स्कंध ११ वा - अध्याय २१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२५४॥ ।१-६।
कृष्ण म्हणे ऐसे विविध हे मार्ग । त्यागूनियां क्षुद्र, विषयीं रमे ॥१॥
चुकती न त्याच्या जन्म-मृत्युखेपा । विषयाभिलाषा बंधकारी ॥२॥
स्वस्वधर्मे निष्ठा उत्तम तो गुण । विपर्यय जाण खचित दोष ॥३॥
एकासी जो गुण तोचि अन्या दोष । जाणावें रहस्य शास्त्राज्ञेनें ॥४॥
आचार व्यवहार प्रायश्चित्तरुप । धर्म कथी शास्त्र प्रमाण तें ॥५॥
आब्रह्मस्तंबांचे देह भूतात्मक । जीव शक्तिरुप तयांमाजी ॥६॥
समान देह्यांही अधिकार भिन्न । यास्तव त्यां अन्य कथिला धर्म ॥७॥
वासुदेव म्हणे कल्याणार्थ शास्त्र । आज्ञापितें, हित समजे ज्ञाता ॥८॥

॥२५५॥ ।७-१०।
ग्राह्याग्राह्यता ते देशकालादींची । कथिली, कर्मासी नियमन तें ॥१॥
अकृष्णसार जो विप्रहीन देश । अशुचि अयोग्य वास्तव्यासी ॥२॥
असूनिही विप्र कृष्णसारही ते । अपवित्र साचे कलिंगादि ॥३॥
अवर्षण तेंवी अशौचादियुक्त । काल अपवित्र कर्मालागीं ॥४॥
सुसंपन्न तेंवी पर्वकाल जाण । युक्त व्हावें कर्म तयावेळीं ॥५॥
काल संस्कारही प्रोक्षण ते मंत्र । द्रव्यशुध्दीस्तव आवश्यक ॥६॥
वासुदेव म्हणे शास्त्राज्ञा ते सूक्ष्म । जाणूनि कल्याण आचरावी ॥७॥

॥२५६॥ ।११-१५।
सामर्थ्यासामर्थ्य बुध्दि, शक्ति, स्थिति । पाहूनि देशादि करिती पापें ॥१॥
एकासी जें पाप तेंचि अन्यासी न । पात्रापात्र ज्ञानतारतम्यें ॥२॥
धान्य, काष्ठ, तैल, घृतादींची शुध्दी । काल वाय्व्य्ग्न्यादि मृत्तोयें वा ॥३॥
ज्यायोगें तें द्र्व्य येई शुध्दरुपा । शुध्दि इष्ट लेखा त्याचि द्र्व्यें ॥४॥
स्नान, दान, तप, संस्कारादिकांनी । विशुध्द होवोनि कर्म घडो ॥५॥
शास्त्रोक्त मंत्रानें घडे मंत्रसिध्दि । सर्वार्पणें शुध्दि कर्मालागीं ॥६॥
देश, काल, द्रव्य, कर्ता, मंत्र, कर्म । शुध्दिनेंचि, कर्म अन्य पाप ॥७॥
वासुदेव म्हणे विधि तैं निषेध । पाळितां शास्त्रोक्त धर्म घडे ॥८॥

॥२५७॥ ।१६-१८।
क्वचित्‍ गुणदोष पालटती रुप । निर्णायक शास्त्र भेद नाशी ॥१॥
जया कर्मे घडे धार्मिका पतन । पतिता तें परी न पतनकारी ॥२॥
यतीसी त्याज्य तें ग्राह्यचि गृहस्था । पतितिआ न दुजा अध:पात ॥३॥
जैसा जैसा होई विरक्त ज्यांतूनि । तैसा तो त्यांतूनि मुक्त जीव ॥४॥
ऐसा शोक -मोह- भयनिवारक । श्रेयद हा देख मनुजा धर्म ॥५॥
वासुदेव म्हणे गुणदोषज्ञान । निवृत्त तें जाण करीतसे ॥६॥

॥२५८॥ ।१९-२२।
विषयचि हित, ऐसें होतां ध्यान । आसक्ति निर्माण होई त्यांची ॥१॥
अभिलाषा तेणें पुढती कलह । त्यायोगें असह्य क्रोध वाढे ॥२॥
तया क्रोधा तम होतां पाठिराखा । बुध्दिनाश त्याचा सहज होई ॥३॥
नष्टबुध्दिजीव होई शून्यरुप । प्रेतरुपा त्यास स्वार्थ कैंचा ॥४॥
पुरुषार्थहीन वृक्षचि तो मूढ । भस्त्रेसम श्वासमात्र घेई ॥५॥
अभिनिवेशें तो सेवितो विषय । कोण मी वा काय न कळे तया ॥६॥
वासुदेव म्हणे विवेकरहित । जीवन तें व्यर्थ प्रेतासम ॥७॥

