स्कंध ११ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥७८॥
उध्दवासी कृष्ण बोले महाभागा । हेतु मन्मनींचा वदसी तोचि ॥१॥
लोकपाल तेंवी शंकर, विरंची । जावें निजधामासी इच्छिती हें ॥२॥
ब्रह्मयाची ती आर्त प्रार्थना ऐकूनि । एकाचि अंशे मी प्रगट झालों ॥३॥
अवतारकार्य सर्व पूर्ण केलें । जें जें अपेक्षिलें विवुध जनी ॥४॥
वासुदेव म्हणे वैकुंठविहारी । करी भक्तांवरी पूर्ण कृपा ॥५॥

॥७९॥
विप्रशापें कुल जाहलें हें दग्ध । यादवांचा नाश अटळ आतां ॥१॥
सप्तम दिनीं हे बुडेल द्वारका । जातां मी वैकुंठा अमंगल ॥२॥
कलिप्रादुर्भावें, वार्ता न सौख्याची । यास्तव पुढती न वसें येथें ॥३॥
कलीमाजी लोकां रुचि अधर्माची । स्वजनबंधूंची आस्था सोडीं ॥४॥
होऊनि मच्चित्त तेंवी समदृष्टि । मम चिंतनेंचि विचरें मही ॥५॥
इंद्रियग्राह्य वा मनोग्राह्य सर्व । नश्वर हें विश्व ध्यानी धरीं ॥६॥
वासुदेव म्हणे येतां समदृष्टि । बाधा वैषम्याची भक्तांसी न ॥७॥

॥८०॥
ईशनिष्ठाहीना गुणकर्मभेद । भ्रमेचि नानात्व बाधा त्यासी ॥१॥
यास्तव सेंद्रैय मन आंवरोनि । आत्म्यामाजी मानी सकल विश्व ॥२॥
तेंवी मजमाजी अवलोकी आत्मा । यामार्गे एकत्वा पावसील ॥३॥
सकलांचा आत्मा होसी ऐशापरी । विघ्नें तुज करी मग कोण ॥४॥
वासुदेव म्हणे ज्ञान तें विज्ञान । होतां मग विघ्न स्पर्शे केंवी ॥५॥

॥८१॥
गुणदोषातीता न विधिनिषेध । बालकासी भेद न शिवें जेंवीं ॥१॥
सध्दर्माचरणें लाभतां ते स्थिति । दुष्कर्मप्रवृत्ति उठेचिना ॥२॥
प्रवृत्ति-निवृत्ति नसतांही सत्कर्मी । रमे अन्य मनीं हेतु न त्या ॥३॥
जगन्मित्र शांत नि:संदेह सम । मीचि ज्या संपूर्ण, भव न तया ॥४॥
निवेदिती शुक ऐकूनि हा बोध । उध्द्व प्रणिपात हरिसी करी ॥५॥
वासुदेव म्हणे तत्त्वजिज्ञासेनें । पुन: उध्दवानें प्रश्न केला ॥६॥

॥८२॥
योगेशा योगज्ञा योगरुपा मोक्ष । लाभार्थ, संन्यास कथिसी मज ॥१॥
व्यापका, परी ज्या विषयवासना । दुष्कर तयांना, ऐसा त्याग ॥२॥
अभक्तांप्रति तो अत्यंत दुष्कर । यास्तव सुकर मार्ग कथीं ॥३॥
मी माझें हे बुध्दि माया मोहिता ज्या । मूढातें ही ऐशा उध्दारावें ॥४॥
यास्तव निवेदी सुनिश्चित मार्गा । वासुदेवचित्ता रुचला प्रश्न ॥५॥

॥८३॥
सत्याची तूं मूर्ति हे स्वयंप्रकाशा । गुरु मज ऐसा अन्य कोण ॥१॥
विरंचीआदि ते त्वन्मायाविभ्रांत । देहधारी जग म्हणती सत्य ॥२॥
नित्य शुध्दबुध्द मुक्त तूं अनंत । तापत्रयतप्त निराश मी ॥३॥
नरसख्या, नारायणा, जगन्मित्रा । हे जगदुद्धारा, शरण आलों ॥४॥
वासुदेव म्हणे उध्दव यापरी । उपदेश करीं म्हणे कृष्णा ॥५॥

॥८४॥
बोलले उध्दवा, तदा भगवान । ग्राह्य-त्याज्यज्ञानकुशल जन ॥१॥
बहुधा ते गुरु आपणा आपण । साधिती कल्याण प्रमाणांनीं ॥२॥
सांख्ययोगवेत्ते मानवचि मज । जाणती सामर्थ्य संपन्नासी ॥३॥
सर्व योनीमाजी यास्तव मानव । मजलागीं प्रिय देव कथी ॥४॥
वासुदेव म्हणे नरदेहस्तुति । जाणूनि हिताची, वरणें मार्ग ॥५॥

॥८५॥
एकनिष्ठ ज्ञाते मज अगोचरा । गुण हेतुद्वारा शोधिताती ॥१॥
इतिहास तोचि ऐकें अवधूता । ’अवधूत गीता ’ नामें ख्यात ॥२॥
निर्भय, तरूण, ज्ञाता, दिगंबर । पाही मनुजवर यदु तया ॥३॥
वासुदेव म्हणे यदुराजा त्यासी । प्रश्न करी तेचि परिसा आतां ॥४॥

॥८६॥
महाविशारदा विप्रा, बालासम । असूनि विद्वान संचरसी ॥१॥
जीवन्मुक्ताची हे अवस्था तुजसी । निवेदावी कैसी लाभली तें ॥२॥
धर्मार्थ काम वा आत्मज्ञान इच्छा । कीर्ति वा धनाचा हेतु नरा ॥३॥
दीर्घायुष्य किंवा इच्छूनि, मानव । करिताती कार्य सामान्यत्वें ॥४॥
समर्थ तूं दक्ष, ज्ञाता, दैववान । अमृतभाषण असूनि केंवी ॥५॥
अकर्ता, निरिच्छ, जडोन्मत्त, पिसा । गंगार्‍हदीं जैसा गज शांत ॥६॥
काम-लोभदग्ध जनांमाजी केंवी । आनंद सागरीं पोंहतोसी ॥७॥
वासुदेव म्हणे आत्मानंदमग्ना । वासनाविहीना प्रश्न ऐसा ॥८॥

॥८७॥
उध्दवासी कृष्ण कथी कल्याणेच्छु । सत्कारुनि यदु करितां प्रश्न ॥१॥
अवधूत म्हणे स्वीकारुनि बोध । वरिले अनेक गुरु स्वयें ॥२॥
तेणें मी नि:संग करितों संचार । ऐकें राया, सर्व गुरु माझे ॥३॥
भूमि, वायु, नभ, आप, अग्नि, शशि । रवि, कपोतही, अजगर, सिंधु ॥४॥
पतंग, मधुकृत्‍ गज, मधुहर्ता । हरिण तैं मासा, पिंगला ते ॥५॥
कुरर तैं बाल, कन्या, इषुकार । सर्प, ऊर्णनाभ, भिंगुरटी ॥६॥
चतुर्विशति हे गुरु, बोध काय । तोही यदुराया परिसो आतां ॥७॥
वासुदेव म्हणे कथी अवधूत । तेंचि ज्ञानामृत सेवा प्रेमें ॥८॥

॥८८॥
दैववश भूतपीडितही ज्ञाता । अचल सर्वदा पृथ्वीसम ॥१॥
वृक्षादिकांसम परार्थजीवित । पृथ्वीचे हे श्रेष्ठ शिकलों गुण ॥२॥
प्राणवायु एक ब्राह्मवायु दुजा । गुण उभयांचा स्वीकारिला ॥३॥
देह रक्षी तोचि स्वीकारी आहार । इंद्रियांचे थेर न चालवी ॥४॥
इंद्रिय-मनांसी रुचे तें सेवितां । येई विक्षेपता ज्ञाननाशें ॥५॥
प्राणापासूनि ही लाभली मर्यादा । गुणनिर्लेपता शिकवी वायु ॥६॥
वासुदेव म्हणे असूनि सर्वत्र । कदाही न लिप्त विषयी ज्ञाता ॥७॥

॥८९॥
चराचरापति व्यापूनिही नभ । असंग, विभाग न पावेचि ॥१॥
नभांत असूनि मेध जेंवी भिन्न । देहांत वसून आत्मा तेंवी ॥२॥
आकाशापासूनि लाभलें हे ज्ञान । निर्मळ, पावन मधुर जळ ॥३॥
स्वभावेंचि, तेंवी ज्ञात्यानें असावें । उदकाचे घ्यावे ऐसे गुण ॥४॥
वासुदेव म्हणे गुरु तो सर्वत्र । विरळा साचार शिष्य जनीं ॥५॥

॥९०॥
तेजस्वी, प्रतापी, तेंवी दुराराध्य । उदरचि पात्र भोजनाचें ॥१॥
सर्वभक्षकही असूनि व्रतस्थ । अग्नीसम ज्यास न शिवे मळ ॥२॥
अव्यक्त तो कदा व्यक्तरुपें राही । कल्याणेच्छु पाही सेविती त्या ॥३॥
भक्त अर्पिती ते सेवूनि तयांची । सर्व पापें नाशी पूर्वोत्तर ॥४॥
असूनि व्यापक भासे इंधनसा । मायाश्रित तैसा सद्सद्रुप ॥५॥
वासुदेव म्हणे मायाधीश हरि । अकर्ताचि करी सकल, भासे ॥६॥

॥९१॥
चंद्रकला क्षयबृध्दि ते पावती । वार्ताही चंद्रासी नसे त्याची ॥१॥
जन्म-मरणादि भाव तैं देहाचे । अविकारी असे नित्य आत्मा ॥२॥
क्षणोक्षनीं बिंदू प्रवाहाचे भिन्न । नित्यचि तो भ्रम परी ऐसा ॥३॥
अग्निज्वालेसम प्रवाही कालाच्या । विश्वासी नित्यता भासतसे ॥४॥
वासुदेव म्हणे स्थल-कालदोष । आत्म्यावरी, भास अग्नि दावी ॥५॥

॥९२॥
आकर्षूनि जल अर्पी मेघरुपें । सूर्य, तेंवी ज्ञाते देती ज्ञान ॥१॥
सेविती विषय परी न ते लिप्त । भानू हेंचि तत्व कथन करी ॥२॥
जल उपाधीनें चांचल्य तैं भेद । भासती अज्ञान सूर्यावरी ॥३॥
परी सूर्यासी न दोष ते स्पर्शती । असंग आत्म्याची स्थिति तेंवी ॥४॥
अग्नि, चंद्र, सूर्य, तेज तें त्रिविध । स्वीकारिला बोध बहुत त्यांचा ॥५॥
अतिस्नेहें दु:ख कपोतासमान । वासुदेव ध्यान द्यावे म्हणे ॥६॥

॥९३॥
काननांत एक वृक्षावरी नीड । करुनि कपोत राहियेला ॥१॥
कपोतीसवें तो भोगी गृहसौक्य । गृहस्वधर्मात रमली दोघें ॥२॥
दृष्टि-काया मनें होती एकरुप । सर्वही एकत्र करिती क्रिया ॥३॥
आहार-विहार आसन -शयन । सप्रेम भोजन उभयांचेही ॥४॥
प्रिया जें जें इच्छी कष्टेंही तें अर्पी । सकल पुरवी लाड तिचे ॥५॥
प्रथम गर्भिणि प्रसवली अंडी । वासुदेव जगीं पाही लीला ॥६॥

॥९४॥
अतर्क्य श्रीहरिशक्तीनेम पुढती । अंडयांतूनि येती पिलें मृदु ॥१॥
कोमल ते पंख, कोवळें कूजन । ऐकूनि, लालन करिती त्यांचे ॥२॥
लाडक्या बाळांच्या पाहूनियां लीला । हर्ष कपोताला होई बहु ॥३॥
मायाविमोहित मंदबुध्दि दोघें । प्रेमबध्द ऐसें क्रमिती दिन ॥४॥
वासुदेव म्हणे पोषण बाळांचें । मायेनेंचि ऐसें घडे जनीं ॥५॥

॥९५॥
कपोतीसवें तो एकदां कपोत । भक्ष्यशोधनार्थ वनी गेला ॥१॥
ऐशा वेळीं एका पारध्यानें जाळें । हर्षे पसरिलें वनामाजी ॥२॥
सांपडलीं तया जाळयामाजी पिलें । पक्ष्यांनी आणिलें अन्न तोंचि ॥३॥
जाळयामाजी पिलें पाहूनि पक्षिणी । दु:खें आक्रंदोनि टाहो फोडी ॥४॥
वात्सल्यें जाळयांत अंती उडी टाकी । काय कपोताची स्थिति तदा ॥५॥
वासुदेव म्हणे भार्या अपत्यांची । पाहूनि दुस्थिती भरलें उर ॥६॥

॥९६॥
मंदभाग्य पक्षी काढी दु:खोद्गार । दुग्ध आशा सर्व अतृप्त मी ॥१॥
त्रिवर्गसाधक भंगला आश्रय । कैसी हे त्यजून गेली साध्वी ॥२॥
शून्यसदनीं या कंठूं केंवी काळ । विधुरजीवित दु:खरुप ॥३॥
जाळयांत तयांची धडपड पाही । परी नष्ट होई बुध्दि त्याची ॥४॥
अंतीं अविवेकें टाकी उडी तेथ । हाय हाय भ्रांत जीव कैसा ॥५॥
वासुदेव म्हणे मायापाश ऐसा । अविवेकें कैसा भ्रमवी पहा ॥६॥

॥९७॥
पूर्ण मनोरथ होऊनि पारधी । आनंदें गृहासी जाई तदा ॥१॥
द्वंद्वयुक्त असंतुष्ट मोहमग्न । कुटुंबपोषण करी जीव ॥२॥
सर्वासवें ऐसा परी पावे नाश । संसारचि सौक्य मानूनियां ॥३॥
मानवदेह हें मोक्षमार्गद्वार । परी जो रमेल विषयीं तेथें ॥४॥
कपोतासम तो पावेल विनाश । म्हणती आरुढच्युत तया ॥५॥
वासुदेव म्हणे आसक्ति यापरी । विनाशचि करी पक्ष्याचाही ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP