स्कंध ११ वा - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१५६॥
सांख्य, योग, धर्म, स्वाध्याय तैं तप । त्याग, इष्टापूर्त, दानही तें ॥१॥
व्रते, यज्ञ, मंत्र तीर्थे तेंवी यम । नियमपालन गौण सर्व ॥२॥
नि:संगत्वदाता एक संतसंग । वश करी मज सकलांहूनि ॥३॥
वासुदेव म्हणे सत्संगापरतें । साधन न एथें कथितो कृष्ण ॥४॥

॥१५७॥
दैत्य, राक्षस ते पशु-पक्षी नाग । सिध्द तैं गुह्यक, यातुधान ॥१॥
गंधर्व, चारण, वैश्य, शुद्र स्त्रिया । अत्यज, उध्दवा, तेंवी बहु ॥२॥
राजस, तामस त्या त्या युगी किती । गेले मत्पदासी सत्संगानें ॥३॥
वृत्र, प्रल्हादादि, बलि, बाण, मय । विभीषण, सुग्रीव ऋक्ष, गज ॥४॥
गृध्र, वाणी, व्याध, कुब्जा, व्रजगोपी । य़ज्ञपत्न्या त्याही उध्दरल्या ॥५॥
वासुदेव म्हणे केवळ सत्संग । लाभतां क्षणार्ध, कायाकल्प ॥६॥

॥१५८॥
पढले न वेद गुरु न सेविले । नाहीं उपासिलें इंद्र-चंद्रां ॥१॥
व्रत-तपही न, केवळ सत्संग । लाभतां श्रीरंगपदीं गेले ॥२॥
गोपी, गाई, वृक्ष, मृगही तरले । भावाविण केलें काय त्यांनी ॥३॥
अन्यही जे मंदमति नाग, सिध्द । पावले सहज मजप्रति ॥४॥
सांख्य, ज्ञान, दान, व्रत, तप, यज्ञ । स्वाध्याय -प्रवचन संन्यासादि ॥५॥
साधनें बहुत थकूनियां जाती । केवळ यशस्वी भक्ति तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे निष्कपट भाव । जया त्यासी देव सहज भेटे ॥७॥

॥१५९॥
बलरामासवें आदरें मजसी । न्यावया मथुरेसी रथामाजी ॥१॥
बैसविलें तेव्हां किती गाढ प्रेमें । अनुरक्त होतें चित्त ज्यांचें ॥२॥
वियोगदु:खें त्या कासावीस गोपी । मजवीण त्यांसी न दिसे कोणी ॥३॥
वृंदावनी तयां मीचि प्रियतम । रात्री क्षणासम अनुपम त्या ॥४॥
कंठिल्या जयांनी मजवीण त्याचि । रात्री होती त्यासी युगरुपु ॥५॥
समाधिनिमग्न मुनि वा सरिता । उदरीं प्रवेशतां सागराच्या ॥६॥
नामरुपभेदां जाती विसरुनि । प्रेममग्न मनीं तैशा गोपी ॥७॥
वासुदेव म्हणे गोपीचें तें प्रेम । अद्यापि समरुन द्र्वला कृष्ण ॥८॥
१३-१५

॥१६०॥
ब्रह्मरुप माझें नव्हतें तयां ठावें अबलास्वभावें परमप्रिय ॥१॥
मानूनि रमण बहुविध्द संगे । परमपदातें प्राप्त झाल्या ॥२॥
यास्तव उध्दवा, विधि तैं निषेध । प्रवृत्त-निवृत्त श्रुत वा श्राव्य ॥३॥
सकल त्या श्रौति सारुनि परत्या । मजमात्र एका शरण येई ॥४॥
तन-मन-धनें, मग हो निर्भय । कथी वासुदेव अभयदान ॥५॥
१६-१७

॥१६१॥
कृष्णाप्रति तदा उध्दव बोलला । योगयोगेश्वरा, तव वाणीतें ॥१॥
ऐकूनि संशय फिटलाचि नाही । वारंवार होई भ्रम, मना ॥२॥
चातुर्वर्ण्यकर्म विहित कथिसी । त्याग निवेदिसी सकलळ तुंचि ॥३॥
आत्मा अकर्ता वा कर्ता हें न कळे । त्यागावें, करावें अथवा कर्म ॥४॥
भ्रम हा मनाचा पाडी संशयात । नि:संशय चित्त करी माझें ॥५॥
कृष्ण म्हणे सख्या, उध्दवा तो जीव । नद प्राणांसह शिरला देहीं ॥६॥
मात्ना, स्वर, वर्णरुपें व्यक्त होई । स्थूलरुप घेई ऐशा क्रमें ॥७॥
वासुदेव म्हणे षट्‍चक्रमेंसी । अंती वैखरी ती व्यक्त होई ॥८॥
१८-१९
उष्मारुपें अग्नि वसे नभामाजी । मंथनें ठिणगी पडे त्याची ॥१॥
आहुती लाभतां घेई ज्वालारुप । उपाधीनें नाद व्यक्त होई ॥२॥
ग्रहण, गमन, उत्सर्जनादिक । कर्मेद्रियां देख क्रिया ऐशा ॥३॥
शब्दादिग्रहण ज्ञानेद्रियक्रिया । संकल्पादिक त्या मन -बुध्दीच्या ॥४॥
वासुदेव म्हणे उत्क्रांती क्रमानें । जीवचि हा जाणें, स्थान भेदें ॥५॥

॥१६२॥
सुक्षेत्री ज्यापरी सुबीज विस्तारे । त्रिगुणीं वाढलें ब्रह्मांड तैं ॥१॥
गुणोपधिरुपें भासला अनेक । तंतूमाजी पट तेंवी विश्व ॥२॥
तैसें ब्रह्मरुपीं ओतप्रोत विश्व । अनादि हा वृक्ष संसृतीचा ॥३॥
कर्मस्वरुपा त्या इह-पर भोग । पुष्प, फल चांग मोक्षरुप ॥४॥
पुण्य-पापबीजें वासना त्या मुळया । त्रिगुण तयाला मुख्य नाळ ॥५॥
पंचभूतें स्कंध, विषय ते रस । शाखा एकादश मनासवें ॥६॥
जीव-शिवांचीं तीं नीडें वरी दोन । दोषत्रय जाण त्वचा त्याची ॥७॥
सुख-दु:खफळें, ब्रह्मांडीं भरला । वृक्ष हा वर्णिला वासुदेवें ॥८॥
२३-२४

॥१६४॥
ग्रामसंचारी ते जीव जणु गृध्रें । दु:खरुप फळीं भोगिताती ॥१॥
अरण्यवासी ते हंस महाज्ञाते । केवळ सुखातें उपभोगिती ॥२॥
गुरुपदेशें ज्यां एकचि अनेक । मायेनें, हें ज्ञात वेद्ज्ञ तो ॥३॥
एवं गुरुसेवा, अनन्य तैं भक्ति । तीक्ष्ण कुठार ती आत्मविद्या ॥४॥
साधनें या छेदी सूक्ष्मदेहगाभा । आत्मलाभ ऐसा होई धीरा ॥५॥
वासुदेव म्हणे स्वरुपाचा लाभ । होतां, विद्याशस्त्र तेंही त्याज्य ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP