स्कंध ११ वा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥३९॥
निमि, जायंतेया पुशी नम्रभावें । अवतार कथावे हरिचे मज ॥१॥
आचारिल्या लीला, आचरी वा अद्य । पुढती आचरील त्याही कथा ॥२॥
’ द्रुमिल ’ बोलती लीला अनंताच्या । अनंतचि साच्या कोण जाणे ॥३॥
गणना तयांची इच्छी तो बालचि । भूरज:कणांची गणना शक्य ॥४॥
दीर्घकालें दीर्घ यत्नेंही प्रभूचे । अगण्यचि साचे गुण परी ॥५॥
स्वतेजनिर्मित पंचभूतोद्‍भूत । निर्मूनि ब्रह्मांडनगर स्वयें ॥६॥
अंशरुपें केला प्रवेश त्यामाजी । नारायण तोचि आदिदेव ॥७॥
वासुदेव म्हणे द्रुमिलोक्त आतां । लीला श्रीहरीच्या परिसा प्रेमें ॥८॥

॥४०॥
त्रैलोक्यव्यापार शरीरीं जयाच्या । ज्ञानकर्मेद्रियां शक्ति ज्याची ॥१॥
सत्वगुणें ज्याच्या जीवांप्रति ज्ञान । श्वसनें ज्या प्राणशक्ति जनां ॥२॥
ओज-बलही तें लाभे सकलांसी । गुणें उत्पत्यादि विश्वा ज्याच्या ॥३॥
आदिकर्ता, यज्ञफलदाता, धर्मसेतु । तोचि ब्रह्मा, विष्णु, रुद्रही तो ॥४॥
विविध त्या रुपें उत्पत्यादि कर्ता । वासुदेवा त्याचा ध्यास लागो ॥५॥

॥४१॥
धर्मपत्नी मूर्ति, नर- नारायणां । प्रसवे दक्षकन्या जुळ्या भावां ॥१॥
तोचि नारायण, नाददादिकांसी । वाट नैष्कर्म्याची क्रमूनि, कथी ॥२॥
अद्यही सन्मुनी तया सेविताती । पाहूनि तयासी शंका इंद्रा ॥३॥
इंद्रपद मुनी इच्छिति त्या वाटे । धाडिलें कामातें तपोभंगा ॥४॥
अप्सरा वसंतासवें बदरीवनी । कटाक्ष फेंकूनि मोहक ते ॥५॥
शीतल सुगंधें कामप्रदीपन । करितांही मन मुनीचें स्थित ॥६॥
वासुदेव म्हणे इंद्राचें कपट । जाणुनिही शांत मुनिराज ॥७॥

॥४२॥
प्रशांतमुनींनी क्षमूनि इंद्रासी । कामादिकांप्रति पाचारिलें ॥१॥
हांसूनि उभय देऊनि बोलती । घ्यावें स्वागतासी अर्पितों त्या ॥२॥
ऐकूनि कामादि बोलती लाजूनि । नम्र त्वच्चरणीं देवादिक ॥३॥
ऐशा तुज आह्मीं करावे विचलित । धरिला हा हेत मूढपणें ॥४॥
देव, हविर्भाग इच्छूनि याज्ञिकां । कदापि न विघ्नां करिती, परी ॥५॥
मोक्षेच्छूसी विघ्नें करिताती तेचि । परी येथें त्यांसी काय बल ॥६॥
वासुदेव म्हणे विघ्नांतकाप्रति । बाधतील कैसीं विघ्नें सांगा ॥७॥

॥४३॥
क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, पर्जन्यादि । साहूनि द्वंद्वांसी महाकष्टें ॥१॥
जिव्होपस्थजयें सागर दुर्लघ्य । लंघूनि विफल वरिती क्रोध ॥२॥
गोष्पदीं ते नष्ट होऊनि तपस्या । गमाविती वृघा क्रोधास्तव ॥३॥
स्तवितां यापरी दावी नारायण । लावण्यसंपन्न बहुत स्त्रिया ॥४॥
सालंकृत नम्र सेविती मुनीतें । वासुदेव सौख्यें यश गाई ॥५॥

॥४४॥
लक्ष्मीसम कांति, सुगंधें तयांच्या । मोह कामादिकां पडला बहु ॥१॥
पाहूनि तें रुप, तेज लज्जायुक्त । होती, अहंकार गळला त्यांचा ॥२॥
तदा त्या विनम्र कामादिकां मुनि । म्हणती हांसूनि न्यावी एक ॥३॥
भूषण स्वर्गासी होईल ते जाण । रुचली देवांना ’ उर्वशी ’ ते ॥४॥
मानूनियां आज्ञा स्वीकारुनि तिज । वंदूनि मुनींस स्वर्गी गेले ॥५॥
ऐकूनियां वृत्त वृत्रहंसा त्रस्त । जाहला विस्मित निजांतरीं ॥६॥
वासुदेव म्हणे अतर्क्य सामर्थ्य । ईश्वराचें, इंद्र तोही नेणें ॥७॥

॥४५॥
हंस, दत्त, सनकादि तैं ऋषभ । होऊनियां बोध केला देवें ॥१॥
पिताचि ऋषभ हयग्रीवें वेद । रक्षियेले दैत्य संहारुनि ॥२॥
मत्स्य अवतारीं रक्षिलें मनूसी । वराहें भूमीसी उध्दरिलें ॥३॥
समुद्रमंथनीं कूर्म झाले देव । रक्षिला गजेंद्र हरिरुपें ॥४॥
गोष्पदसागरीं बुडतां वालखिल्य । रक्षी शाड्‍.र्गधर तयांलागीं ॥५॥
वृत्रवधदोषमुक्त केला इंद्र । देवस्त्रिया बध्द, मुक्त केल्या ॥६॥
नृसिंह होऊनि वधिलें दैत्यांसी । शरण तयांसी वासुदेव ॥७॥

॥४६॥
बहु अवतार घेऊनियां युध्दीं । रक्षिलें देवांसी जगन्नाथें ॥१॥
याचूनि वामनें हरिलें बळीतें । देवांचे, देवांतें दिधलें राज्य ॥२॥
उन्मत्त हैहयां परशुराम वधी । सीताकांत वधी दशकंठातें ॥३॥
पुढती धराभार हरील श्रीकृष्ण । अपात्रांचे यज्ञ बुध्द टाळी ॥४॥
संहारील शूद्रराजांसी कलंकी ॥ जन्म -कर्मे ऐशीं जगदीशाचीं ॥५॥
वर्णियेलीं कांहीं असंख्य तीं जरी । वासुदेव धरी हरिचा ध्यास ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP