स्कंध ११ वा - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२२४॥
भार्येसवें किंवा एकाकी वनांत । बोलला गोविंद निघूनि जाणें ॥१॥
तृतिय विभाग आयुष्याचा तेथें । जावा शांतचित्तें वानप्रस्थीं ॥२॥
वन्य कंद-मुळें सेवावीं पवित्र । अजिन, वल्कल, तृण ल्यावें ॥३॥
केश, रोम, नखें, श्मश्रू वाढवावीं । तेंवी न धुवावी दंतपक्ती ॥४॥
त्रिकाल उदकीं करावें मज्जन । तैसेंचि शयन भूमीवरी ॥५॥
ग्रीष्मांत पंचाग्नि, वर्षात पर्जन्य । शिशिरीं निमग्न उदकीं व्हावें ॥६॥
खडतर ऐसें तप जो आचरी । वासुदेव धर्री पाय त्याचें ॥७॥
५-१२

॥२२५॥
अग्निपक्क किंवा कालपक्व अन्न । कुटून, चावून सेवावें कीं ॥१॥
आवश्यक तें तें असो कष्टर्जित । देश, काल, बल जाणे त्याचें ॥२॥
वन्यवस्तूचेचि चरु-पुरोडाश । पशु-पुरोडाश वर्ज तया ॥३॥
अग्निहोत्रादिकीं व्हावीं श्रौतकर्मे । या तपाचरणें ब्रह्मलोक ॥४॥
ऐसें घोर तप विषयार्थ वेंची । तयाहूनि जगीं मूढ कोण ॥५॥
जराजर्जर तें जाहल्या शरीर । स्वानंदें अग्नीस समर्पावें ॥६॥
अथवा वैराग्य प्राप्त होतां न्यास । करुनि विध्युक्त संतोषावें ॥७॥
वासुदेव म्हणे पूर्ववैराग्येंचि । पात्रता न्यासाची घ्यावी ध्यानी ॥८॥
१३-१६

॥२२६॥
यथाशास्त्र मज आराधूनि स्वयें । सर्वस्व अर्पावें क्रत्विजासी ॥१॥
प्राणरुपीं अग्नी स्थापूनि, निरिच्छ । होऊनि, संन्यास मग घ्यावा ॥२॥
दारादि रुपानें करिती देव विघ्नें । लंघील आह्मांतें ऐशा भयें ॥३॥
दंड-कमंडलु कौपीनावांचूनि । आपत्ति वर्जूनि संग्रह नसो ॥४॥
दृष्टीपूत मार्ग, जल वस्त्रपूत । वाचा शास्त्रपूत हितकारी ॥५॥
वासुदेव म्हणे मन:पूत क्रिया । तोचि जन्मूनियां धन्य होई ॥६॥
१७-२०

॥२२७॥
मौनें, वाणी, तेंवी मन निरिच्छेनें । देह प्राणायामें दंड पावे ॥१॥
उध्दवा हे तीन दंड न जयासी । वेणुदंडें त्यासी काय लाभ ॥२॥
निंद्य पतितासी वर्जूनियां, सप्त । सदनें भिक्षेस यतिनें जाणें ॥३॥
नियोजित स्थानें नसावी कदापि । चारि वर्ण त्यासे भिक्षा योग्य ॥४॥
मौनव्रतें जळीं करुनि ती शुध्द । भिक्षा चतुर्भाग पुढती व्हावी ॥५॥
विष्णु, भूतां दोन, अर्पूनि आपण । करावें सेवन दोन, शुध्द ॥६॥
एकाकी संयमीं विचरावें लोकीं । व्हावें आत्मरति आत्मक्रीड ॥७॥
वासुदेव म्हणे आत्मानंदमग्न । वृत्ति ज्याची सम वंद्य तोचि ॥८॥
२१-२५

॥२२८॥
वास्तव्य निर्भय एकांती जयास । निर्मळ मानस ध्यानें माझ्या ॥१॥
सर्वव्यापी आत्मा तोचि मी हें ध्यान । दुजा मजहून न दिसे तया ॥२॥
इंद्रियाधीनता जाणा तोचि बंध । संयमाचि मोक्ष इंद्रियांचा ॥३॥
यास्तव षड्रिपु जिंकूनियां ध्यानें । स्वरुपीं रमावें त्यजूनि काम ॥४॥
पुर, ग्राम, व्रज तेंवी पुण्यक्षेत्रें । भिक्षार्थ हिंडावें, करणें यात्रा ॥५॥
वासुदेव म्हणे पवित्रान्नें शुध्दि । वानप्रस्थां याची, बहुधा साधु ॥६॥
२६-३२

॥२२९॥
मानूंनये सत्य दृश्य हें विनाशी । इह-परसौख्यीं हांव नसो ॥१॥
मन-प्राणादि हे आत्म्यावरी भास । विसरुनि ते स्वस्थ सदा व्हावें ॥२॥
विषयविरक्त आत्मानंदमग्न । ज्ञानी वा निष्काम भक्त असो ॥३॥
विधि-निषेधांची मर्यादा न तया । चिन्हें त्या कासया आश्रमाचीं ॥४॥
असूनियां ज्ञाता क्रीडे बालासम । असूनि निपुण अज्ञ भासे ॥५॥
उन्मत्तासम तो ज्ञाताही वागेल । स्वैर विचरेल श्रुतिज्ञही ॥६॥
वेदवादी किंवा पाखंडी तार्किक । विवादी, पक्षांध होऊं नये ॥७॥
जनसंगर्गे तो विटे न विटवी । कटु शब्द साही अवमानीना ॥८॥
देहास्तव ज्ञाता वैर पशूसम । न करीचि जाण कवणाचेंही ॥९॥
वासुदेव म्हणे जाणे आत्मा एक । उदकपात्रीं चंद्र दिसती बहु ॥१०॥
३३-३७

॥२३०॥
मिष्टान्न न लाभे तरी न खिन्नता । लाभतां न चिंत्ता हर्ष होई ॥१॥
यदृच्छाप्राप्त तें सेवितो संतोषें । अन्न, वस्त्र तैसें शय्यास्थान ॥२॥
स्नान, शौचादिक आचरी स्वेच्छेनें । शास्ताचीं बंधनें नसती तया ॥३॥
अभेदभावें तो विकल्परहित । देहेंद्रियेंचि तो भेदभाव ॥४॥
वासुदेव म्हणे देहपात होतां । भक्त तेंवी ज्ञाता ध्येयरुप ॥५॥
३८-३९

॥२३१॥
दु:खरुपकार्यविराग जयासी । साधनें गुरुसी पुशिजे तेणें ॥१॥
आत्मसाक्षात्कार होईतों, गुरु मी । भजावें मानूनि अत्यादरें ॥२॥
दृढश्रध्दायुक्त निर्मत्सरभावें । भक्तीनें सेवावें गुरुप्रती ॥३॥
वासुदेव म्हणे आश्रमीं वसावें । कृतार्थचि व्हावें साक्षात्कारें ॥४॥
४०-४२

॥२३२॥
उध्दवा, जयाचे स्वैर कामादिक । इंद्रियें बलवंत सारथी ज्या ॥१॥
ज्ञान, वैराग्य न, वेषमात्रें यति । संन्यास जयासी उपजीविका ॥२॥
दांभिक तो आत्मघाती, देवद्रोही । अपक्ककषायी इह न पर ॥३॥
अहिंसा, शांति हे धर्म संन्याशाचे । तप, यजन ते वनौकसा ॥४॥
भूतरक्षा यज्ञ-याग ते गृहस्था । आचार्यसेवा त्या ब्रह्मचार्‍या ॥५॥
वासुदेव म्हणे संक्षेपें हे धर्म । पाळितां कल्याण मानवाचें ॥६॥
४३-४४

॥२३३॥
ब्रह्मचर्य, तप, शौच, समाधान । सह्र्द्भाव जाण भूतमात्री ॥१॥
ऋतुगमनें तो गृही ब्रह्मचारी । मद्भक्ति वरावी सकलांनीही ॥२॥
अनन्य भक्तीनें यापरी जो भजे । स्वधर्मे विराजे, मद्भाव ज्या ॥३॥
सकलही भूतीं, परम त्या भक्ति । लाभे, हे हितोक्ति वासुदेवा ॥४॥
४५-४८

॥२३४॥
उपजतां ऐसी भक्ति हे शाश्वत । सर्वाधारा मज पावे भक्त ॥१॥
ऐसा जो स्वधर्मे चित्तशुध्दि पावे । ऐश्वर्य त्या कळे सहज माझें ॥२॥
परोक्षापरोक्षज्ञानें तो सत्वरि । पावे मोक्षपुरी मत्स्वरुपें ॥३॥
वर्णाश्रमधर्मदुग्धांत शर्करा । भक्ति हे निर्मला मिळतां लाभ ॥४॥
साधो, पुशिलें तें कथिलें तुजसी । धर्मयुक्तभक्तिरहस्य हें ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तिरसायन । करी निवारण भवरोगाचें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP