स्कंध ११ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥६५॥
निवेदिती शुक नारदांमागूनि । ब्रह्मा तया स्थानीं प्राप्त होई ॥१॥
सनकादि तेंवी इंद्र, मनुआदि । तैसा शंकरही भूतांसवें ॥२॥
भूत-भविष्याचा स्वामी तोही येई । मरुद्‍गण तेही वसू आदित्य ॥३॥
अश्विनीकुमार, ऋभु, अंगिरस । रुद्र विश्वेदेव, साध्यादिक ॥४॥
गंधर्व, अप्सरा, सिध्द, चारणादि । नाग आणि ऋषी प्राप्त झाले ॥५॥
पापविनाशक चरित्र ज्या देहें । आचरितो पाहें भगवंत ॥६॥
त्र्यैलोक्यपावन देह तो पहावा । उत्कंठा हे तयां सकलांसी ॥७॥
वासुदेव म्हणे द्वारावतीमाजी । देव, ऋषी येती सकल ऐसे ॥८॥

॥६६॥
ऋध्दि-सिध्दि जेथ भरिताती पाणी । अलौकिक स्थानीं प्रभूच्या तया ॥१॥
अपूर्वदर्शन श्रीकृष्णासी तदा । प्रेमें अवलोकितां अतृप्तीचि ॥२॥
नंदनवनींच्या पुष्पमालादिकीं । झांकूनि टाकिती देव, देवा ॥३॥
मनोहर शब्द-अर्थेही तयासी । आनंदें स्तविती सकल देव ॥४॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णस्तवन । घ्या आतां ऐकून देवकृत ॥५॥

॥६७॥
कर्ममय दृढपाशमुक्तेच्छु जे । ध्याती एकचित्तें श्रध्दायुक्त ॥१॥
चरणारविंद तव जगन्नाथा । वंदियेलें आतां बुध्यादीनीं ॥२॥
निजस्वरुपींचि त्रिगुण मायेनें । अतर्क्य विश्वातें निर्मिसी या ॥३॥
रक्षण, संहार करुनिही त्याचा । निजानंदे साचा निर्लेप तूं ॥४॥
विश्ववंद्या, तव यशगानें भक्ति । पावूनियां पुष्टि प्रतिक्षणी ॥५॥
चित्त करी शुध्द जेंवी दुजर्नाचे । दुराशायुक्त जें विषयलिप्त ॥६॥
तैसी विद्या, श्रुत, दान, अध्ययन, । तप अथवा कर्म न करी शुध्दि ॥७॥
वासुदेव म्हणे भक्ति एकमेव । साधन अपूर्व बध्दजीवा ॥८॥

॥६८॥
कल्याणार्थ मुनि प्रेमार्द्र ह्र्दयें । धरिती पाउलें ह्र्दयीं तुझीं ॥१॥
लेखूनियां तुच्छ स्वर्गही मोक्षार्थ । चतुर्व्यूहें भक्त चिंतिती ज्या ॥२॥
अर्चनें त्रिकाल पादपद्में तींच । सत्वरी होवोत पापहारी ॥३॥
हविर्दव्यें करी घेऊनि सविधि । याज्ञिक चिंतिती हेचि पाय ॥४॥
आत्ममाया जिज्ञासू जे ज्ञानमार्गी । तैसेचि भक्त ही पूजिती ज्यां ॥५॥
पाउलें तीं दुष्ट वासनाहंकार । करोत साचार आमुचा नष्ट ॥६॥
वासुदेव म्हणे विश्वमगलांची । देवकृत स्तुति अपूर्व हे ॥७॥

॥६९॥
तुलसीमाला ती म्लानही कंठीची । स्पर्धा कमलेसी पाहूनियां ॥१॥
भक्तार्पित मालेवरी तव प्रेम । अपूर्व पाहुन लाजते ती ॥२॥
वनमालायुक्त ऐसीं पादपद्में । होवोत पापातें धूमकेतु ॥३॥
त्रिविक्रमाचे ते सत्यलोकव्यापी । पाय त्वद्यशाची विजयध्वजा ॥४॥
त्वत्पादपंकजोद्‍भूत हे पावनी । पताकाचि जनीं गंगा वाटे ॥५॥
स्वर्गप्रद भक्तां, खलां नरकप्रद । आह्मांसी रक्षोत पाउलें तीं ॥६॥
वसणनिबध्द जेंवी बलिवर्द । तेंवी सर विश्व तवाधीन ॥७॥
परस्पर द्वंद्वयुक्त ते ब्रह्मयादि । आंवरिता तूंचि हरि तयां ॥८॥
प्रकृतिपरा हे कालरुपा, सर्वा । सर्वप्रवर्तका, नियामका ॥९॥
वासुदेव म्हणे प्रभो, त्वच्चरण । करोत कल्याण सकलांचे ॥१०॥

॥७०॥
सृष्टयुत्पत्यादि वा महत्तत्त्वादीसीं । मूळ तूं, काळही तूंचि त्यांचा ॥१॥
चातुर्मासत्रयरुप संवत्सर । वेग हा गंभीर असे तव ॥२॥
ऐसा काल तूंचि महत्तत्त्वादिकां । नाम पुरुषोत्तमा, सार्थ तुझें ॥३॥
तुझ्याचि सामर्थे सगुण ईश्वर । रचि चराचर सावरण ॥४॥
मायोद्‍भूत मन, इंद्रिये, विषय । सेवूनि न लव बाधा तुज ॥५॥
यास्तव स्वतंत्य स्वामी तूं विश्वाचा । धाक विषयांचा सकलां नित्य ॥६॥
षोडशसहस्त्र स्त्रियांचे कटाक्ष । ते कामोद्दीपक व्यर्थ झाले ॥७॥
कथासरिता तैं गंगा-यमुनादि । पावन जगासी करिती नद्या ॥८॥
चरित्रोद्‍भूत वा चरणोद्‍भूत ज्या । इच्छी त्या सान्निध्या वासुदेव ॥९॥

॥७१॥
कथिताती शुक विरंचीवचन । देवा, त्वद्वचन पूर्ण झालें ॥१॥
संस्थापूनि धर्म वाढविली कीर्ति । गातां जे विश्वासी पुनित करी ॥२॥
अनुत्तमरुपे झालासी प्रकट । कर्मे अलौकिक आचरिलीं ॥३॥
गातां, ऐकतां जीं भवसिंधु आटे । कलिसंतरण तें यश तुझे ॥४॥
यदुवंशी देवा, घेऊनि अवतार । लोटलें वत्सर पाद शत ॥५॥
अवशिष्ट आतां नसे देवकार्य । शापें नष्टप्राय यादवही ॥६॥
यास्तव इच्छिसी तरी ये वैकुंठी । सकल देवांसी संरक्षाया ॥७॥
वासुदेव म्हणे प्रेमें नारायण । विसरला स्थान आपुलें काय ॥८॥

॥७२॥
विरंचीतें हरि बोले मी कृतार्थ । वीर्य-शौर्योद्धत यादव हे ॥१॥
पीडक होतील वेला मी तयांसी । घातक विश्वासी न होवोत ते ॥२॥
विप्रशापें नाशबीजें अंकुरलीं । सफल तीं व्हावीं हाचि हेतु ॥३॥
नि:शेष यादवसंहार होईल्ल। स्वधाम रुचेल मजसी तदा ॥४॥
ऐकूनियां ब्रह्मा वंदुनि प्रभूसी । गेला स्वस्थाळासी देवांसवें ॥५॥
द्वारावतीमाजी पुढती उत्पात । यादव एकत्र जमती भयें ॥६॥
वासुदेव म्हणे वृध्दां यदुराय । वदला जें काय ऐका तेंचि ॥७॥

॥७३॥
वृध्दहो, उत्पात, फल हे शापाचें । प्राप्त होई कैसें स्पष्ट दिसे ॥१॥
यास्तव श्रेष्ठ हो, प्रभासक्षेत्रासी । जावें जीविताची धरुनि आशा ॥२॥
चंद्रमाही जेथें झाला शापमुक्त । तीर्थे त्या पवित्र सकल होऊं ॥३॥
स्नान-तर्पणादि करुनि, सुग्रास । अन्न, सद्विप्रांत अर्पू प्रेमें ॥४॥
दक्षिणा-दानेंही अर्पू तयांप्रति । सत्कर्मनौकाचि भवार्णवीं ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीहरीवचनें । सज्जलीं वाहनें यादवांचीं ॥६॥

॥७४॥
सर्वही तें अवलोकूनि । कृष्णवचन ऐकूनि ॥१॥
महाभक्त श्रीकृष्णाचा । नित्य अनुगामी साचा ॥२॥
भेटे उध्द्व एकांतीं । तया जगत्कारणासी ॥३॥
चरणीं ठेऊनि मस्तक । जोडूनियां दोन्हीं हात ॥४॥
वदे कृष्णासी उध्दव । ऐका कथी वासुदेव ॥५॥

॥७५॥
देवदेवा, योगेश्वरा नारायणा । कीर्तिगानें जनां श्रवणें पुण्य ॥१॥
आंवरुनि सर्व यादवकुळातें । जासीए निजधामातें त्वरित वाटे ॥२॥
असूनि सामर्थ्य नाहीं विप्रशाप । वारिलासी, हेंच गमक त्याचें ॥३॥
त्वत्पादपद्मांचा विरह यदुनाथा । सहन करुं कैसा जाणसी तूं ॥४॥
यास्तव आपुल्यासंगेंचि वैकुंठी । नेई मजलागीं दयासिंधो ॥५॥
वासुदेव म्हणे अलौकिक प्रेम । विरह सहन न करी कदा ॥६॥

॥७६॥
देवा, तव लीला परम मंगल । ऐकतां सकळ गळती इच्छा ॥१॥
एकमात्र तूंचि आसनीं -शयनीं । प्रभो, ध्यानीं, मनीं, स्वप्नीं ज्यांसी ॥२॥
ऐसें आह्मीं भक्त एकाकी तुजसी । प्रिय आत्म्याप्रति केंवी त्यजूं ॥३॥
त्वत्सेवित माला, अन्नवस्त्रादिकें । भवोल्लंघनाचें बळ आह्मां ॥४॥
वायुभक्षी, ऊर्ध्वरेते जे व्रतस्थ । सुनिर्मल शांत संन्यासीही ॥५॥
महाप्रयत्नेंचि पावती जे पद । आह्मांसी सहजभक्तीनें तें ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीची शिदोरी । शाश्वत श्रीहरीचरण दावी ॥७॥

॥७७॥
भवाटवीमाजी भ्रमतांही आह्मीं । त्वद्‍गुणकीर्तनीं रंगूनियां ॥१॥
दुस्तर अज्ञानसागर लीलेनें । लंघुनि भक्तीनें धन्य होऊं ॥२॥
लीला, उपदेश, गमनागमन । हास्य, अवलोकन, तव क्रीडा ॥३॥
मानवासम, ज्या परी वरी वरी । भवरोगहारी स्मरणें गानें ॥४॥
परमभक्त तो उद्धव यापरी । वदतां श्रीहरी लाडक्यातें ॥५॥
बोलला, काय तें कथिताती शुक । वासुदेव हस्त जोडी कृष्णा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP