॥१२७॥
भगवंत म्हणे उध्दवा कथिले । धर्म जे वहिले वारंवार ॥१॥
वर्णाश्रय कुलाचार ते स्वधर्म । पाळावे निष्काम मदधीनत्वें ॥२॥
विषयसेवन पुरुषार्थ हाचि । विपरीत बुध्दि धरितां ऐसी ॥३॥
तया लोलुपाची विपरीत दृष्टि । उद्योगफलही विपरीत ॥४॥
वासुदेव म्हणे होऊनि विशुध्द । अवलोकन नित्य करणें योग्य ॥५॥
॥१२८॥
स्वप्न वा कल्पित मनोरथ व्यर्थ । विफल नानात्मक हेतुत्वें ते ॥१॥
विषय-इंद्रियवैचित्र्यें तैसीच । बुध्दीही यास्तव अर्थशून्य ॥२॥
मोक्षार्थी भक्तानें कर्म तें निवृत्त । सेवावें, प्रवृत्त नाचरावें ॥३॥
मोक्ष व्हावा तरी वेदोक्तही कर्म । सकाम ते जाण त्याज्य व्हावें ॥४॥
वासुदेव म्हणे अधिकारभेद । ध्यानी घ्यावा नित्य सिध्दान्त हा ॥५॥
॥१२९॥
अहिंसा, सत्यादि यम आदरावे । नियमही घ्यावे ध्यानी कांही ॥१॥
आत्मज्ञानें शांत गुरु तो मद्रूप । मानूनि, तयास उपासावें ॥२॥
अमानी, अमत्सर तेंवी त्वराहीन । दक्ष जो निर्मम दृढस्नेही ॥३॥
व्यर्थ वाचाळ न जो तत्वजिज्ञासू । असूयारहितु गुरु भक्त ॥४॥
जाया-गृहापत्यदिकीं जो उदास । समभाव ज्यास तोचि शिष्य ॥५॥
वासुदेव म्हणे शिष्यत्व कठिण । तेंचि संपादन करणें आधीं ॥६॥ ८-९
॥१३०॥
काष्ठांत असूनि पावक तो भिन्न । तैसा विलक्षण शरीरीं आत्मा ॥१॥
स्वयंप्रकाश तो स्थूल-सूक्ष्मद्रष्टा । अखिल दृश्यजाता नियामक ॥२॥
काष्टांत राहूनि काष्ठगुण घेई । उत्पादूनि पाही स्वयेंचि त्यां ॥३॥
नानात्वादि गुण तैसेचि देहाचे । घेई ऐसें भासें आत्मा स्वयें ॥४॥
वासुदेव म्हणे स्वयंसिध्द आत्मा । एक, परी नाना भासतसे ॥५॥
१०-११
॥१३१॥
मायागुणें ऐसा होई देहाध्यास । तेणेंचि जीवास संसार हा ॥१॥
आच्छादनाभास ज्ञानेंचि हा नासे । संसार अध्यासें बृध्दि पावे ॥२॥
यास्तव देहस्थ आत्म्यातें जाणूनि । निश्चय करुनि परतत्त्वाचा ॥३॥
दृश्यसत्यबुध्दि क्रमें घालवावी । शक्ती हे लाभावी वासुदेवा ॥४॥
१०-१३
॥१३२॥
गुरु ते आधारअरणी जाणावी । आधेय जाणावी शिष्यबुध्दि ॥१॥
गुरुप्रवचनें संधान तयांचें । बोधरुप तेथें प्रकटे अग्नि ॥२॥
वैरारदी बुध्दि ते अति निर्मल । गुरुकृपालब्ध कार्यक्षम ॥३॥
निपुण गुरु तैं शिष्यही तत्पर । भेटतां हे कार्य सहज घडे ॥४॥
अविद्येसह हा संसार तैं दुग्ध । होऊनि विशुध्द प्रगटे आत्मा ॥५॥
दग्ध होतां काष्ठें अग्नि जेंवी शांत । आत्मरुपी स्थित तेंवी बुध्दि ॥६॥
वासुदेव म्हणे अविद्यानिवृत्ति । होतां आत्मरुपी विद्या लीन ॥७॥
१४-१५
॥१३३॥
सिध्दान्तासी ऐशा विरोधक मुख्य । मीमांसक ऐक म्हणती काय ॥१॥
सुख-दु:खभोक्ते जीव हे अनेक । प्रवाहस्वरुप नित्यत्व त्याण ॥२॥
लोक, काल, वेद नित्यचि जाणावे । स्वतंत्र गणावें जीवांलागी ॥३॥
पदार्थमात्र हे सत्यचि यलोकी । ज्ञानस्वरुपही एक नसे ॥४॥
तात्पर्य सत्य हे सृष्टी, नसे ब्रह्म । विविधचि ज्ञान बहुरुप ॥५॥
यास्तव प्रवृत्ति श्रेष्ठ , न निवृत्ति । जडरुपता ती त्याज्य असे ॥६॥
वासुदेव म्हणे प्रयत्न अवश्य । निवृत्ति न इष्ट पक्ष ऐसा ॥७॥
१६-१८
॥१३४॥
पूर्वपक्ष ऐसा उध्दवा, न सत्य । मानूनि वादार्थ पुढती पाहूं ॥१॥
मास, वर्ष ऐशा कालभेदें जन्म । येती भिन्न भिन्न जीवांप्रति ॥२॥
देह, काल, योग, हेतु भिन्नत्वेंसी । नानात्व देहासी, जीवासी न ॥३॥
स्वतंत्र जीव कां, कर्में क्लेषकारी । सर्वदा अचारी फलही भोगी ॥४॥
ज्ञाताही केवळ सुखंश न भोगी । सदा दु:ख भोगी मुढही, न ॥५॥
वासुदेव म्हणे जीव हा स्वत्रंत्य । अभिमान व्यर्थ होई ऐसा ॥६॥
१९-२०
॥१३५॥
सुख-दुख हेतू जाणे जरी कोणी । उपाय न जनीं दु:खनाशा ॥१॥
मृत्युसम दु:ख नसेचि या लोकीं । टाळूं न शकती कोणी मृत्यु ॥२॥
वधस्थानी नेतां सुख कैसें होई । बहु अर्पितांही राज्यभोग ॥३॥
स्माण मृत्यूचें जयासी सर्वदा । केंवी विषयांचा मोह तया ॥४॥
वासुदेव म्हणे यास्तव वैराग्य । यदा होई सिध्द तेंच सुख ॥५॥
२१-२६
॥१३६॥
स्वर्गसुख तेंही स्पर्धादिसंयुक्त । संकटे बहुत तयामार्गी ॥१॥
कृषिकर्मासम निष्फलत्व त्यासी । लाभतांही सिध्दि, पुढती ऐकें ॥२॥
तोषवूनि देवां लाभे स्वर्गसौख्य । अप्सरांसमेत क्रीडा करी ॥३॥
सुवेषें विमानी ऐके स्वर्गगीत । क्वणित् किणिन्नाद वाहनांचा ॥४॥
दिव्यांगनाभोग, दिव्य सुरापान । क्षणोक्षणीं क्षीण पुण्य परी ॥५॥
संचित धन ते भोगूनि संपतां । अध:पात त्याचा न कळे मूढा ॥६॥
वासुदेव म्हणे नसतांही इच्छ्दा । कालौघेंचि साचा अंध:पात ॥७॥
२७-२८
॥१३७॥
असन्मार्गे जातां दु:संग वरील । स्वाधीन होईल इंद्रियांच्या ॥१॥
स्त्रैण, दुराचारी, लोभी वा हिंसक । भजेल तामस प्रेत-भूतां ॥२॥
कर्मपराधीन जाई नरकासी । पाषाणही अंती होत असे ॥३॥
वासुदेव म्हणे अशास्त्रीय कर्मे । जीव तमोगुणें क्लेश भोगी ॥४॥
२९-३२
॥१३८॥
आदि, मध्य, अंती कर्म दु:खदचि । जन्मभरी तेंचि आचरुनि ॥१॥
पुन:अन्य देह घेवोनि जो येई । सुख तया केंवी प्राप्त व्हावें ॥२॥
चतुर्दश लोक तेंवी लोकपाळ । तयांतेंही काल ग्रासीतसे ॥३॥
परार्धद्वय तीं देवसंवत्सरें । आयुष्य ब्राह्मयातें, तोही नष्ट ॥४॥
कर्मकारक ती इंद्रियें जाणावीं । प्रेरक त्यां पाहीं गुणत्रय ॥५॥
इंद्रियद्वाराचि जीव भोगी सौख्य । वैषम्य तयांत यावत्काल ॥६॥
नानात्व तोंवरी पारतंत्र्य तेंचि । वासुदेव चिंती क्रम ऐसा ॥७॥
३३-३४
॥१३९॥
परतंत्राप्रति ईश्वराचे भय । क्रमप्राप्त, काय नवल यांत ॥१॥
जीव नानात्वादि मानूनियां, शोक । मोहाचे ते दास पुढती क्रमें ॥२॥
ऐसें शोक-मोहव्याप्त, मीचि कर्ता । मानूनि अहंता दु:खी होती ॥३॥
मजहूनि भिन्न नसतां कालादि । भेद मानिताती अज्ञानी ते ॥४॥
काल, आत्मा, वेद, लोक वा स्वभाव । धर्म ऐसें मज संबोधिती ॥५॥
वासुदेव म्हणे अज्ञानें नानात्व । कल्पितांचि भेद दिसती जीवा ॥६॥
३५-३७
॥१४०॥
कृष्णाप्रति म्हणे उध्दव हा देही । वसूनियां देहीं बध्द कां न ? ॥१॥
स्वतंत्र तो जरी तरी कैसा बध्द । आहार-विहार करी केंवी ॥२॥
बध्द-मुक्तचिन्हें कैसीं ओळखावीं । सकल कथावी वर्तणूक ॥३॥
आसन, भोजन, शयन, गमन । अच्युता, कथन करणें सर्व ॥४॥
नित्य, मुक्त, आत्मा नित्य बध्द ऐसा । भ्रम मन्मनींचा दूर करीं ॥५॥
वासुदेव म्हणे उध्दवाचा प्रश्न । उत्तर त्या कृष्ण देई ऐका ॥६॥