स्कंध ११ वा - अध्याय २० वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥२४५॥ ।१-५।
म्हणे उध्दवा कृष्णासी । प्रगट केले वेद तूंचि ॥१॥
विधिनिषेधस्वरुपें । गुणदोष कथिले तेथें ॥२॥
आतां बोलसी विरुध्द । वाटे मजलागीं आश्चर्य ॥३॥
वर्णाश्रम अनुलोमादि । विषम विषय स्थल-कालादि ॥४॥
स्वर्ग-नरकादि भेद । इष्टानिष्ट कथी वेद ॥५॥
कैसें विवेकावांचून । मोक्षदायी घडे कर्म ॥६॥
पाप-पुण्य तें अदृष्ट । देव-पितरांही न ज्ञात ॥७॥
गुण-दोष भेददृष्टी । नाशी, केंवी निर्मी तोचि ॥८॥
भेद नसे जीवकृत । वाटे भ्रमचि की भेद ॥९॥
देवा, भ्रम हा निरसावा । मोद चित्ती वासुदेवा ॥१०॥
॥२४६॥ ।६-१२।
कृष्ण म्हणे ज्ञान-कर्म-भक्तियोग । मार्ग हे मोक्षार्थ कथिले तीन ॥१॥
अन्य उपाय न विरक्तासी ज्ञान । फलासक्ता कर्म श्रेयस्कर ॥२॥
परी आसक्त न विरक्तही पूर्ण । हरिकथाप्रेम यदृच्छेनें ॥३॥
तया भक्तियोग होई सिध्दिप्रद । श्रध्दा सवैराग्य न, त्या कर्म ॥४॥
निष्काम स्वधर्मी रत यज्ञयागी । विहिताविहितासी न उल्लंघी ॥५॥
नरक स्वर्गही लाभती न तया । इहलोकी जया धर्म प्रिय ॥६॥
निष्पापा त्या शुध्दा शुध्दज्ञानलाभ । यदृच्छेनें लाभ भक्तीचा वा ॥७॥
वासुदेव म्हणे स्वर्ग-नरकस्थही । मोक्षार्थ इच्छिती मृत्युलोक ॥८॥
॥२४७॥ ।१३-१६।
नरक-स्वर्गही इच्छी न विवेकी । प्रमादप्रवृत्ति शक्य तेणें ॥१॥
जन्म-मरणचि टाळण्यार्थ यत्न । करी नित्य सुज्ञ मरणापूर्वी ॥२॥
मर्त्यदेह परी मोक्षाचें साधन । दक्षत्वें जाणून करणें यत्न ॥३॥
छेदिति वृक्षासी पाहूनियां क्रूर । त्यजी नीड, दूर जाई पक्षी ॥४॥
अहोरात्री तेंवी छेदिताती वय । जाणूनियां भय ज्ञात्यालागीं ॥५॥
ऐशा भयग्रस्तें त्यागावी आसक्ति । निर्वासन शांति संपादावी ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा जो भाग्याचा । निर्भय तो साचा दूरदृष्टी ॥७॥
॥२४८॥ ।१७-१९।
नरदेह श्रेष्ठ प्रभुकृपालब्ध । साधन संयुक्त मोक्षकारी ॥१॥
नौका हे सद्गुरु कर्णधार जिचा । वायु हरिकृपा प्रेरक तो ॥२॥
ऐसी संधि येतां न तरे भवाब्धि । तो आत्मघातकी नराधम ॥३॥
विटुनियां कर्मा वैराग्य पावला । आंवरी सकलां इंद्रियां जो ॥४॥
आत्मसाधकें त्या करुनि अभ्यास । चंचल मनास आंवरावें ॥५॥
आंवरितांही तें सदा धांव घेई । अर्पूनि त्या कांही गोंजारावें ॥६॥
वासुदेव म्हणे प्रियही अर्पूनि । स्वाधीन करुनि घ्यावे मन ॥७॥
॥२४९॥ ।२०-२१।
ठेवूनियां दृष्टि मनावरी नित्य । प्राण-इंद्रियांस करणें वश ॥१॥
सत्त्वसंपन्न ती करुनियां बुध्दि । आत्मवश अंती करणें मन ॥२॥
अनुरोधें मन जिंकणें हा योग । मोक्षोपकारक सर्वोत्तम ॥३॥
अवखळ अश्वा कलानेंचि स्वार । आणी मार्गावर तैसेंचि हें ॥४॥
वासुदेव म्हणे श्रेष्ठ योग ऐसा । साधील तयाचा कार्यभाग ॥५॥
॥२५०॥ ।२२-२४।
देह, भूतें तेंवी तन्मात्राहंकार । प्रकृतींत लय करणें क्रमें ॥१॥
अनुलोम प्रतिलोम हें चिंतन । करुनि प्रसन्न होवो मन ॥२॥
निर्विण्ण, विरक्त, गुरुआज्ञारत । आत्मचिंतनांत मग्न सदा ॥३॥
तेणें देहात्मता त्यागूनि, यमादि । तेंवि तत्वबुध्दि स्वीकारावी ॥४॥
अथवा पूजन-अर्चनावांचून । अन्यमार्गी मन नेऊं नये ॥५॥
वासुदेव म्हणे ज्ञान, कर्म, भक्ति । तारक जीवासी हेंचि त्रय ॥६॥
॥२५१॥ ।२५-२८।
प्रमादेंचि योगी करितां निंद्यकर्म । शुध्दि तया, ज्ञानमात्र एक ॥१॥
स्वस्वकर्मानिष्ठा गुण तो जाणावा । दोष हा कर्माचा स्वभावचि ॥२॥
परी निवृत्ति ते नसे सहजसाध्य । यास्तव असंग कथिलें कर्म ॥३॥
हरिकथाप्रेमें सर्व कर्मा विटे । आसक्ति न सुटे दोषज्ञाही ॥४॥
यास्तव निश्चयें श्रध्दा ठेवूनियां । निंदावे विषयां भोगितांही ॥५॥
वासुदेव म्हणे दु:खरुप भोग । निंदितां क्षीणत्व वासनांसी ॥६॥
॥२५२॥ ।२९-३१।
उक्त भक्तिमार्गे अखंड मजसी । चिंतितां कामासी ठाव नसे ॥१॥
ह्र्दयीं जयाच्या नित्य वास माझा । कामना तयाच्या सकल नष्ट ॥२॥
सकलात्मा जो मी तयाचें दर्शन । घडता अज्ञानग्रंथि फिटे ॥३॥
सकल संशय फिटती तयाचे । पूर्वसंचिताचे तुटती बंध ॥४॥
यास्तवचि भक्ति माझी जया नित्य । ज्ञान वा वैराग्य नलगे तया ॥५॥
वासुदेव म्हणे ईश्वरप्रेमानें । विषयबंधनें तुटती क्रमें ॥६॥
॥२५३॥ ।३२-३७।
कर्म, तप, ज्ञान, वैराग्य वा योग । ध्यानादिक मार्ग सकल अन्य ॥१॥
आचरितां, लाभे सुखें तें भक्तीनें । इच्छितां भक्तातें वैकुंठही ॥२॥
अनन्य भक्तांसी मोक्षहि नावडे । निरपेक्षता हें सौख्य त्यांचें ॥३॥
यास्तव अपेक्षा, आशाही न ज्यासी । निश्चयें तयासी भक्तिलाभ ॥४॥
अनन्य शरण सम, जे ब्रह्मज्ञ । बाधती तयां न गुण -दोष ॥५॥
ऐसा हा मदुक्त आचरिती मार्ग । लाभे त्यां वैकुंठ तेंचि ब्रह्म ॥६॥
वासुदेव म्हणे निर्भय तें स्थान । परमकल्याण ज्ञानरुप ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : December 17, 2019
TOP