुष्ट होऊन व्याधी उत्पन्न होतो.
संप्राप्ति
वायुर्विवृद्धो वृद्धेन रक्तेनावारित: पथि ॥१०॥
कृत्स्नं संदूषयेद्रक्तं तज्ज्ञेयं वातशोणितम् ।
खुडं वातबलासाख्यमाढयवातं च नामभि: ॥११॥
च. चि. २९/१०-११ पान १४८२
तस्य स्थानं करौ पादावड्गुल्य: सर्वसन्धय: ।
कृत्वाऽऽदौ हस्तपादे तु मूलं देहे विधावति ॥१२॥
सौक्ष्म्यात् सर्वसरत्वाच्च पवनस्यासृजस्तथा ।
तद्द्रवत्वात् सरत्वाच्च देहं गच्छन् सिरायनै: ॥१३॥
पर्वस्वभिहतं क्षुब्धं वक्रत्वादवतिष्ठते ।
स्थितं पित्तादि संसृष्टं तास्ता: सृजति वेदना: ॥१४॥
करोति दु:खं तेष्वेव तस्मात् प्रायेण सन्धिषु
भवन्ति वेदनास्तास्ता अत्यर्थ दु:सहा नृणाम् ॥१५॥
च. चि. २९/११ ते १५ पान १४८२
वायुरित्यादिना संप्राप्तिमाह । पथीति वायुवहनस्त्रोतसि ।
कृद्ध इति वृद्धोऽपि स्वहेतोर्वायु: पुन: शोणितेनावरणा
द्विशेषेण क्रुद्ध: । व्यवहारार्थ तन्त्रान्तरप्रसिद्धसंज्ञाभेदान-
प्याह खुडमित्यादि । खुडदेशप्राप्त्या खुड: खुडशब्दने
संधिरुच्यते, वातस्यावरणेन बलमस्त्यस्मिञ्, शोणिते
इति वातबलसा:; आढयानां प्रायो भवतीति आढयरोग:
च. चि. २९-११ टीका पान १४८२
वातशोणितस्य वैशेषिकं स्थानमाह । तस्य स्थानमित्यादि ।
करपादग्रहणेनैव अड्गुलीनां ग्रहणे प्राप्ते अड्गुलीनां
बहुपर्वतया विशेषेणाधिष्ठानत्वोपदर्शनार्थ पुनरभिधानम् ।
मूलमास्थायेति आस्पदं कृत्वा । देहधावने हेतुमाह -
सौक्ष्म्यादित्यादि । - सूक्ष्ममार्गानुसारित्वात् । वात-
शोणितस्य देहं सर्पतो विशेषेण पर्वावस्थानं सहेतुकमाह ।
तद्द्रत्वादित्यादि सिरायनैरिति सिरारुपैर्मार्गै: । वक्रत्वा-
दिति पर्वणाम् वक्रत्वात् । पित्तादि संसृष्टमिति पित्तेन
कफेन च हेत्वन्तरागतेन वायुना च युक्तम् । तस्मादिति
संधिष्ववस्थानात् ॥
च. चि. २९/१५ टीका पा. १४८३
तत्र बलवद्विग्रहादिभि: प्रकुपितस्य वायोर्गुरुष्णाध्यशन-
शीलस्य प्रदुष्टं शोणितं मार्गमावृत्य वातेन सहैकीभूत
युगपद्वातरक्तनिमित्तां वेदनां जनयतीति वातरक्तम् ।
तत्तु पूर्व हस्तपादयोरवस्थानं कृत्वा पश्चाद्देहं व्याप्नोति ।
सु. चि. ५/४ पा. ४२४
पाय लोंबकळत ठेवून हत्तीसारख्या वहानावरुन प्रवास करणें आणि मुळांत विदाही असलेल्या अन्नपानाचा अग्निमांद्यामुळें अधिकच विदाह होणें यासारख्या कारणांनीं वात व रक्त दोन्ही प्रकुपित होतात. वायूच्या मार्गात रक्तानें अडथळा उत्पन्न होतो. वायूमुळें प्रकुपित रक्त अधिकच दुष्ट होतें. सर्व सिरांतून प्रकुपित वायू व दुष्ट रक्त यांना संचार होतो आणि हें वातरक्त प्रथमत: हाताच्या व पायाच्या अंगूलींना असलेल्या पर्वसंधीच्या ठिकाणीं संचित होऊन त्या ठिकाणी शोथ व वेदना उत्पन्न करतें. दोषप्रकोप्रमाणें अंगुलींतील पर्वसंधीनंतर इतरही सांधे वातरक्तांत पकडले जातात. पर्वसंधीच्या ठिकाणीं जवळून जाणार्या वाहिन्यांना स्थानविशेषत्वानें वाकडें वळण येत असल्यानें संधींच्या रक्तामध्यें, अधिष्ठान संधीमध्यें व संचार वातवाहिन्या व रक्तवाहिन्या यांच्यांत असतो.
ननु रुजस्तीव्रा: ससंतापा इत्यादिना रक्तगतस्य वातस्य
लक्षणं वातव्याधावेयोक्तं, ततश्च वातरक्ताभिधानं पुनरुक्तं
स्यात्; नैवं, वातरक्तं हि दुष्टेन वातेन दुष्टेन रक्तेन च
विशिष्टसम्प्राप्तिकं विकारान्तरमेव । उक्तं हि चरके -
``वायु: प्रवृद्धो वृद्धेन रक्तेनावारित: पथि । क्रुद्ध: संदूषयेद्रक्तं
तज्ज्ञेयं वातशोणितम्'' - इति । रक्तगतवाते तु वात एव
दुष्टो रक्तमदुष्टमेव गच्छतीति भेद: ।
भा. नि. वातरक्त ३ टीका पा. २१३
रक्तगत वात व वातरक्त यांमध्यें संप्राप्ति दृष्टया भेद आहे. रक्तगत वातांत रक्त तितकेंसें दुष्ट नसतें. वात दुष्ट असतो. आणि दुष्ट वातासवें अदुष्टरक्त संचार करतें. वातरक्तामध्यें मात्र वायूप्रमाणेंच रक्ताची पण दुष्टी असते.
पूर्वरुप -
स्वेदोऽत्यर्थ न वा कार्ष्ण्य न वा स्पर्शाज्ञत्वं क्षतेऽतिरुक् ।
सन्धिशैथिल्यमालस्यं सदनं पिडकोद्गम: ॥१६॥
जानुजड्घोरुकटयसंहस्तपादाड्गसन्धिषु । निस्तोद: स्फुरणं
भेदो गुरुत्वं सुप्तिरेव च ॥
कण्डू: संधिषु रुग्भूत्वा भूत्वा नश्यति चासकृत् ।
वैवर्ण्य मण्डलोत्पत्तिवार्ता सृक् पूर्वलक्षणम् ॥१८॥
टीका: - स्वेदोऽत्यर्थमित्यादिना पूर्वरुपमाह । स्वेदोऽत्यर्थ
न वेति च यद्यपि कुष्ठपूर्वरुपेऽप्युक्तं, तथाऽप्यसमानभूरि-
पूर्वरुपसंबन्धादन्यतरयोगपूर्वरुपत्वे निश्चय: ॥
च. चि. २९/१६ ते १८ सटीक पान १४८३
क्षतेऽतिरुगिति यदि कारणान्तरात् क्षतं स्यात्तदाऽतिशयं
रुजा स्यात्, तद्देशस्य दुष्टवात् ।
मा. वि. वातरक्त ७ टीका पा. २१४
तस्य पूर्वरुपाणितोददाहकण्डूशोफस्तम्भत्वक्पारुष्य-
सिरास्नायुधमनास्वपन्दनसाक्थिदौर्बल्यानि श्यावा
रुणमण्डलोत्पत्तिश्चाकस्मात् पाणिपादतलाड्गुलिगुंल्फं-
मणिबन्धप्रभृतिषु, तत्राप्रतिकारिणोऽपचारिणश्च रोगो
व्यक्ततर:, तस्य लक्षणमुक्तं; तत्राप्रतिकारिणो वैकल्यं
भवति ।
सु. नि. ५-४ पान ४२४.
पुष्कळ घाम येणें, किंवा मुळींच घाम न येणें त्वचा काळवंडणें, स्पर्शज्ञान कमी होणें, कांहीं कारणानें क्षत व्रण झाल्यास त्या ठिकाणीं अत्यंत वेदना होणें, सांधे शिथील होणें, आळस, अंग गळून जाणें, पुटकुळ्या येणें, गुडघे, पोटर्या, मांड्या, कंबर, खांदे, हातापायांचीं बोटें व इतर सांधे या ठिकाणीं शोफ व स्तंभ, टोचल्यासारख्या वेदना, फुटल्यासारख्या वेदना, विशिष्ट प्रकारचें स्फुरण, सिरास्नायू, धमनीचे ठिकाणीं जडपणा, बधिरता हीं लक्षणें येणें, अंग खाजणें, सांध्याच्यामध्यें वरचेवर वेदना उत्पन्न होऊन नाहींशा होणें, अंगावर एकाएकीं चकंदळे उमटणें, त्वचेचा रंग बदलणें, हीं लक्षणें वातरक्ताचीं पूर्वरुपें म्हणून येतात. यांतील कांहीं लक्षणें कुष्ठाच्या पूर्वरुपांत सांगितल्याप्रमाणें असलीं तरी इतर अनेक वेगळ्या प्रकारच्या पूर्वरुपांच्या साहचर्यानें वातरक्ताच्या पूर्वरुपाचें वेगळेपण मानावें.
रुपें -
उत्तानमथ गम्भीरं द्विविधं तत् प्रचक्षते ।
त्वड्वांसाश्रयमुत्तानं गम्भीरं त्वन्तराश्रयम् ॥१९॥
कण्डूदाहरुगायामतोदस्फुरणकुञ्चनै: ॥
अन्विता श्यावरक्ता त्वग्बाह्ये ताम्रा तथेष्यते ॥२०॥
गम्भीरे श्वयथु: स्तब्ध: कठिनोऽन्तर्भृशार्तिमान् ।
श्यावस्ताम्रोऽथवा दाहतोस्फुरणपाकवान् ॥२१॥
रुग्विदाहान्वितोऽभीक्ष्णं वायु: सन्ध्यस्थिमज्जसु ।
छिन्दन्निव चरत्यन्तर्वक्रीकुर्वश्च वेगवान् ॥२२॥
करोति खंजं पड्गुं वा शरीरे सर्वतश्चरन् ।
सर्वैर्लिड्गैश्च विज्ञेयं वातासृगुभयाश्रयम् ॥२३॥
वातशोणितस्य अवगाढानवगाढभं चिकित्सार्थमाह-
उत्तानमित्यादि ।
अन्तराश्रयमिति त्वड्वांसव्यतिरिक्तगम्भीरधात्वाश्रयम् ।
सर्वैर्लिड्गैरिति उत्तानगम्भीरवातरक्तोक्तै र्मिलितै: ।
अयं च तृतीय: प्रकारो बाह्याभ्यन्तर प्रकारोक्त प्रकारगृहीत
एवेति कृत्वा रोगसंग्रहे द्विविधं वातशोणितमुक्तम् ।
``द्विविधं वातशोणितमुत्तानमवगाढं चेत्येके आषन्ते तत्तु
न सम्यक्, कस्मात् ? कुष्ठदुत्तानं भूत्वा कालान्तरेणावगाढीभवति''
इत्यनेन सुश्रुतेन यद्द्वैविध्यं खण्डितं तदाचार्ययो: परमात्मनो:
सुश्रुताग्निवेशयोरेकस्याप्यप्रामाण्यं न संगतमिति कृत्वा
अविरोधमेवात्र व्याख्यानयाम:; तथाहि सुश्रुतेन उत्तानं वातशोणितं
कुष्ठवद्गम्भीरं भवतीत्युच्यते, न तु सर्वभेवोत्तानं भूत्वा
गम्भीरं भवतीति प्रतिज्ञायते; तेन यो ब्रूते उत्तानमेवावतिष्ठते,
तं प्रति सुश्रुतवचनं बाधकं; तन्न, चरके उत्तानमेवावतिष्ठते इति
नोच्यत एव, किंतु प्रथमोत्पत्तौ किंचिदुत्तानमुत्पद्यते, किंचित्तु
गम्भीरमिति, तेन न विरोधश्चरकसुश्रुतयो: ।
च. चि. २९-१९ ते २३ सटीक पान १४८४
रुपें
उत्तान व गंभीर असे वातरक्ताचें दोन प्रकार चरकानें मांडले आहेत. उत्तान वातरक्त त्वक् आणि मांस यांच्या आश्रयानें असतें. या प्रकारांत कंडू, दाह, रुजा, तोद, स्फुरण, आंकुचन, आयास, व त्वचा काळसर तांबूस होणें किंवा लाल होणें हीं लक्षणें असतात. गंभीरवातरक्त मेद, अस्थि, मज्जा, यांच्या आश्रयानें असून त्यांत शोथ, स्तब्धता, कठिणता वेदनाधिक्य, दाह, टोचल्यासारख्या वेदना, फुरफुरणें, पाक होणें, संधि, अस्थि मज्जा, याठिकाणीं तोडल्यासारख्या वेदना होणें, अवयवांना वाकडेपणा येणें, लंगडेपणा पांगळेपणा येणें, अशीं लक्षणें होतात. त्वचा काळसर तांबूस होते. वातरक्त प्रथम उत्तान होऊन मग अवस्थानुरुप गंभीर होत असल्यामुळें वातरक्ताचे उत्तान व गंभीर असें स्वतंत्र प्रकार मानणे योग्य नाहीं असें सुश्रुतानें म्हटलें आहे. टीकाकारानें या भासमान विरोधाचा समन्वय उत्तम रीतीनें केला आहे. उपेक्षेनें किंवा दोषप्राबल्यानें उत्तान वातरक्त गंभीर होऊं शकतें. पण त्वचेमध्यें लक्षणें नसलेले असें वातरक्त असूंच शकत नाहीं असें मानण्याचें कारण नाहीं. गंभीर स्वरुपाचें वातरक्त आरंभी असूं शकतें. त्वचेंत उत्पन्न होणारी लक्षणें नंतर उत्पन्न होऊं शकतात. ज्वराच्या शारीर मानस भेदाप्रमाणेंच हा भेद मानावा. यासाठीं चरकानें सर्व लक्षणांनीं युक्त असें उभयाश्रयी वातरक्त असल्याचें सांगितलें आहे.
दोषभेदाने प्रकार
तत्र वातेऽधिके वा स्याद्रक्ते पित्ते कफेऽपि वा ।
संसृष्टेषु समस्तेषु यच्च तच्छृणु लक्षणम् ॥२४॥
विशेषत: सिरायामशूलस्फुरणतोदनम् ।
शोथस्य कार्ष्ण्यं रौक्ष्यं च श्यावतावृद्धिहानय: ॥२५॥
धमन्यड्गुलिसन्धीनां सड्कोचोऽड्गग्रहोऽतिरुक् ।
कुञ्चने स्तम्भने शीतप्रद्वेषश्चानिलेऽधिके ॥२६॥
श्वयथुर्भृशरुक् तोदस्ताम्रश्चिमिचिमायते ॥
स्निग्धरुक्षै: शमं नैति कण्डूक्लेदान्वितोऽसृजि ॥२७॥
विदाहो वेदना मूर्च्छा स्वेदस्तृष्णा मदो भ्रम: ।
राग: पाकश्च भेदश्च शोषश्चोक्तानि पैत्तिके ॥२८॥
स्तैमित्यं गौरवं स्नेह: सुप्तिर्मन्दच रुक् कफे ।
हेतुलक्षणसंसर्गाद्विद्याद्वन्द्वत्रिदोषजम् ॥
च. चि. २९-२४-२९ सटीक पान १४८४-८५
तत्र वातेऽधिके इत्यादौ रक्ते-पित्ते कफे वा `अधिक'
इत्यनुवर्तनीयं; तेन पित्तवृद्धि; शोणितवृद्धि कफवृद्धिश्च ज्ञेया ।
संसृष्टेष्विति द्वित्रेषुं मिलितेषु समस्तेष्विति चतु:ष्वंपि
मिलितेष्वधिकेषु ।
सिरायामेत्यादिना वाताद्युल्बणानां चतुर्णा लक्षणमाह ।
आयाम: विस्तरणम् । श्यावता श्याववर्णत्वं ।
श्वयथुरित्यादीना असृजीत्यन्तेन उद्रिक्तरक्तस्य लक्षणम् ।
द्वद्वत्रिदोषजमित्यत्र अधिकशोणितानुबन्धोऽपि
वातशोणितस्य पूर्वटीकाद्भि: पञ्चचत्वारिंशद्भेदा उक्ता: ।
खरनादेन तु प्रकरणान्तरेण षट्त्रिंशद्विधमुक्तम् ।
उक्तं हि ``वातोचर प्रवृध्दासृक् पञ्चत्रिंशद्विधं मतम् ।
पित्तात्त्रिंशद्विधं योगात् कफादृशविधं मतम्'' इति ।
एते भेदा अनतिप्रयोजनत्वान्न विवृता: ॥
च. चि. २९-२४ ते २९ सटीक पान १४८४
वाताधिक वातरक्तामध्यें सिराच्या ठिकाणीं ताणल्यासारख्या वेदना (आयाम), शूल, स्फुरण, तोद हीं लक्षणें असतात. सांध्याच्या ठिकाणीं येणारा शोथ कृष्णवर्ण व रुक्ष असून त्यावरील श्यावता कमी अधिक होते. शोथ ही कमी अधिक होतो. धमनी, अंगुली आणि संधी यांचा संकोच होतो. अंग जखडल्यासारखें होतें. वेदना अधिक असतात.अवयव संकुचित झाल्यासारखे, जखडल्यासारखे असतात. शीतता नकोशी वाटते. रक्ताधिक वातरक्तामध्यें शोथ व वेदना अधिक असतात.
तोद, अशक्तता, मुंग्या येणें, कंड, ओलसरपणा हीं लक्षणें अधिक असतात. स्निग्ध वा रुक्ष प्रयोगांनीं उपशम होत नाहीं. पित्ताधिक वातरक्तामध्यें विदाह (आग होणें), वेदना, मूर्च्छा, स्वेद, तृष्णा, मद, भ्रम, लाली अधिक असणें, पाक (कोथ होणें) भेगा पडणें, अवयवयांना शुष्कता येणें, (अवयव वाळून शुष्कता येणें) अशीं लक्षणें असतात. कफाधिक वातरक्तामध्यें स्तैमित्य (ओलसर गार) जडपणा, स्निग्धता, स्पर्शज्ञान नसणें, मंदवेदना, हीं लक्षणें असतात.
द्विदोषज व सांन्निपातिक यांमध्यें त्या त्या प्रकारच्या लक्षणांचें संमिश्रण असतें, अनेक ग्रंथकारांनीं ४५/३६ असे वातरक्ताचे प्रकार कल्पिले आहेत. चिकित्सेसाठीं यांचा उपयोग नाहीं म्हणून टीकाकारांनीं या प्रकारभेदांचीं वाट लावली आहे.
चिकित्सा संदर्भानें लक्षणें
हृद्रोग, पांडुरोग, विसर्प, कामला, ज्वर, (च. चि. २९/५७) हिक्का, स्वरभेद, भगंदर, पार्श्वशूल, भ्रम, कास, प्लीहा, क्षतज शोष, अपस्मार, अश्मरी, शर्करा, सर्वांगरोग, एकांगरोग, मूत्रसंग (च. चि. २९/६८, ६९)
योनिदोष, उन्माद, कंप, आक्षेप, शुक्रक्षय (च. चि. २९.१०८/१०९)
वृद्धि स्थान क्षय
राग, शोथ, शूल, स्तंभ आणि पाक हीं लक्षणें उत्पन्न झालीं वा वाढलीं म्हणजे व्याधी वाढत जातो आहे असें समजावें. शोथ, शूल, नष्ट झाला व सांध्यांच्या हालचाली व आकुंचन प्रसरण व्यवस्थित होऊं लागले म्हणजे व्याधी बरा होतो आहे असे समजावे.
उपद्रव
अस्वप्नारोचकश्वासमांसकोशिरोग्रहा: ।
मूर्च्छायमदरुक्तृष्णाज्वरमोहप्रवेपका: ॥३१॥
हिक्का पांड्गुल्यवीसर्पपाकमोहभ्रमक्लमा: ।
अड्गुलीवक्रता स्फोटा दाहमर्मग्रहार्बुदा: ॥३२॥
च. चि. २९-३१-३२ पान १४८५
निद्रानाश, अरोचक, श्वास, मांसकोथ, शिरोग्रह, मूर्च्छा, मद, वेदना, तृष्णा, ज्वर, मोह, हिक्का, पांगुल्य, विसर्प, पाक, तोद, भ्रम, बोटें वाकडीं होणें, फोड येणें, दाह, कुष्ठ, हृद्रोग, अर्बुद हे उपद्रव मानतात.
उदर्क
बोटें वांकडीं होणें, अवयव झडणें, हृद्रोग
साध्यासाध्यविवेक
एकदोषानुगं साध्यं नवं, याप्यं द्विदोषजम् ।
त्रिदोषजमसाध्यं स्वाद्यस्य च स्युरुपद्रवा: ॥३०॥
च. चि. २९ पान १४८५
एकदोषज निरुपद्रव वातरक्त साध्य असतें. द्विदोषज व अल्पोपद्रवयुक्त वातरक्त वाप्य असतें आणि त्रिदोषज, सर्व उपद्रवयुक्त, स्त्रावयुक्त, अवयव जखडणारें, अर्बुद उत्पन्न झालेलें, अवयवांचा संकोच करणारें, इंद्रियांना पीडा देणारें वातरक्त असाध्य असतें. मोह हें एकच असलें किंवा प्रमेह हा एकच उपद्रव झाला तरी वातरक्त असाध्य असतें.
रिष्ट लक्षणें --
वातास्त्रं मोहमूर्च्छायमदस्वप्नज्वरान्वितम् ॥९९॥
शिरोग्रहारुचिश्वाससंकोचस्फोटकोथवत् ।
वा. शा. ५-९९ पान ४२७
विसर्प, कोथ, ज्वर, मूर्च्छा, मोह, मद, निद्रानाश, शिरोग्रह, अरुचि, श्वास, संकोच व स्फोट हीं रिष्ट लक्षणें होत.
चिकित्सासूत्रें
विरेच्य:स्नेहयित्वाऽऽदौ स्नेहयुक्तैर्विरेचनै: ।
रुक्षैर्वा मृदुभि: शस्तमसकृद्बस्तिकर्म च ॥
संकाभ्यड्ग प्रदेहान्नस्नेहा: प्रायोऽविदाहिन: ।
वातरक्ते प्रशस्यन्ते ।
च. चि. २९-४१
विशेषं तु निबोध मे ॥४२॥
बाह्यमालेपनाभ्यड्गपरिषेकोपनाहनै: ।
विरेकास्थापनस्नेहपानैर्गम्भीरमाचरेत् ॥
सर्पिस्तैलवसामज्जापानाभ्यञ्जनबस्तिभि: ।
सुखोष्णैरुपनाहैश्च वातोत्तमुपाचरेत् ॥
विरेचनैर्घृतक्षीरपानै: सेकै: सबस्तिभि: ।
शीतैर्निर्वाणपैश्चापि रक्तपित्तोत्तरं जयेत् ॥
वमनं मृदु नात्यर्थ स्नेहसेकौ विलड्घनम् ।
कोष्णा लेपाश्च शस्यन्ते वातरक्ते कफोत्तरे ॥
कफवातात्तर शात: प्रीलेप्त वातशोणिते ।
दाहशोथरुजाकण्डू विवृद्धि: स्तम्भनाद्भवेत् ॥
रक्तपित्तोत्तरे चोष्णैर्दाहै: क्लेदोऽवदारणम् ।
भवेत्तस्माद्भिषग्दोषबलं बुद्ध्वाऽऽचरित्क्रियाम् ॥
च. चि. २९/४२-४८ पान १४८६-८७
प्रथम स्नेहन देऊन नंतर स्नेहयुक्त विरेचन द्यावें किंवा रुक्ष मृदु विरेचन द्यावें. वरचेवर बस्तिकर्म करावें. सेक, अभ्यंग, स्नेह आणि आहार या गोष्टी विदाह उत्पन्न करणार नाहींत अशा असाव्यात. उत्तान वातरक्तावर आलेपन, अभ्यंग, परिषेक आणि उपनाह हे उपचार करावेत. गंभीर वातरक्तावर स्नेहपान, विरेचन, आस्थापनबस्ती यांचा उपचार करावा. वातप्रधान वातरक्तासाठीं चतुर्विध स्नेहाचें प्राशन करावें. हाच महास्नेह अभ्यंग व बस्तीसाठीं वापरावा. उपनाह सुखोष्ण असावा. रक्तप्रधान व पित्तप्रधान वातरक्तावर विरेचन, घृतपान, क्षीरप्राशन, क्षीरबस्ती, शीत आणि निर्वापण (पित्तरक्तशमन) द्रव्यांनीं परिषेक करावा. कफप्रधान वातरक्तासाठीं मृदु वमन, अल्पप्रमाणांत स्नेह व स्वेद लंघन, कोष्ण असे लेप हे उपचार करावेत. कफवातप्रधान वातरक्तावर शीतप्रलेप केला असतां स्तंभन होऊन दाह, शोथ, रुजा, कंडू हीं लक्षणें
वाढतात. रक्तपित्तप्रधान वातरक्तावर उष्ण उपचार केले असतां क्लेद उत्पन्न होणें, त्वचा फाटणें, अशीं लक्षणें उत्पन्न होतात. यासाठीं दोषांचा अनुबंध, पाहून चिकित्सा करावी.
रक्तमार्ग निहन्त्याशु शाखासन्धिषु मारुत: ।
निविश्यान्योन्यमावार्य वेदनाभिहरेदसून् ॥३५॥
तत्र मुञ्चेदसृक् शृड्गजलौक:सूच्यलाबुभि: ।
प्रच्छानैर्वा सिराभिर्वा यथादोषं यथाबलम् ॥३६॥
च. चि. २९/३५-३६ पान १४८५-८६
वात व रक्त हे एकमेकांच्या मार्गात अडथळा उत्पन्न करुन सर्व संधींच्या ठिकाणीं तीव्र स्वरुपाच्या वेदना उत्पन्न करतात. यासाठीं रोग्याचें व रोग्याचें बलाबल पाहून शृंग, जलौका, सुचि, (सुया), अलाबू वा प्रच्छान या प्रकारानें रक्तमोक्ष करा.
कल्प
गुडूची, मंजिष्ठा, सारिवा, पर्पट, कुमारी, निंब, निर्गुडी, शतावरी, दशमुळें, जीवनीय गणांतील द्रव्यें, एरंड, त्रिफळा, रास्ना, मौक्तिक, शिलाजतु, गंधकरसायन, अमृतागुग्गुळ, कैशोरेगुग्गुळ, कामदुघा, सर्वांगसुंदरी, सर्वतोभद्रवटि.
पथ्यापथ्य
जुने गहूं, यव, तृणधान्यें, साठेसाळी, मूग, तूर, मसूर हीं धान्यें खावीं.