रक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


किलासमपि कुष्ठविकल्प एव; तत्त्रिविधं वातेन, पित्तेन
श्लेष्मण: चेति । कुष्ठकिलासयोरन्तरं - त्वग्गतमेव
किलासमपरिस्त्रावि च । तद्वातेन मण्डलमरुणं परुषं
परिध्वंसि च । पित्तेन पद्मपत्रप्रतीकाशं सपरिदाहं च,
श्लेष्मणा श्वेतं स्निग्धं बहलं कण्डूमच्च ।
सु. नि. ५-१७ पान २८६ - ८७

त्वग्दोष सामान्यत् किलासं निर्दिशन्नाह किलासमपीत्यादि
अपि शब्दात् किंचित्किलासं कुष्ठविकल्पो न भवतीत्याह-
कुष्ठकिलासयोरन्तरमित्यादि । अन्तरं भेद: । त्वग्गतमेव
किलासं, कुष्ठं तथा न भवति; अपरिस्त्रवि च, `कुष्ठं तथा
न भवति' इति शेष: । यदा तु रक्तादिगतं परिस्त्रावि
तदा न किलाससंज्ञं, किं तर्हि कुष्ठसंज्ञमेव । तस्य कुष्ठो
द्धेतुविशेषोऽप्यस्ति दोषकोपनं विरुद्धाध्यशनादि पापकर्मापि
तत्रान्तरे । - टीका

कुष्ठैकसंभवं श्वित्रं किलासं वारुणं भवेत् ।
निर्दिष्टमपरिस्त्रावि त्रिधातूद्‍भवसंश्रयम् ॥
वाताद्‍रुक्षारणं पित्तात्ताम्रं कमलपत्रवत् ।
सदाहं रोमविध्वंसि कफाच्छे‍वतं घनं गुरु ॥

सकण्डुरं क्रमाद्रक्तमांसमेद:सु चादिशेत् ।
वर्णेनैवेदृगुभयं कृच्छ्रं तच्चोत्तरोत्तरम् ॥
मा. नि. कुष्ठ ४७ पृ. ३४१

किलास वा श्वित्र हा कुष्ठाच्या जातीचाच पण आत्तापर्यंत उल्लेखलेल्या कुष्ठापेक्षां निराळ्या स्वरुपाचा असा रोग आहे. यामधील दोषदुष्टी व धातुदुष्टी कुष्ठांइतकी व्यापक नसते, एकदा दोष आणि त्वचा यांचीच दुष्टी यामध्यें असते. त्यामुळें कुष्ठांतील वेदना, दाह, पाक, कोथ, स्त्राव हीं लक्षणें यांत नसतात. श्वित्र आणि किलास हे एकमेकांचे म्हणूनही वापरले आहेत किंवा श्वित्र किलासाचा प्रकारही सांगितला आहे. कारणभेदानें हीं कुष्ठें दोन प्रकारची असतात असें म्हटलें आहे. एक दोषज आणि दुसरें व्रणज. व्रणज श्वित्र आघातामुळें उत्पन्न होणारा व्रणाचा परिणाम म्हणून किंवा अग्निदाहोत्थ व्रणाचा परिणाम म्हणून उत्पन्न होणारा व्रणाचा परिणाम म्हणून किंवा अग्निदाहोत्थ व्रणाचा परिणाम म्हणून उत्पन्न होते. त्वचेवर पांढरा डाग पडतो. व्यवहारामध्यें यासच पांढरें कोड अशी संज्ञा आहे. भोजानें दोषज श्वित्राचेही आत्मज आणि परज असे दोन प्रकार मानले आहेत. यांतील परगात्रस्पर्शापासून उत्पन्न होणार्‍या परज प्रकाराला श्वित्रामध्यें समाविष्ट करण्यापेक्षां विश्वामित्रानें सांगितलेल्या - त्वचेचें अतिक्रमण करुन धातूंत अवगाहन करणार्‍या - कुष्ठभेदामध्यें समाविष्ट करावें, हे अधिक बरें असें आम्हांस वाटतें. चरकानें दोषदूष्य भेदानें कांहीं प्रकार सांगितले आहेत. दारुण, वारुण, श्वित्र, असे किलासाचे तीन प्रकार असल्याचें चरक सांगतो. दोष रक्ताश्रित झाल्यामुळें रक्तवर्णाचे दारूण नांवाचे किलास कुष्ठ उत्पन्न होतें. दोष मांसाश्रित झाल्यामुळें ताम्रवर्णाचे वारुण नांवाचें किलास कुष्ठ उत्पन्न होतें. दोष मेदाश्रित झाल्यामुळें श्वेतवर्णाचे श्वित्र नांवाचे किलासकुष्ठ उत्पन्न होते.

सामान्य कुष्ठ व किलास कुष्ठ यामध्यें केवळ त्वग्गत असणें, स्त्राव नसणें यामुळें भेद उत्पन्न होतो, इतर कुष्ठेंही स्त्रावयुक्त उत्तरोत्तर गंभीर धातूंमध्यें जाणारीं, पाक, कोथ उत्पन्न करणारीं असतात. चरकानें सांगितलेला धातूंचा आश्रय हा दुष्टीच्या स्वरुपाचा नसून वैगुण्याचा स्वरुपाचा आहे. दोष हे रक्त, मांस वा मेद यांच्या आश्रयांनीं राहून रस व त्वचा यांना दुष्ट करुन श्वित्र उत्पन्न करतात असा चरकाचा आशय असल्याचें गयदासानें आपल्या टीकेंत सांगितलें आहे. गयदासाचें हें म्हणणें आम्हांस योग्य वाटतें. (सु. नि. ५-१७ न्या. स. टीका)

माधवनिदानकार व वाग्भट हे चरकाच्या अनुषंगानें कुष्ठाचें जें निदान तेंच श्वित्राचेंही आहे असें सांगतात. या किलास वा श्वित्रामध्यें दोषभेदानें कांहीं लक्षणभेद उत्पन्न होतो. वातज किलास कुष्ठ अरुण वर्णाचें, खरखरीत व परिध्वंसी म्हणजे नाहींसें होणारें असतें. पित्तज किलास कुष्ठ कमळाच्या पाकळ्यांप्रमाणें तांबुस वर्ण असणारें व किंचित् दाहयुक्त असें असतें. कफज किलास कुष्ठ श्वेतवर्ण, स्निग्धस्पर्श, मोठया क्षेत्रांत पसरलेलें असतें, आणि (किंचित्) कण्डुयुक्त असतें. क्वचित् किलास कुष्ठामध्यें सामान्य स्वरुपाची कुष्ठविकृतीही संभवते. ती उपद्रवाच्या स्वरुपाची मानावी. कुष्ठामधील नामविशेष यांचें नेमकें ज्ञान प्रत्येक वेळेला होतेच असें नाहीं. यासाठीं चरकानें कुष्ठविशेष व दोषविशेष यांचें ज्ञान परस्परावलंबी मानलें आहे.

कुष्ठविशेषैर्दोषा दोषविशषै: पुनश्च कुष्ठानि ।
ज्ञायन्ते तैर्हेतुर्हेतुस्तांश्च प्रकाशयति ॥
संप्रति दोषविशेषजातस्य कुष्ठविशेषस्य तथा कुष्ठजनकस्य
च हेतो: परस्परबोधकत्वमाह-कुष्ठविशेषैरित्यादि । कुष्ठविशे
षैर्दोषा इति कुष्ठविशेषै: कापालादिभिर्दोषा वातादयो
ज्ञायन्ते; तथा दोषविशेषै: पुन: कुष्ठानीति वाताधिकोऽयं
पैत्तिकोऽयमिति कुष्ठदोषे परिज्ञाते दोषविशेषज्ञानाद्वि-
शिष्टानि कुष्ठानि ज्ञायन्ते; यथाइदम् वातोत्तरं कुष्ठं,
तस्मात् कापालम्; इदं पित्ताधिकत्वान्मण्डलमित्यादि
तथा य: कुष्ठेष्वपरिज्ञातो हेतु: स दोषविशेषैर्ज्ञायते;
यथाकुष्ठं वातोत्तरं दृष्ट्‍वा वातोत्तरकुष्ठजनकानि
रुक्षविरुद्धाशनादीनि कारणानि ज्ञायन्ते । हेतुभिश्च दोष-
विशेषजनकै: कुष्ठानि ज्ञायन्ते, यस्मादनेन वातोत्तरकुष्ठ-
जनकं सेवितं तस्मादस्य वातोत्तरं कापालं कुष्ठं भविष्य-
तीति । किंवा कुष्ठदोषयोरन्योन्यगमकत्वं कार्यकारणतया
परस्परगमकत्वादुपपन्नमिति दर्शयन्नाह-तैरिति; तै: कुष्ठै:
कार्यरुपैर्हेतुर्नामदोष: अनुमीयते, हेतुश्च दोषरुपस्तान्
कार्यरुपकुष्ठविशेषानवगमयतीत्यर्थ: ॥३३॥

च. चि. ७/३३ सटीक १०५२-५३

कधी कुष्ठाचें सादृश्यानें प्राप्त होणारें नांव लक्षांत आलें म्हणजे स्पष्ट असें लक्षणांचें वैशिष्टय न दिसलें तरी आगम प्रमाणावरुन त्यांतील दोषांचें ज्ञान करुन घ्यावें. याउलट नामसादृश्याशीं जुळणारें लक्षण तेव्हढें स्पष्टपणें कुष्ठाच्या लक्षणामध्यें दिसून येत नाहीं, परंतु दोषांना स्पष्ट करणारीं लक्षणें कुष्ठामध्यें असतात त्यावरुन कुष्ठाला कारणीभूत असलेला दोष कोणता आहे हें समजूं शकतें आणि दोषभेदानें केलेलें कुष्ठांच्या प्रकारांचें वर्गीकरण लक्षांत घेऊन लक्षणसादृश्यानें कुष्ठाचा प्रकार ठरवतां येतो. या दोन्ही गोष्टी निश्चित झाल्या (कुष्ठभेद व दोषभेद) म्हणजे प्रत्यक्ष सांगितलीं गेलीं नसलीं तरी कुष्ठाचीं कारणें (अपथ्यें) अनुमानितां येतात व अपथ्याचें स्वरुप समजलें तर त्यावरुन दोष व कुष्ठभेद यांचे ज्ञान होतें. दोषभेदानें कुष्ठामध्यें आढळणारीं लक्षणें पुढीलप्रमाणें असतात.

रौक्ष्यं शोषस्तोद: शूलं संकोचनं तथाऽऽयाम: ।
पारुष्यं खरभावो हर्ष: श्यावारुणत्वं च ॥
कुष्ठेषु वातलिड्गं, दाहौ राग: परिस्त्रव: पाक: ।
विस्त्रो गन्ध: क्लेदस्तथाऽड्गपतनं च पित्तकृतम् ॥
श्वैत्यं शैत्यं कण्डू: स्थैर्यं चोत्सेधगौरवस्नेहा: ।
कुष्ठेषु तु कफलिड्गं जन्तुभिरभिभक्षणं क्लेद: ॥
च. चि. ७ ३४ ते ३६ पा. १०५३

तत्र वात: श्यावारुणवर्ण परुषतामपि च रौक्ष्यशूलशोष
तोदवेपथुहर्षसड्कोचायासस्तम्भसुप्तिभेदाड्गान्, पित्तं दाह-
स्वेदक्लेदकोथस्त्रावपाकरागान्, श्लेष्मा त्वस्य श्वैत्यशैत्यकण्डू-
स्थैर्यगौरवोत्सेधोपस्नेहोपलेपान्, क्रियमस्तुत्वगादींश्चतुर:
सिरा: स्नायूश्चास्थीन्यपि च तरुणान्याददते ॥
च. नि. ५/१८ पा. ४६४

कुष्ठांतील वातज लक्षणें

रुक्षता, सुकणें (बारीक होणें), टोचल्यासारख्या वेदना; भाला घुसल्यासारख्या वेदना, अवयव संकुचित होणें (आखडणें), ताणले जाणें वा ताणले गेल्यासारखे वाटणें, स्पर्श खरखरीत लागणें, अंगावर रोमांच उभे राहणें; कुष्ठाचा रंग अरुण व श्याव असणें स्तंभ व कंप, भेद, भंग बधिरपणा.

कुष्ठांतील पित्ताचीं लक्षणें

कुष्ठभागीं आग होणें, लाली येणें, स्त्राव होणें, पाक होणें, दुर्गंधी येणें, चिकटपणा, मलीनपणा, ओलसरपणा जाणवणें, अवयव झडणें, कुजणें.

कुष्ठांतील कफाचीं लक्षणें

कुष्ठाचा वर्ण पांढरा असणें, स्पर्श शीत असणें, कुष्ठभागीं खाज सुटणें, कुष्ठ लवकर बरें न होणें, कुष्ठाची जागा सुजल्यासारखी उंचावणें, त्वचा स्निग्ध असणें, कुष्ठ झालेल्या जागीं जडपणा वाटणें, चिकट स्त्राव येणें, जंतू उत्पन्न होणें आणि जंतूंनीं सिरा, स्नायू तरूणास्थि असे ते ते भाग खाल्ले जाणें. या लक्षणांनीं कुष्ठामधील दोषभेद निश्चित करावा. कुष्ठामध्यें सामान्य अशी दोषविकृती कांहीं मर्यादेपर्यंत संप्राप्तीमध्यें सांगितलेली आहेच. उपेक्षेनें वा दोषांच्या प्राबल्यानें कुष्ठांतील धातुदुष्टी अधिकाधिक वाढत जाते व कुष्ठ अधिकाधिक गंभीर होत जातें. कुष्ठाची ही प्रवृत्ती त्याच्या धातुगत अवस्थेची द्योतक आहे. माधवनिदानकारानें धातुगतावस्थेचीं लक्षणें पुढीलप्रमाणें दिलीं आहेत.

त्वक्स्थे वैवर्ण्यमड्गेषु कुष्ठे रौक्ष्यं च जायते ॥२५॥
त्वकूस्वापो रोमहर्षश्च स्वेदस्याति प्रवर्तनम् ।
कण्डूर्विपूयकश्चैव कुष्ठे शोणितसंश्रिते ॥२६॥
बाहुल्यं वक्त्रशोषश्च कार्कश्यं पिडकोद्गम: ।
तोद: स्फोट: स्थिरत्वं च कुष्ठे मांस समाश्रिते ॥२७॥
कौण्यं गतिक्षयोऽड्गानां संभेद: क्षतसर्पणम् ॥
मेद: स्थानगते लिड्गं प्रागुक्तानि तथैव च ॥२८॥
नासाभड्गो ऽ क्षिरागश्च क्षतेषु क्रिमिसंभव: ।
स्वरोपघातश्च भवेदस्थिमज्जसमाश्रिते ॥२९॥
दम्पत्यो: कुष्ठबाहुल्याद्‍दुष्टोशोणीतशुक्रयो: ।
यदंपत्यं ययो जातं ज्ञेयं तदपि कुष्ठितम् ॥३०॥
मा. नि. कुष्ठ २५ ते ४९ पा. ३३८-३९

त्वग्‍गत कुष्टामध्यें वैवर्ण्य, रौक्ष्य, रोमहर्ष, फार घाम येणें (घाम न येणें) त्वचेंचे स्पर्शज्ञान नाहीसें होणें अशीं लक्षणें होतात. त्वचा आणि रस समान मानण्याची आयुर्वेदीयांची पद्धती आहे. त्यामुळें रसगत किंवा त्वग्‍गत हे शब्द पर्यायासारखेच समजावे. कांहीनीं, त्वचा ही उदकधरा आहे असें मानलें आहे. उदक व रस भिन्न आहेत. त्यामुळें त्वग्गत कुष्ठ हेंच रसगत कुष्ठ मानूं नये असें म्हटलें आहे. कुष्ठजनक दोष रसवाहिनींच्या द्वाराच शरीरामधें संचार करीत असल्यानें कुष्ठाचें निराळें रसगतत्व मानलें नसावे, असें टीकाकारानें एक मत सांगितलें आहे. आम्हांस त्वग्गत व रसगत कुष्ठ एकच वाटतात. रसधातू आणि अप्‍ धातू या दोघांचा वेगळेपणा मानला तरी वरील विधानास बाध येत नाहीं. धातूगतावस्था आणि धातूंच्या आश्रयाने राहाणें यांतील भेद आम्ही मागेच स्पष्ट केला आहे. त्यामुळें दोष रसवाहिन्यांतून संचार करीत असले तरी रसगतावस्था निराळी असूं शकते हें लक्षांत येईल. रक्तगत कुष्ठामध्यें खाज सुटणें, पूय उत्पन्न होणें (आग होणें) हीं लक्षणें उत्पन्न होतात. मांसगत कुष्ठामध्यें कुष्टानें अधिक क्षेत्र व्यापणें, तोंड कोरडें होणें, कुष्ठाचा भाग स्पर्शाला कठिण लागणें, पिडका उत्पन्न होणें, टोचल्यासारख्या वेदना होणें, फोड येणें,कुष्ठ स्थिर होणें अशीं लक्षणें होतात. मेदोगत कुष्ठामध्यें वर उल्लेखलेल्या धातुगत लक्षणांसह हात फुटून निकामी होणें, चालतां न येणें, निरनिराळ्या अवयवांचा भंग होणें, (फुटणें), व्रण पसरत जाणें, ही लक्षणें होतात. (मागच्या धातूंतील लक्षणें पुढील धातूंतही दिसतात. धातुगत अवस्थेंतील हा सामान्य नियम समजावा. विशिष्ट धातूंच्यामध्यें सारता असेल त्या वेळींच अपवाद उत्पन्न होईल.) अस्थिमज्जागत कुष्ठामध्यें नाक बसणें, (नाकांतील हाड झडून गेल्यामुळें) डोळे लाल होणें, व्रणामध्यें किडे उत्पन्न होणें, आवाज बसणें हीं लक्षणें होतात. शुक्रगत कुष्ठामुळें (नपुंसकत्व, अनपत्यता येते) मूल झाल्यास तें कुष्ठी होतें.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें

शोथ, ग्रहणी, अर्श, मूत्रकृच्छ्र, बस्तिशूल, विषम ज्वर, हलीमक (च. चि. ७-६४)
श्वास, भगंदर, कास, किलास, प्रमेह, शोष, (च. चि. ७-७९)
ज्वर, दाह, गुल्म, विद्रधी, भ्रम, विस्फोट. (च. चि. ७-१३९)
विसर्प, अम्लपित्त, वातरक्त, रक्तपित्त, पाण्डुरोग, उन्माद, कामला, हृद्‍रोग, प्रदर, गंडमाला. (च. चि. ७-१० ८-४९)

वृद्धिस्थान - प्रसर

कुष्ठाचे व्रण बरें न होणें, सुती वाढत जाणें, कुष्ठ पसरत जाणें, पाक, राग, दाह हीं लक्षणें वाढत जाणें यावरुन कुष्ठ वाढत आहे असें समजावें. स्फोट, स्त्राव, कंडु, ही लक्षणें कमी होणें, स्पर्शज्ञान येणें, त्वचेचें वैवर्ण्य नाहीसें होऊं लागणें ही लक्षणें व्याधी बरा होत असल्याची समजावींत.

उपद्रव
अस्यां चैवावस्थायामुपद्रवा: कुष्ठिनं स्पृशन्ति;
तद्यथा - प्रस्त्रवणमड्गभेद: पतनान्यड्गगावयवाना
तृष्णा ज्वरातीसारदाह्दौर्बल्या रोचकाविपाकाश्च ।
च. नि. ५/२९ पृ. ४६४

स्त्राव होणें, अंग फ़ुटणें, अवयव गळून पडणें, तृष्णा, ज्वर, अतिसार, दाह, दौर्बल्य,अरोचक, अविपाक असें उपद्रव कुष्ठामध्यें होतात.

उदर्क
नासाभंग, अवयव गळणें, विरुपता

साध्यासाध्यत्व
साध्यं त्वग्रक्तमांसस्थं वातश्लेष्माधिकं च यत् ।
मेदसि द्वन्द्वजं याप्यं वर्ज्य मज्जास्थिसंश्रितम् ॥
क्रिमितृड्‍दाहमन्दाग्निसंयुक्तं यत्त्रिदोषजम।
प्रभिन्नं प्रस्त्रुताड्गं च रक्तनेत्रं हतस्वरम् ॥
पञ्चकर्मगुणातीतं कुष्ठं हन्तीह मानवम् ।
मा. नि. दुष्ट ३१-३२ म. टीकेसह पा.३४०

साध्यादिभेदमाह  -

साध्यं त्वग्रक्तमांसस्थमित्यादि ।
वातश्लेष्माधिकं च यदिति एककुष्ठकिटिभादिवर्ज्यम् ।
मज्जास्थिसंश्रितंमिति अत्र मज्जास्थिप्रत्यासत्त्या शुक्र-
गतस्याप्यसाध्यत्वं बोद्धव्यम् । प्रभिन्नमिति विदीर्णम् ।
पंचकर्मगुणातीतमितिपूर्वरूपक्रिर्यया सह रसादिधातूनां
चतुर्णां क्रियाकलापा: पंचकर्माणि, तेषां गुणा वौर्याणि,
तान्यतीतो य: स तथा, अस्थिमज्जागत इत्यर्थ:, ताञ्च
क्रिया: पूर्वरूपे शोधनमुभयत: ; त्वकप्राप्ते शोधनालेपनादि,
रक्तत्राप्ते शोथनालेपनकषायपानशोणितावेसकादि एवं
मांसमेदसोरपि द्रष्टव्यमिति । अथवा पंचकर्माणि वमना-
दीनि, तेषां गुणा: फलानि, तान्यतीत: ॥३१॥३२॥-
मा. नि. कुष्ठ ३१-३२ म. टीकेसह पान ३४०.

तत्र यदसाध्यं तदसाध्यतां नातिवर्तते; साध्यं पुन: किंचित्
साध्यतामतिवर्तते कदाचिदपचारात् । साध्यानि हि षट्‍
काकणकवर्ज्यान्यचिकित्स्यमानान्यपचारतो वा दोषैरभि-
ष्यन्दमानान्यसाध्यतामुपयान्ति । साध्यानामप ह्युपेक्ष्य
माणानां त्वड्वांसशोणितसीकाकोथक्लेदसंस्वेदजा: क्रिमयो
ऽभिमूर्च्छन्ति;
च. नि. ५/१६, १७ पा. ४६४

एक दोषज कुष्ट, त्यांतही वातकफाधिक कुष्ट, त्याचप्रमाणें त्वक्, रक्त, मांस आश्रयांनीं असलेलें कुष्ठ साध्य असतें. द्वंद्वज व मेदोगत कुष्ठें याप्य असतात. सान्निपातिक, पित्तप्रधान, मज्जास्थिशुक्रसंश्रित कुष्ठे असाध्य असतात. त्वचा, मांस, रक्त, लसीका यांचा कोथ, क्लेद, कृमी, दाह, स्त्राव, रक्तनेत्रता अंगभंग, स्वरभेद या लक्षणांनीं युक्त कुष्ठ असाध्य होते. शोधन, लेपन, कषायपान व रक्तमोक्ष, किंवा वमनादि पंचकर्मे यांचा उपयोग करुनहि ज्या कुष्ठावर कांहींच परिणाम होत नाहीं तीं असाध्य समजावीं. साध्य कुष्ठें, उपेक्षेनें, मिथ्योपचारानें वा दोष प्रकोपानें असाध्य होऊं शकतात. असाध्य असाध्यतर होतात. त्रिदोषज असल्यामुळें काकणक कुष्ठ असाध्य आहे.

रिष्ट लक्षणें

कुष्ठं विशीर्यमाणाड्गं रक्तनेत्रं हस्तस्वरम् ।
मंदाग्निं जंतुभिर्जुष्टं हंति तृष्णातिसारिणम् ॥
वा. शा. ९/५८ पा. ४२७

अंग फुटून गळून पडणें, डोळे लाल होणें, आवाज बसणें, अग्नि मंद होणें, जंतूंनीं शरीरावयव खाणें, तृष्णा, अतिसार हीं कुष्ठाचीं रिष्ट लक्षणें आहेत.

चिकित्सा सूत्रें :-

सर्व त्रिदोषजं कुष्ठं दोषाणां तु बलाबलम् ।
यथास्वैर्लक्षणैर्बुद्ध्वा कुष्ठानां क्रियते क्रिया ॥३१॥
दोषस्य यस्य पश्येत् कुष्ठेषु विशेषलिड्गमुद्रिक्तम् ।
तस्यैव शमं कुर्यात् तत: परं चानुबन्धस्य ।
च. चि. ७/३१ ३२ पा. १०५२

सर्व कुष्ठें त्रिदोषोत्पन्न असल्यामुळें कुष्टांतील दोषांचें बलाबल पाहून कुष्टावरील चिकित्सा करावी. कुष्ठ लक्षणामध्यें लक्षण दृष्टया जो दोष अधिक बलवान आहे असें वाटेंल त्याचें प्रथम शमन करावें आणि अनुबंध रुपानें असलेल्या दोषांचें शमन क्रमानें त्याचे नंतर करावें.

वातोत्तरेषु सर्पिर्वमनं श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु ।
पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनं चाग्रे ॥
वमनविरेचनयोगा: कल्पोक्तां कुष्ठिनां सिराव्यधनम् ।
बहुदोष: संशोध्य: कुष्ठी बहुशोऽनुरक्षता प्राणान् ।
दोषे ह्यतिमात्रहृते वायुर्हन्यादबलमाशु ।
स्नेहस्य पानमिष्टं शुद्धे कोष्ठे प्रवाहिते रक्ते ।
वायुर्हि शुद्धकोष्ठं कुष्ठिनमबलं विशति शीघ्रम् ॥३२॥
च. चि. ७/३९-४२

यथाक्रमं चिकित्सामाह वातोत्तरेष्वित्यादि । अग्रे इति
सर्पिरादिषु योज्यं, तेन वातोत्तरादिषु सर्पिरादि प्रथमं
कर्तव्यं, तदनु वक्ष्यमाणा चिकित्सा कार्येत्यर्थ: ।
बहुश इति वहून् वारान्, स्तोकस्तोकनिर्हरणेन पुन: पुन: शोध्य:,
एकदा हि भूरिदोषहरणे बलक्षयो महात्यय: स्यात्
अत एवाह दोषे ह्यतिमात्रहृते इत्यादि । दोषे इति
एकव वनेनैव एकदोषस्याप्यतिमात्रहरणे वायुर्हन्यादिति ।
कोष्ठे शुद्धे रक्ते प्रवाहिते च स्नेहस्य पानं ज्ञेयम् ।
अशुद्ध कोष्ठस्य स्नेहपानं व्याधिवर्धनं भवति । उक्तं हि शेषदोषे
व्याधिरतिवर्धते इति । शोधनेन तु नि:शेषीकृते दोषे
सदोषदोषता नास्ति । ३९-४२
च. चि. ७ टीका पान १०५३.५४

वातप्रधान कुष्टावर घृतपान द्यावें. कफप्रधानासाठीं वमन द्यावें, पित्तप्रधान कुष्ठामध्यें प्रथम विरेचन देऊन नंतर रक्तमोक्ष करावा. दोष दूष्य यांचे बलाबलांचा विचार करुन वमन विरेचन प्रयोग करावेत. कुष्ठाचें स्वरुप अल्प असल्यास फासण्या टाकून रक्तमोक्ष करावा. कुष्ठ मोठें असल्यास सिराव्यध करावा. कुष्ठावर करावयाचे रक्तमोक्ष वा विरेचनादि उपचार थोडे थोडे असे बरेच वेळां करावे. दोषांचें पुष्कळ शोधन एकदम केलें असतां वातप्रकोप होऊन प्राणोपघात होण्याची शक्यता असते. वमनविरेचनांनीं कोष्ठशुद्धी झाल्यानंतर व रक्तमोक्ष झाल्यानंतर स्नेहपान देणें इष्ट आहे. कारण शुद्धकोष्ठ शरीरामध्यें वाताचा प्रकोप त्वरेनें होतो.

पक्षात्पक्षाच्छर्दनान्यभ्युपेया
न्मासान्मासाच्छोधनान्यप्यधस्तात् ।
शुद्धिर्मूर्ग्धि स्यात्रिरात्रात्रिरात्रात् ।
षष्ठे षष्ठे मास्यसृड्गमोक्षणं च ॥९६॥
वा. चि. १९-९६ पान ७१८.

कुष्ठांतील दोष, गंभीर व धातुगत झालेले असल्यानें त्यांच्या शोधनासाठीं करावयाचे उपचार दीर्घ काळपर्यंत सतत करावे लागतात. या शोधनोपचारांमध्यें दर १५ दिवसांनीं वमन द्यावें व महिन्या महिन्यांनीं विरेचन द्यावें. दर तीन दिवसांनी शिरोविरेचन द्यावें. दर सहा महिन्यांनीं रक्तमोक्ष करावा.

कल्प

क्डुकवट (तुवरक), आरग्वध (वाहवा), चक्रमर्द (टाकळा) सारिवा, मंजिष्ठा, निंब, खदिर, करंज, इंद्रवारुणि, कटुका, काडेचिराईत, पटोल, सप्तपर्णी, काकोदुंबर, विडंग, हरिद्रा, दारुहळद, भल्लातक, गंधक, मनशिला, हरताळ, करंजतैल, कण्हेरमूळ बावची, बचनाग. निर्गुडी. आरोग्यवर्धिनी, स्वायंभृग्गुळ, सर्वांगसुंदरीवटी, निंबगंधक, गंधकरसायन, हरताळमिश्रण, सूक्ष्मत्रिफळा, वज्रतैल, वज्रकमृत, महातिक्तकघृत (वंगसेन) सारिवाद्यासव, मंजिष्ठादिकाढा.

पथ्यापथ्य

दूध, तूप, गहूं, साठेसाळो, मूग, दुध्या भोपळा, दोडका, तांदुळजा एवढेच पदार्थ आहारांत घ्यावेत. तिखट, मीठ, तेल, दही, गूळ, गुरु अन्न, मिष्टान्न, तीक्ष्ण, उष्ण, विदाही असे पदार्थ वर्ज्य करावेत.

विहार

अतिश्रम, आतपसेवन, मैथुन वर्ज्य करावें. इतरांना आपला संसर्ग पोहोचणार नाहीं अशी काळजी घ्यावी. कपडे रोज उकळत्या पाण्यांत स्वच्छ करुन वापरावे.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP