स्कंध ११ वा - अध्याय २९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


स्कंध ११ वा - अध्याय २९ वा॥३३६॥
कृष्णासी उध्दव म्हणे आसक्तासी । वाटे कठिणचि योगमार्ग ॥१॥
यास्तव सुलभ उपाय कथावा । सकलां साधावा सहजपणें ॥२॥
शांतिप्रद मनोनिग्रह कठीण । श्रम होतां खिन्न होती योगी ॥३॥
त्वत्पादपंकजीं भक्त होती लीन । योगें अभिमान मायामग्ना ॥४॥
दासाचाही दास होती तूं अच्युता । वानरांचीही त्वां सेवा केली ॥५॥
वासुदेव म्हणे देवदेवा श्रेष्ठ । त्यागूनियां भक्त प्रिय न कोणी ॥६॥

॥३३७॥
आश्रितार्थदा त्या त्यागूनियां तुज । इच्छील वैभव कवण भक्त ॥१॥
विस्मृतिकारक वैभवें न सुख । सकल पुरुषार्थ त्वद्भक्तांसी ॥२॥
विरंचीवयेंही भोगूनि आनंद । मानिती न फेड उपकाराची ॥३॥
उत्तमोत्तम जे ऐसें ज्ञानी भक्त । गुरुरुपें बोध करिसी तयां ॥४॥
अंतरी तयांसी देऊनि जागृती । पीडा षड्रिपूंची निवारिसी ॥५॥
मक्तां अंतर्बाह्य करिसी तूं साह्य । उपकार काय फिटतील ते ॥६॥
यास्तव सर्वस्व अर्पण हा मार्ग । बोलला श्रीरंग तेंचि ऐका ॥७॥
वासुदेव म्हणे शुक निवेदिती । जगच्चालकोक्ति परिसा प्रेमें ॥८॥

॥३३८॥
उध्दवासी कृष्ण म्हणे सुमंगल । धर्म ते अमोल कथितों तुज ॥१॥
सश्रध्द होऊनि आचरी जो मर्त्य । दुर्जय मृत्यूस जिंकील तो ॥२॥
मदर्थचि कर्म करुनि, अर्पण । करावें मजलागून सर्वभावें ॥३॥
साधुदेशीं वास, सद्भक्ताचरण । आचरूनि धन्य व्हावें जनीं ॥४॥
पुण्यकाळीं महापूजा सामूहिक । एकाकी वा नृत्य गीतें व्हावी ॥५॥
अंतर्बाह्य विश्वी राहिलों व्यापूनि निजांतरीही मी नभासम ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वव्यापी नभ । असोनि अलिप्त तेंवी आत्मा ॥७॥

॥३३९॥
उध्दवा, यापरी सर्वत्र मद्वास । पाहूनि सकलांस सन्मानावें ॥१॥
विप्र, अंत्यज वा साव, चोर, गुणी । सदय, दुर्गुणी, सम भक्तां ॥२॥
सर्वत्र मद्भाव ऐसा सिध्द होतां । स्पर्धा, तिरस्कारां न उरे ठाव ॥३॥
स्व- परलज्जेतें त्यागूनि साष्टांग । नमावें, गो-खर चांडाळांसी ॥४॥
काया-वाचा-मनें धर्म हा पाळावा । यावद्‍ ब्रह्मभावा पावला न ॥५॥
वासुदेव म्हणे विनम्र जो होई । ब्रह्मभाव पाहीं सुलभ तया ॥६॥

॥३४०॥
सर्वत्र ईश्वरदर्शन या मार्गे । होतां स्वीकारावे यतिधर्म ॥१॥
काया-वाचा-मनें सर्वत्र मद्रूप । पाहणें, हा मार्ग सर्वश्रेष्ठ ॥२॥
कथिला हा मार्ग उध्दवा, निर्दोष । समर्पणयोग तोही श्रेष्ठ ॥३॥
मिथ्या विनाशी या शरीरसंयोगें । सत्य अविनाशी तें तत्त्व लाभे ॥४॥
तरीच कौशल्य विवेकवंतांचें । वासुदेव त्यांचे चरण धरी ॥५॥

॥३४१॥
देवदुर्लभ हा निवेदिला बोध । कळतां नि:शक मुक्ति जीवा ॥१॥
अनुसंधान हें ठेवितां श्रुतीही । ठेवी गुप्त, तेही स्थिति लाभे ॥२॥
भक्तांमाजी याचा करी जो प्रचार । सर्वस्व साचार अर्पितों त्या ॥३॥
पावन हा बोध पठेल जो नित्य । नि:संशय पाप नष्ट त्याचें ॥४॥
सश्रध्द एकाग्र श्रवणही याचें । कर्मबंधच्छेदें मुक्तिप्रद ॥५॥
वासुदेव म्हणे नित्य एक ध्यास । धरुनि, धर्मास वरितां यश ॥६॥

॥३४२॥
उध्दवा हा बोध धरिला कीं ध्यानीं । उरला नाहीं कीं शोक, मोह ॥१॥
नास्तिका, दांभिका, शठा, दुर्विनीता । सेवाहीना बोधा न द्यावें या ॥२॥
ऐशा दोषहीन प्रेमळ भक्तांसी । स्त्री -शूद्रादिकांही उपदेशावें ॥३॥
कळतां हें नसे ज्ञातव्य कांहींचि । सुधापानें जैशी न उरे इच्छा ॥४॥
सत्ता , व्यापार वा व्यवहारज्ञानें । लाभे, तें भक्तीनें सकळ प्राप्त ॥५॥
सर्वकर्मत्यागें सर्वसमर्पण । करी मजलागून , तयाचा मी ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तासी सहज । लाभतें सायुज्य प्रसादानें ॥७॥

॥३४३॥
महामुनि शुक बोलती यापरी । योगमार्ग हरि दावी भक्ता ॥१॥
ऐकूनि उध्दव होई सद्गदित । जोडीतसे हात, भरल्या नेत्रें ॥२॥
आंवरोनि वेग स्थिरचित्तें शिर । ठेवी चरणावर, वदे प्रेमें ॥३॥
देवा, त्वत्कृपेनें मोह नष्ट झाला । पीडी जो मनाला दीर्घकाळ ॥४॥
शीत, तम, भीति, अग्निसंगें नष्ट । केलासी प्रदीप्त ज्ञानदीप ॥५॥
दासांवरी दया जयाची त्या तव । सोडूनियां पाय, काय इच्छूं ॥६॥
वासुदेव म्हणे प्रभुकृपेवीण । आधार न अन्य भक्तांलागीं ॥७॥

॥३४४॥
दाशार्हकुलाचा अभिमानपाश । ज्ञानखडगें अद्य तुटूनि गेला ॥१॥
योगेश्वरा, तुज करितों प्रणाम । पावलों शरण नम्रभावें ॥२॥
त्वत्पादपंकजी वसो नित्य प्रेम । उपायकथन करीं ऐसा ॥३॥
कृष्ण म्हणे जाई बदरीवनांत । अलकनंदेंत स्नान करी ॥४॥
मत्पादोद्भव ती स्नान-आचमनें । संध्यावंदनानें शुध्द करी ॥५॥
वल्कलें लेऊनि कंदमुळें भक्षी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥६॥

॥३४५॥
होऊनियां द्वंद्वसहिष्णु, सात्त्विक । संयमी, शास्त्रीयज्ञानें धन्य ॥१॥
तेणें स्थैर्य, शांति लाभेल चित्तासी । होई मजमाजी स्थिरचित्त ॥२॥
कथिलें तयाचा करीं निदिध्यास । अर्पी वाणी-चित्त मजलागीं ॥३॥
भागवतधर्मी होऊनि निरत । मायागुणातीत स्वरुपी मिळे ॥४॥
ऐसा मम लाभ होईल तुजसी । वासुदेव इच्छी हरिकृपा ॥५॥

॥३४६॥
योगींद्र शुकाची वाणी सुधारस । प्राशूनि अतृप्त तयां मुक्ति ॥१॥
संसृतिसंहार करी त्या हरीची । आज्ञा होतां वंदी उद्धव त्या ॥२॥
प्रदक्षिणा प्रेमें घालूनि लोळण । चरणीं, घेऊन द्रवला चित्ती ॥३॥
ज्ञाताही उध्दव वियोगदु:खानें । प्रेमाश्रुपूरानें चरण क्षाळी ॥४॥
प्रेमळ तारक स्नेहसमागम । सोडावया मन न धजे त्याचें ॥५॥
परी आज्ञा वंद्य मानूनि, पादुका । शिरीं ठेऊनिया निघता झाला ॥६॥
वासुदेव म्हणे ह्रदयद्रावक । ऐसा हा वियोग ज्ञात्यासीही ॥७॥

॥३४७॥
ह्र्दयीं स्थापूनि योगेशाची मूर्ति । विशालाश्रमासी प्राप झाला ॥१॥
उक्त मार्गाभ्यास करुनि वैकुंठ । गांठी भक्तश्रेष्ठ अत्यानंदे ॥२॥
राजा, हे आनंदसागरभरित । कथी ज्ञानामृत देव भक्तां ॥३॥
श्रध्देनें जो याचें करील प्राशन । संसारबंधन तुटे त्याचें ॥४॥
संग्रही तयाचा होईल तारक । संसृतीचें दु:ख लवही नुरें ॥५॥
वेदसागराचे करुनि मंथन । अमृतासमान नवनीत हे ॥६॥
काढिलें त्या आद्या वंदितों मी भावें । वासुदेव घ्याने हरिसी म्हणे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP