स्कंध ११ वा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१४१॥
गुणसंगें बध्द-मुक्त । संज्ञा न ते स्वाभाविक ॥१॥
मायामूलक ते गुण । बंध मोक्ष मजलागीं न ॥२॥
शोक-मोह सुख-दु:ख । देहोत्पत्ती ही मायिक ॥३॥
स्वप्नासम संसाराचा । भास आत्म्यावरी साचा ॥४॥
वासुदेव म्हणे दृश्य । आरोपही नव्हे सत्य ॥५॥

॥१४२॥
देहधार्‍याप्रति बंधमोक्षकर्त्या । विद्या तैं अविद्या आद्यशक्ति ॥१॥
मायानिर्मित त्या ममांश जीवासी । अविद्या विद्याचि बंध, मोक्ष ॥२॥
बध्द, मुक्त, वैलक्षण्यही ऐकावे । विरुध्द धर्म ते वसती देही ॥३॥
वासुदेव म्हणे विरुध्द धर्माचा । आश्रय तो कैसा देह ऐका ॥४॥

॥१४३॥
जीव-शिव सखे, वृक्षावरी एका । यदृच्छेनें नीडा करिती वाटे ॥१॥
एक, वृक्षफळें भक्षी, परी अन्य । असोनि निरन्न, बलवंत ॥२॥
फलें न भक्षी तो जाणे उभयांसी । भक्षक, नेणेचि आपणाही ॥३॥
अविद्यायुक्त तो नित्य बंधनांत । विद्यासंयुक्त तो नित्य मुक्त ॥४॥
ज्ञाता तो देहांत असूनि न तेथें । स्वप्न जागृतातें जेंवी मिथ्या ॥५॥
मंदबुध्दि अज्ञ नसूनि देहांत । मानी मी देहांत स्वप्नस्थसा ॥६॥
वासुदेव म्हणे केवळ अज्ञान । बंधासी कारण भासमात्र ॥७॥

॥१४४॥
कर्ण, नेत्रादि वा सत्वादिक गुण । आपणा आपण सेविताती ॥१॥
ज्ञाता अहंभावें लिप्त नसे तेथें । अविक्रिय स्वयें जाणूनियां ॥२॥
दैवाधीन देही, आसक्त होऊन । कर्ता मी मानून बध्द होई ॥३॥
वासुदेव म्हणे जयांचें जें कर्म । तयांतें अर्पून सुखी व्हावें ॥४॥

॥१४५॥
खान, पान तेंवी दर्शन-स्पर्शनीं । विरक्त तो जनीं अनासक्त ॥१॥
तत्तदिंद्रियांचे विषय सेवितां । असंसक्त ज्ञाता नभासम ॥२॥
वायु, अग्निही ते अनासक्त जैसे । तेंवी ज्ञाता वसे विषयांमाजी ॥३॥
असंगत्वें तीक्ष्ण, स्वच्छ, शुध्ददृष्टि । सकलही छेदी संशयांतें ॥४॥
ऐसा ज्ञाता जेंवी स्वप्नांतूनि जाणा । न शिवे नानात्व कदाकाळी ॥५॥
वासुदेव म्हणे मुरडितां दृष्टि । सर्वत्र तयासी एक आत्मा ॥६॥
१४-१७

॥१४६॥
प्राणेंद्रिय मन-बुध्दिवृत्ति ज्याच्या । नि:संकल्प त्याचा जन्म सार्थ ॥१॥
बसोनि तो देहीं देहभावातीत । श्वापदें पीडोत हिंस्त्रही त्या ॥२॥
यदृच्छेनें कोणी आदरें पूजितां । विकार न चित्ता लवही त्याच्या ॥३॥
भलेंबुरें कोणी वागतां तयाची । क्रोधें निंदा-स्तुति करीचिना ॥४॥
निजानंदमग्न अचल सर्वदा । चिंतीही न कदा इष्टानिष्ट ॥५॥
आत्माराम ऐशा जडवत्‍ वृत्तीनें । वासुदेव म्हणे वर्ते मुनि ॥६॥
१८-२०

॥१४७॥
साक्षात्कारहीन पंडितही जरी । व्यर्थचि ते तरी श्रम त्याचे ॥१॥
दुग्धार्थ भाकड धेनुसंरक्षण । व्यर्थ तैसें ज्ञान शाब्दिकाचें ॥२॥
भाकडधेनु तैं दुर्वृत्त ललना । पराधीन जाणा देह, तेंवी ॥३॥
दुराचारी प्रजा, अकृतार्थ धन । वाणी नामाविण दु:खचि तें ॥४॥
उत्पत्ति, स्थिति तैं संहारकारक । चरित्रें अपार पुण्यप्रद ॥५॥
जगत्पावन जे अवतार माझे । वर्णन तयांचें न करी प्रेमें ॥६॥
वंध्या स्त्रीसमचि वाणी ते मानावी । ज्ञात्यानें त्यजावी ऐसी वाणी ॥७॥
वासुदेव म्हणे जाणोनि रहस्य । गावें ईश्वरास नम्रभावें ॥८॥
२१-२२

॥१४८॥
आत्मभेदभ्रम दूर व्हावा शास्त्रें । चित्त समर्पावे मजप्रति ॥१॥
बाह्य विश्वांतूनि निवृत्त होऊनि । परमात्मचिंतनीं रमूनि जावें ॥२॥
मन परब्रह्मीं स्थिर न करवे । निरपेक्ष व्हावें कर्म तरी ॥३॥
वासुदेव म्हणे संर्वसमर्पण । उत्तम साधन साधकासी ॥४॥

॥१४९॥
सश्रद्ध होऊनि पावन मंगल । चरित्रें रसाळ श्रीहरीची ॥१॥
ऐक गा, स्मरण अभिनय करीं । वारंवार धरी तोचि ध्यास ॥२॥
धर्मार्थ -कामद कर्मे तीं विहित । आचरी मदर्थ ममाश्रयें ॥३॥
उध्दवा, यापरी शाश्वताचे ठाई । निश्चल ते होई भक्ति येणें ॥४॥
साधुसंगप्राप्त भक्तीनें संतोक्त । शाश्वत तें पद त्वरित जोडी ॥५॥
वासुदेव म्हणे सत्संग, सद्भक्ति । एकनिष्ठाप्रति मुक्तिरुप ॥६॥
२६-२८

॥१५०॥
उध्दव म्हणे हे पुण्यश्लोका, मान्य । तुजसी जो, धन्य कैसा साधु ॥१॥
सज्जनमान्य ते भक्तिही कथावी । प्राप्ति तव व्हावी सुलभ जेणें ॥२॥
पुरुषोत्तमा, हे देवदेवा, प्रभो । नत अनुरक्त जो शरण तुज ॥३॥
त्या मज कथावें, ब्रह्म तूं निर्लेप । माया नियामक मायातीता ॥४॥
वासुदेव म्हणे भक्तकल्याणार्थ । इच्छामात्रें व्यक्त जाहलासी ॥५॥
२९-३२

॥१५१॥
देव म्हणे नित्य कृपाळु अद्रोही । तितिक्षा त्या ठाई सत्यप्रेम ॥१॥
शुध्दचित्त सम सर्वोपकारक । बुध्दि कामहत नसे ज्याची ॥२॥
इंद्रियविजयी, मृदु, सदाचारी । अकिंचन वरी निरिच्छता ॥३॥
अल्पाहारी शांत स्थिर मच्छरण । सर्वदा मनन करी माझें ॥४॥
दक्ष, गंभीर जो धीर शत्रुजेता । अमानी जो ज्ञात्यां मान देई ॥५॥
बोधकुशल जो जगन्मित्र कवि । मदुक्त ते पाही वेदधर्म ॥६॥
जाणुनियां त्यागी, केवळ मुद्भक्ति । आचरी, बोलती श्रेष्ठ तया ॥७॥
वासुदेव म्हणे विधिनिषेधहि । उल्लंघूनि जाई भक्तोत्तम ॥८॥
३३-३७

॥१५२॥
कोण केवढा वा कैसा मी हे जाणें । अथवा न जाणें परी नित्य ॥१॥
अनन्यभावें जे आठविती मज । भक्त तेचि श्रेष्ठ मित्रा, जाणें ॥२॥
राम-कृष्णमूर्ती अथवा माझे भक्त । सेवी, स्तवी त्यांस आलिंगीही ॥३॥
विनम्रभावेंचि गुण -कर्मकीर्तन । श्रध्देनें श्रवण, ध्यान तेंचि ॥४॥
सर्वलाभसमर्पण करी दास्यें । आत्माही तो मातें अर्पी भवें ॥५॥
जन्मकथा, गीत, सनृत्य-वादनीं । उत्सव करुनि जन्मकाळी ॥६॥
पर्वकाळीं करी पुण्यतीर्थयात्रा । अर्पी पुष्पमाला नैवेद्यही ॥७॥
वासुदेव म्हणे वैदिकी-तांत्रिकी । दीक्षा ते तयासी व्रतालागीं ॥८॥
३८-४१

॥१५३॥
मूर्तिस्थापना वा मंदिर, उपवन । पुष्पफलाकीर्ण क्रीडास्थानें ॥१॥
एकाकी वा समुदायासवें निर्मी । झाडी, सारवीही देवद्वारी ॥२॥
सडा-संमार्जन रंगवल्लिकादि । दासासम पाही करितो सेवा ॥३॥
मानहीन अदंभेंचि सेवा नित्य । करुनि उल्लेखही न इच्छी ॥४॥
देवकार्यालागी आर्पिल्या दीपाचा । प्रकाशही कदा अपेक्षीना ॥५॥
उत्तम जें लोकी प्रिय वा आपणा । अर्पितो ते जाणा मजलागी जो ॥६॥
अनंतफलद भक्ति ते जाणावी । वासुदेव गाई कृष्णोक्तीतें ॥७॥
४२-४५

॥१५४॥
उध्दवासी बोले देव, सूर्य, अग्नि । विप्र, धेनु जनी वैष्णवही ॥१॥
आकाश, वायु तैं जल, भूमि, आत्मा । भूतमात्र जाणा पूजास्थानें ॥२॥
वेदमंत्रें सूर्य, हविर्भागें अग्नि । विप्र सन्मानू, कवळें धेनु ॥३॥
बंधुभावें तुष्ट वैष्ण्दव ते होती । ध्यानें ह्र्दयाकाशी उपासावें ॥४॥
प्राणवायु मुख्य मानूनि वायुसी । जलाशय पूजी तिलतंदुलीं ॥५॥
रहस्यमंत्रांनी स्थंडिल पूजावें । स्वस्वरुप ध्यानें आत्मपूजा ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वत्र समत्वें । क्षेत्रज्ञा पूजावें सर्वभावें ॥७॥
४६-४९

॥१५५॥
ऐशा एकादशस्थानीं । शंखचक्र गदापाणी ॥१॥
पद्मयुक्त चतुर्भुज । घ्यावा प्रेमें अधोक्षज ॥२॥
इष्टापूर्त साधनांनीं । समाधानें सेवी जनीं ॥३॥
लाभे संतसंगें भक्ति । नित्य स्मरण माझेचि ॥४॥
भक्तियोग वा सत्संग । प्राय: अन्य नसे मार्ग ॥५॥
आधार मी सज्जनांचा । कथितों गुह्य तेंही आतां ॥६॥
परम गौप्य कथितों ऐक । तूंचि सखा सुह्यद , भृत्य ॥७॥
वासुदेव म्हणे देवा । भक्ताहूनि नसे ठेवा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP