स्कंध ११ वा - अध्याय २७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


N/A॥३१४॥ ।१-५।
श्रीकृष्णासी म्हणे उध्दव विनयें । सविधि कथावें आराधन ॥१॥
नारद, व्यासादि कथिती तव पूजा । सुलभ मोक्षाचा मार्ग असे ॥२॥
ब्रह्मा स्वपुत्रांसी, शिव पार्वतीसी । कथी, ते कथिलेसी स्वमुखें पूर्वी ॥३॥
पूजाविधान तें ब्राह्मणादि वर्णा । मोक्षद सामान्या स्त्री शूद्रांही ॥४॥
कर्मबंधच्छेदी साधन तें कथीं । निरंतर भक्ति मजसी तव ॥५॥
वासुदेव म्हणे जगत्कल्याणार्थ । प्रश्न ज्ञाते भक्त करिती ऐसे ॥६॥

॥३१५॥ ।६-१२।
देव म्हणे पूजाविधान अनंत । संक्षेपें यथार्थ कथितों सार ॥१॥
वैदिक तांत्रिक उभयमिश्रित । रुचेल तो मार्ग आचरावा ॥२॥
मुंज होतां द्विजें मजसी पूजावें कैसें ते ऐकावें कथितों आतां ॥३॥
मूर्ति, यज्ञकुंड, अग्नि, सूर्य जल । ह्र्दय विम, विप्र ऐशास्थानी ॥४॥
प्राप्त द्रव्यें मज गुरुप्रति भावें । उध्दवा पूजावें त्यजूनि शाठय ॥५॥
स्नान-संध्या ब्रह्मयज्ञादि करुनि । पापविनशिनी पूजा व्हावी ॥६॥
शैल, काष्ठ , धातू, मृत्तिका वा चित्र । वळु, मनोमय रत्न किंवा ॥७॥
ऐसी अष्टविध मूर्ति पूजेस्तव । म्हणे वासुदेव प्रशस्त ती ॥८॥

॥३१६॥ ।१३-१९।
तारक प्रतिमा चलाचल दोन । उद्वासावाहन अचलीं नसो ॥१॥
चलीं तें ऐच्छीक, स्थंडिलीं अवश्य। मार्जनादि योग्य पुढती स्नान ॥२॥
यथालाभ गंध- पुष्पसमर्पण । तैसेंचि पूजन मानसिक ॥३॥
अलंकारादिकी भूषवा मूर्तीस । आहुति अग्नीत रुचतें मज ॥४॥
अर्ध्यचि सूर्यासी, तर्पण उदकीं । अर्पितां सप्रीति जलही रुचे ॥५॥
प्राधान्य भक्तीसी, द्रव्यें यथाशक्ति । दर्भासनीं स्थिति व्हावी प्रेमें ॥६॥
प्रागुदक किंवा मूर्तीच्या सन्मुख । करुनियां मुख व्हावी पूजा ॥७॥
वासुदेव म्हणे पूजन भक्तीनें । करिता तोष जाणें नारायणा ॥८॥

॥३१७॥ ।२०-२४।
षडंग न्यासांनी व्हावी सुसंस्कृत । मूलमंत्रें शुध्द करणें मूर्ति ॥१॥
गंध--पुष्पार्चनें सिध्द व्हावीं पात्रें । प्रोक्षण करावें उदकें सर्व ॥२॥
ह्रदय्म शिर, शिखा, मंत्रें पात्रशुध्दि । सिंचावें गायत्रीमंत्रें सर्व ॥३॥
पाद्य-अर्ध्य-आचमन पात्रीं सिध्द । द्र्व्यें ती शास्त्रोक्त असो द्यावीं ॥४॥
वायु अग्निपूत देही चित्कला ती । नादातीत चित्तीं ध्यावी प्रेमें ॥५॥
तन्मय होऊनि स्थापावी मूर्तीत । पूजनें तियेस तोषवावें ॥६॥
वासुदेव म्हणे परमात्मचिंतन । जाणावें पूजन तेंचि सत्य ॥७॥

॥३१८॥ ।२५-२७।
धर्म, ज्ञान, तेंवी ऐश्वर्य, वैराग्य । चतुष्क हें पाद प्रभुपीठचें ॥१॥
अधर्म, अज्ञान, अनैश्वर्यादि ते । मंचकाचे गाते भक्तिसूत्रें ॥२॥
विणूनि, आसन करुनियां सिध्द । अतिथीतें अर्ध्य-पाद्य द्यावें ॥३॥
ऐशा त्या आसनी अष्टदल पद्म । काढूनि पूजन सविधि व्हावें ॥४॥
खड्‍ग, चाप, शंख, चक्र , गदा, तीर । मुसळ, नांगर पूजावे ते ॥५॥
कौस्तुभ, वनमाला, श्रीवत्स, भूषणें । पूजावी सन्मनें यथाक्रमें ॥६॥
वासुदेव म्हणे सायुध, सशक्ति । पूजावा एकान्ती जगन्नाथ ॥७॥

॥३१९॥ ।२८-३३।
गरुड, सुनंद, नंद तैं प्रचंड । महाबल चंड, कुमुद, बल ॥१॥
कुमुदेक्षण तैं दुर्गा, विनायक । विश्वक्सेन, व्यास, सुरगुरु ॥२॥
स्थापूनि स्वस्थानी सन्मुख पूजावे । स्नानही घालावें गंगोदकें ॥३॥
पुरुषसूक्तादि पठावे ते मंत्र । अलंकार वस्त्र समर्पावें ॥४॥
यज्ञोपवीतही गंध, मुद्रा, माळा । अर्पूनि मजला तोषवावें ॥५॥
वासुदेव म्हणे पूजा ही शास्त्रोक्त । व्हावी धूपदीप समर्पूनि ॥६॥

॥३२०॥ ।३४-३८।
गुड, क्षीर, घृत, करंज्या, मोदक । पदार्थ विविध नैवेद्यासी ॥१॥
अभ्यंग, आदर्श, अभिषेकादिक । तेंवी नृत्य-गीत उपचार ॥२॥
पर्वकालींतरी अर्पावे समस्त । अत्यादरें नित्य मजलागीं ॥३॥
अग्निसेवा व्हावी सिध्दअग्नीमाजी । ध्यान अग्निरुपीं व्हावें मम ॥४॥
वासुदेव म्हणे पूजा विधियुक्त । गुरुमुखें प्राप्त करुनि घ्यावी ॥५॥

॥३२१॥ ।३९-४७।
श्रीवत्स, किरीट, कौस्तुभ, तेजस्वी । सालंकृत मूर्ति ध्यावी कुंडीं ॥१॥
पूजूनियां मग द्याव्या आज्याहूती । स्विष्टकृतविधि करणें अंतीं ॥२॥
पूजूनि अग्नीतें, बलि पार्षदासी । व्हावा नैवेद्यही विष्वक्सेना ॥३॥
नृत्य- गायन तैं कथा गोड गाव्या । विधि अवलोकावा पूर्ण ग्रंथीं ॥४॥
अंतीं चरणांबुज घेऊनियां करीं । भवपाश निवारीं करुणासिंधो ॥५॥
प्रार्थूनियां ऐसें निर्माल्य मस्तकीं । ठेवूनि मूर्तीसी विसर्जावें ॥६॥
चिज्जोतींत लीन करावी विकल्पें । वासुदेव हर्षे पूजनें या ॥७॥

॥३२२॥
श्रध्देसम, मूर्ति-अग्नीसी पूजावें । चराचर व्हावें स्थान माझें ॥१॥
विधियुक्त ऐशा पूजनें समस्त । पूर्ण मनोरथ इह-पर ॥२॥
सुदृढ मंदिरीं स्थापावें मजसी । उद्यानोत्सवांची करुनि सोय ॥३॥
यात्रा, महोत्सव चालावे अखंड । यास्तव उदंड दानें द्यावीं ॥४॥
नगरें, ग्रामें क्षेत्रें, अर्पी पूजेस्तव । तयासी ऐश्वर्य लाभे माझें ॥५॥
वासुदेव म्हणे सत्कर्मे शाश्वत । घडतां अखंड शांति लाभे ॥६॥

॥३२३॥
मूर्तिस्थापनेनें सार्वभौमराज्य । भुवनत्रय राज्य मंदिरानें ॥१॥
पूजादि व्यवस्था करितां ब्रह्मलोक । आचरितां त्रय मद्रूपता ॥२॥
निष्काम यापरी सेवी जो मजसी । मक्तियोगें प्राप्ति तया मम ॥३॥
स्वपरार्पित जो देव -विप्र -वित्त । हरी, कीट नित्य रौरवीं तो ॥४॥
कर्ता , साह्यकर्ता तेंवी अनुमोदक । समान तयांस श्रेयलाभ ॥५॥
जैसा ज्याचा भाग तैसें तया फल । कथी वासुदेव देवउक्ति ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP