॥४७॥
राव म्हणे असंयमी भक्तिहीन । जयां समाधान लवही नसे ॥१॥
स्थिति काय त्यांची निवेदा तें मज । ऐकूनि ’ चमस ’ वदती ऐका ॥२॥
राया, विराटाच्या मुखादि पासूनि । चातुर्वर्ण्य जनीं प्रगट झालें ॥३॥
पृथक् गुण-कर्मे ब्राह्मणादि वर्ण । तैसेचि आश्रय प्रगट होती ॥४॥
ज्ञानधुंद किंवा अज्ञानि कृतघ्न । मूळ विसरुन साक्षात् ईशा ॥५॥
मानिती न किंवा भजती न मूढ । म्हणे वासुदेव भ्रष्टता त्यां ॥६॥
॥४८॥
कथाश्रवण ज्यां नृपाळा, दुर्लभ । अशक्य वा लाभ कीर्तनाचा ॥१॥
तया स्त्री-शूद्रांची करुनियां दया । सुगम करावा पंथ त्यांचा ॥२॥
द्विजन्मे जे विप्र, क्षत्रिय वा वैश्य । सुलभ ज्यां पंथ भक्तीचा, हा ॥३॥
परोक्षवादानें पावती ते मोह । असूनि सन्निध दूर होती ॥४॥
वासुदेव म्हणे हेतु दुर्लक्षितां । विपर्यासें नाशा पावे प्राणी ॥५॥
॥४९॥
रहस्य वेदांचे कळे न जयांतें । पंडितंमन्य ते मूढ जाणा ॥१॥
उत्तानार्थे चित्तीं अप्सरा चिंतूनि । मनोराज्यें मनी करिती बहु ॥२॥
रजोगुणें घोर संकल्प तयांचे । कामुक सर्पसे धरिती दंश ॥३॥
दुराग्रही, पापी, दांभिक ते मूढ । भक्तांचा उपहास करिती नित्य ॥४॥
वासुदेव म्हणे स्वमार्गी ज्यां श्रध्दा । द्वेष इतरांचा करिती न ते ॥५॥
॥५०॥
स्त्रियांचे ते दास, मैथुनाच्या गोष्टी । ध्यानीं मनी तोचि ध्यास तयां ॥१॥
विधि, दक्षिणा कीं अन्नसंतर्पण । विरहित यज्ञ, करिती मूढ ॥२॥
नेणतां रहस्य यज्ञाचें वृत्त्यर्थ । प्रशुहिंसा निंद्य करिती नित्य ॥३॥
श्री, भूति, कुल, विद्या, दान, धर्म । रुप, बल, कर्म, गर्वानें या ॥४॥
खल ते मंदधी ब्रह्मांडनायका । प्रिय, साधुसंतां अवमानिती ॥५॥
नभासम सर्वव्यापी तो शाश्वत । भरला ओतप्रोत जगामाजी ॥६॥
बोध त्या तत्वाचा, श्रेष्ठ तो पुरुषार्थ । पराकाष्ठा तीच आनंदाची ॥७॥
नियंता सर्वात्मा, आनंदस्वरुप । वेदशास्त्रें घोष करिती ऐसा ॥८॥
विषयविमूढां ऐकूं न ते जाई । ध्यानींहि न येई अर्थ त्यांच्या ॥९॥
मनोरथांसम अर्थ ते वेदांचा । करुनि, विषयांचा ध्यास घेती ॥१०॥
वासुदेव म्हणे आपुलाचि स्वार्थ । आरोपिती मूढ शास्त्रावरी ॥११॥
॥५१॥
प्रेरणेवांचूनि सहज प्रवृत्ति । त्रिविध या जगीं नित्य असे ॥१॥
मद्य, मांस तेंवी मैथुनाची हांव । जाणुनि स्वभाव मानवाचा ॥२॥
विवाह, यज्ञ तैं सौत्रामणिरुप । निवृत्त्यर्य, शास्त्रव्यवस्था हे ॥३॥
मर्यादाकथनरुप ते निवृत्ति । नव्हेचि प्रवृत्ति ध्यानीं घ्यावें ॥४॥
वासुदेव म्हणे मर्यादा धर्माची । पाळितां निवृत्ति सहज घडे ॥५॥
॥५२॥
धर्मार्थचि धन, धर्मे लाभे ज्ञान । तैसेंचि विज्ञान धर्माचारें ॥१॥
गृहकाजीं मूढ वेंचिती तें परी । नेणती अंतरी कृतांतासी ॥२॥
अवघ्राण, स्पर्श मदिरापशूंचा । हिंसादि वेदांचा आशय न ॥३॥
वंशवृर्ध्यर्थचि स्वीकार पत्नीचा । कामचेष्टा त्याचा हेतु नसे ॥४॥
ऐसा तो विशुध्द धर्मचि वेदांसी । मान्य हे मूढांसी न कळे कदा ॥५॥
वासुदेव म्हणी भोगलोलुप जे । रहस्य धर्माचें न कळें तयां ॥६॥
॥५३॥
दुराग्रही ऐसे अज्ञ दुष्ट जन । नि:शंक होऊन वधीती पशु ॥१॥
तेंचि पशु तयां भक्षिती परलोकी । वास सर्वदेहीं सदा ज्याचा ॥२॥
तया श्रीहरीचा करुनियां द्वेष । मर्त्य पुत्रादींत रमती मूढ ॥३॥
अध:पात त्यांचा घडे निश्चयानें । धर्म, अर्थ, कामें मोहित ते ॥४॥
ज्ञाता अज्ञही न, ऐसी ज्यांची स्थिति । ते आत्मघातकी देहवादी ॥५॥
वासुदेव म्हणे अशाश्वत तेंचि क। शाश्वत मानिती विषयाधीन ॥६॥
॥५४॥
आत्मघातकी हे अशांत विमूढ । अज्ञानचि ज्यांस ज्ञान भासे ॥१॥
अकृतकृत ते भग्नमनोरथ । कालाधीन भ्रष्ट, विनष्टचि ॥२॥
अतिशमार्जित गृहापत्यादिक । भोगसाधनांस अनिच्छेनें ॥३॥
गमावूनि, ईशपराड्.मुख अंती । नरकांत जाती निश्चयानें ॥४॥
वासुदेव म्हणी धन-मान हाचि । पुरषार्थ लोकीं अहंमन्या ॥५॥
॥५५॥
राव म्हणे मुने, कोण्या युगीं केंवी । कंथी भगवंताची पूजा व्हावी ॥१॥
करभाजन त्या बोलती कृतादि । युगभेदें त्यासी भजती भक्त ॥२॥
शुक्लवर्ण चतुर्भुज तैं जटिल । आजिन, वल्कल, उपवीतही ॥३॥
दंडकमंडलु रुद्रक्षमंडित । कृतयुगीं भक्त स्मरती ऐसा ॥४॥
शांत, सम, सह्यत्, निर्वैर, तपस्वी । आवडी जाणावी शम-दमीं ॥५॥
ऐसे जन हंस, सुपर्ण, वैकुंठ । धर्म, योगेश्वर, अमल, ईश ॥६॥
पुरुष, अव्यक्त, परमात्मा या नामें । भजती जाणावें सत्ययुगीं ॥७॥
वासुदेव म्हणे पूर्णत्व नराचें । येई प्रत्ययातें सत्ययुगीं ॥८॥
॥५६॥
त्रेतायुदीं रक्तवर्ण, चतुर्भुज । त्रिरज्जुसंयुक्त कमरपटटा ॥१॥
पिंगटकेश तो स्त्रुकस्त्रुवासंयुक्त । ऐसा यज्ञरुप वेदाधार ॥२॥
सर्व वेदमय एका श्रीहरीतें । आराधिती ज्ञाते त्रैविद्येनें ॥३॥
विष्णु, यज्ञ, पृश्निगर्भ, त्रिविक्रम । सर्ववंद्य जाण देवदेव ॥४॥
वृषाकपि, जयंतादि नामें तया । मोद वासुदेवा स्मरणें त्याच्या ॥५॥
॥५७॥
द्वापरांत शाम, शंख, चक्र, गदा, । पद्म, पीतवासा, श्रीवत्सही ॥१॥
चामरादि सार्वभौमचिन्हांकित । निगमागमोक्त आराधना ॥२॥
वासुदेव, संकर्षण तैं प्रद्युम्न । अनिरुध्द, नारायणऋषि ॥३॥
नमस्कार असो तया पुरुषोत्तमा । तैसेंचि महात्मा ऐशा नामें ॥४॥
विश्वेश्वर, विश्व, की सर्वभूतात्मा । स्तविती या नामां गाऊनियां ॥५॥
वासुदेव म्हणे तंत्रविधानोक्त । कलीमाजी पंथ ऐका नाना ॥६॥
॥५८॥
कृष्णवर्ण तेज:पुंज सांड्.गोपांग । सास्त्र, सपार्षद ऐशा रुपा ॥१॥
संकीर्तनादिक यज्ञांनीं त्या ज्ञाते । सुप्रसन्नचित्तें आराधिती ॥२॥
ध्यानयोग्य आधिव्याधिनिनाशक । तीर्थाचेंही तीर्थ, चरणां वदूं ॥३॥
शिव ब्रह्माही ज्या वंदनानें धन्य । एकचि जें स्थान शरणागतां ॥४॥
भूत्यार्तिनाशका प्रणतपालका । भवसिंधूनौका देवदेवा ॥५॥
महापुरुषा, हे पादपद्मी तुझ्या । नमस्कार माझा असो नित्य ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वभावें दास । वंदिती पदांस ऐशा स्तोत्रें ॥७॥
॥५९॥
देवही वांच्छिती राज्य तें त्यागून । सेविलें अरण्य पित्राज्ञेनें ॥१॥
प्राणप्रियेस्तव मायामृगाचाही । पाठलाग पाहीं केला जेणें ॥२॥
ऐशा महाभागा, त्वत्पादकमळ्वं । घेईन आदरें शिरीं माझ्या ॥३॥
तत्तद्युगीं ऐशा तत्तद्रुपें हरि । ध्याती निजांतरीं श्रेयस्काम ॥४॥
संकीर्तनें मात्र सकलार्थासिध्दि । यास्तव कलीसी नमिती ज्ञाते ॥५॥
वासुदेव म्हणे कीर्तनचि एक । होई सकलाधार कलीमाजी ॥६॥
॥६०॥
भवविनाशक शांतिप्रद जन्म । लाभला ज्या जाण कलियुगीं ॥१॥
संकीर्तनाहूनि अन्यलाभ तेथ । नसे त्रैलोक्यांत भ्रमत्या जीवा ॥२॥
कलीमाजी जन्म सकळ इच्छिती । ठाई ठाई घेती भक्त जन्म ॥३॥
क्वचित् क्वचित् भक्त होतील सर्वत्र । द्रविड देशांत परी बहु ॥४॥
पुण्यप्रद कृतमाला, ताम्रपर्णी । तेंवी पयस्विनी सुनिर्मला ॥५॥
ऐशा सरितांचें जल जे प्राशिती । वासुदेवभक्ति लाभे तयां ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तभावे कलि । भवभयहारी सहज होई ॥७॥
॥६१॥
देव, ऋषि, भूत, आप्त-पितरांचे । दास्य ऋणही ते नसे भक्तां ॥१॥
प्रारब्धें भक्तांतें घडतां विकर्म, मुकुंदास्मरण पुनित करी ॥२॥
देवर्षि बोलती ऐक्खूनि हे धर्म । आदरें पूजन राव करी ॥३॥
अंतर्धात तदा पावती योगींद्र । पावला राजेंद्र श्रेष्ठगती ॥४॥
वसुदेवा, तूंही वागतां त्यापरी । पावसी सत्वरी श्रेष्ठपदा ॥५॥
वासुदेव, म्हणे वसुदेवाप्रति । नारद भाग्याची स्मृति देती ॥६॥
॥६२॥
लाभला तुह्मांसी पुत्र नारायण । ऐश्वर्यनिधान सकलाधीश ॥१॥
दर्शनालिंगन प्रिय संभाषण । घडलें, पावन तेणे तुह्मीं ॥२॥
न्हाऊं-जेऊं तया घालूनि पालखीं । झोंके तयाप्रति दिशले प्रेमें ॥३॥
ऐशा पुत्रस्नेहें निर्मल मानस । होऊनि कृतार्थ जाहलांती ॥४॥
वासुदेव म्हणे वसुदेव-देवकी । निर्मिती भूलोकीं वैकुंठातें ॥५॥
॥६३॥
राया, शिशुपाल, पौंड्रादिक, वैरें । स्वरुपीं मिळाले श्रीहरीच्या ॥१॥
आसनीं, शयनीं, भोजनीं तयांसी । एकपात्र चित्तीं कृष्णध्यास ॥२॥
सरुपता तेणें पावले दुष्टही । मग अनुरक्तांसी काय उणें ॥३॥
वसुदेवा, तया सर्वात्म्याचे ठाई । पुत्रबुध्दि नाहीं योग्य तुज ॥४॥
भूभारहरणें दुष्टनिर्दलनें । भक्तप्रतिपालनें पसरे यश ॥५॥
वासुदेव म्हणे अवतारलीला । पावन जगाला करिती नित्य ॥६॥
॥६४॥
रायाप्रति शुक बोलताती ऐसें । ऐकूनि हरीचें सकलैश्वर्य ॥१॥
विस्मित देवकीसवें वसुदेव । होती नष्टमोह, अंती मुक्त ॥२॥
पुण्यकारक हा इतिहास, स्वस्थ । होऊनियां शांत, ऐकती जे ॥३॥
चित्तमल त्यांचे क्षणांत विनष्ट । पावतील मोक्ष निश्चयानें ॥४॥
वासुदेव म्हणे अध्याय-पंचक । हें मोक्षकारक पठतां नित्य ॥५॥