॥२५९॥ ।२३-२६।
औषधार्थ मधु-शर्करादि वैद्य । अर्पी, तेंवी वेद स्वर्ग कथी ॥१॥
कर्मप्रवृत्त्यर्थ फलश्रुति जाण । तात्पर्य कदा न श्रुतीचें तें ॥२॥
विषयासक्तांचें पुत्रादिकीं प्रेम । स्वाभाविक जाण मोहमय ॥३॥
आत्महित जया न कळी लंपटा । तया कुमार्गस्था वेद केंवी ॥४॥
योजील कुमार्गी, परी कांहीं अज्ञ । फलश्रुतिमग्न कथिती तैसें ॥५॥
वासुदेव म्हणे ज्ञाते न कदापि । विपरीतबुध्दि धरिती वेदीं ॥६॥

॥२६०॥ ।२७-३०।
सकाम कृपण, लोभी पुष्प-तुष्ट । फल दुर्लक्षित करिती मूढ ॥१॥
तैसेचि याज्ञिक त्यागूनि वैकुंठ । इच्छिताती स्वर्ग मतिमंद ॥२॥
सर्वलोकस्वामी ह्र्दयस्थ जो मी । नेणती ते कर्मी मग्न होती ॥३॥
स्वर्गसौख्यधूम्रें अंध जे प्राणात्मे । शाश्वत तयातें न कळे सुख ॥४॥
हिंसाप्रियांनी ते करावी यज्ञांत । करावीच वेद न कथी ऐसें ॥५॥
हिंसानिरत ते स्वार्थे करिती यज्ञ । देवतापूजन कामनेनें ॥६॥
वासुदेव म्हणे स्वर्ग, पितृलोक । रुचती न भोग निष्कामासी ॥७॥

॥२६१॥ ।३१-३५।
पुढील आशेनें प्राप्ताचाही त्याग । करी मूढ वैश्य, जयापरी ॥१॥
तैसे श्रुतिरम्य, स्वप्नसदृशही । इच्छूनि स्वर्गादि करिती यज्ञ ॥२॥
त्रिगुणनिष्ठ ते भजती देवांसी । तैसी नच माझी निष्ठा तयां ॥३॥
यज्ञें स्वर्गसौख्य भोगूं आनंदानें । महाकुळीं जन्में, पुढती सौख्य ॥४॥
ऐशा रमणीय श्रुतिवाक्यें मूढ । रंगूनियां मज बघतीही ना ॥५॥
त्रिकांडयुक्त हे वेद ब्रह्मपर । बोध तो परोक्श मजही रुचे ॥६॥
वासुदेव म्हणे आवेळींच त्याग । न घडो, हा मार्ग प्रिय देवा ॥७॥

॥२६२॥ ।३६-४०।
सुदुर्बोध वेद प्राणादिकां मूळ । अनंत अपार सिंधूसम ॥१॥
ब्रह्मस्वरुप हा बिसतंतुरुप । ज्ञाते नादरुप बघती विश्वीं ॥२॥
तंतुमय जेंवी कमलाचा देंठ । तेंवी विश्वी व्याप्त वेदनाद ॥३॥
उर्णनाभीसम नादरुपी प्राण । आकाशस्थ स्वन मनोमार्गे ॥४॥
अकारापासूनि मकारापर्यंत । करीतसे व्यक्त तोचि वेद ॥५॥
छंदोमयी वेदवाणी ते अमृत । प्रणवांचूनि व्यक्त करी प्रभु ॥६॥
विचित्र भाषांनीं होर्ह अभिव्यक्त । अभिवृध्दिरुप छंदात्मक ॥७॥
अनंत अपार सृष्टयारंभी व्यक्त । आंवरी अनंत तिज अंतीं ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसें नादब्रह्म । वेदरुप जाण निराकार ॥९॥

॥२६३॥ ।४१-४३।
गायत्र्युष्णिकादि वेदीं बहु छंद । मजवीण गुह्य न कळे त्यांचें ॥१॥
यज्ञविधिरुपें कथिताती मज । देवता मी तेथ उपासकां ॥२॥
ज्ञानमार्गे ब्रह्म सत्य, मिथ्या जग । दावीतसे वेद ऊहापोहें ॥३॥
करुनियां अध्यारोप अपवादें । लीन होई स्वांगें ब्रह्मरुपीं ॥४॥
वासुदेव म्हणे आत्मा ब्रह्मरुप । सकल वेदार्थ हाचि असे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP