स्कंध ११ वा - अध्याय २३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२७९॥ ।१-४।
भागवतोत्तम उध्दवासी कृष्ण । सन्मानूनि ज्ञान कथीतसे ॥१॥
दुर्जनांच्या दुष्ट वाक्यांनीं प्रक्षुब्ध । होऊं नेदी चित्त विरळाचि तो ॥२॥
मर्मभेदी शब्दप्रहार दुष्टांचे । बाणाहूनि साचे निकृंतक ॥३॥
ऐकें याविषयी एक बोधप्रद । कथिती इतिहास पुण्यदाई ॥४॥
वासुदेव म्हणे देव जें कथिती । ऐका सहनशक्तिदायक तें ॥५॥

॥२८०॥ ।५-८।
दुष्टशब्दबाणें पीडित असूनि । प्रारब्ध तें मानी ऐसा कोणी ॥१॥
धैर्यवंत यति, गाई गीत तेंचि । म्हणे उध्दवासी ऐकें कृष्ण ॥२॥
अवंति प्रदेशीं धनाढय ब्राह्मण । क्रोधी तो कृपण परम लोभी ॥३॥
असोनि व्यापारी आप्त -स्वकीय वा । अतिथि-अभ्यागतां शब्दानेंही ॥४॥
सन्मानी न कदा, शून्य गृह त्याचें । स्वयेंही कृपणत्वें हाल कंठी ॥५॥
कांता, मुलें तेंवी बांधव, सेवक । करिती द्वेष, दु:ख स्वयें भोगी ॥६॥
वासुदेव म्हणे कृपण भाग्यहीन । प्रिय कोणाही न होई जनीं ॥७॥

॥२८१॥ ।९-१३।
इह-पर भ्रष्ट, धर्मभावहीन । यक्षासम जाण धन रक्षी ॥१॥
यज्ञदेवता त्या अंती होतां क्रुध्द । प्रयासें संचित द्र्व्य गेलें ॥२॥
दायाद, शत्रुही, दैव, काल, नृप । हरिती सर्व वित्त यथाकाल ॥३॥
अंतीं निराश तो सर्वजनत्यक्त । चिंतामग्नचित्त होई बहु ॥४॥
ऐसी दिर्घकाल चिंतितां स्वस्थिति । कंठ रुध्द होती खेदें त्याचे ॥५॥
वैराग्य पुढती तीव्रपणें होई । वासुदेव गाई वृत्त ऐका ॥६॥

॥२८२॥।१४-१६।
होऊनियां आर्त म्हणे देवा, व्यर्थ । कष्टलों द्रव्यार्थ रात्रंदिन ॥१॥
नाहीं संपादिला धर्म, न भोगही । काय अवस्था ही कष्टप्रद ॥२॥
कृपणातें धन नेई नरकासी । इहपर त्यासी दु:खमात्र ॥३॥
अल्पही लोभानें यश-कीर्तिनाश । जेंवी सौंदर्यास कुष्टबिंदु ॥४॥
वासुदेव म्हणे लोभ तोचि पाप । सकल पुण्यनाश, एका लोभें ॥५॥

॥२८३॥ ।१७-२०।
प्राप्ति, वृध्दि, संरक्षण, क्षय, भोगां । श्रम, ताप, चिंता, भ्रम द्र्व्यें ॥१॥
चौर्य, घातपात, असत्य तैं दंभ । काम, क्रोध स्मय, उन्मादही ॥२॥
भेद्म वैर, अविश्वास तैं मत्सर । स्त्री, मद्य, जुगार घातकी हे ॥३॥
पंदचश जाणें अनर्थ, अर्थाचे । यास्तव अर्थातें त्यागी ज्ञाता ॥४॥
माय-बाप, बंधु, दारा, सुह्र्दही । वैरी होती पाहीं द्रव्यास्तव ॥५॥
वासुदेव म्हणे दृढ सहकारी । तेंही जाती दुरी कवडीलागीं ॥६॥

॥२८४॥ ।२१-२४।
अल्पही धनार्थ क्रोध मत्सरें ते । त्यागूनि सख्ख्यातें करिती घात ॥१॥
देवदुर्लभ हे योनी मानवाची । विप्रत्व त्यामाजी लाभतांही ॥२॥
द्रव्यलोभें आत्मघात जे करिती । अशुभ त्यां गति दु:खरुप ॥३॥
असूनियां मर्त्य अमरत्वदाता । देह हा लाभतां अविवेकानें ॥४॥
अनर्थोत्पादक द्रव्यादिकीं प्रेम । करुनि कल्याण गमवी कोण ॥५॥
देवर्षि पितरां, संविभाग आप्तां । अर्पी न तैं भोक्ता स्वयेंही न ॥६॥
अधोगति ऐशा अधमासी लाभे । वासुदेव सांगे भगवदुक्ति ॥७॥

॥२८५॥ ।२५-३०।
वित्त, वय, बल, वेचावें मोक्षार्थ । उन्मादें द्रव्यार्थ वेंचिलें तें ॥१॥
द्रव्यहीन झालो वयही संपलें । लाभ या वृध्दातें काय आतां ॥२॥
मोहिनी कोणाची न कळे धनार्थ । पंडिताही व्यर्थ मूढ करी ॥३॥
मृत्यु आ वासूनि ठाकतां पुढती । धनादि विषयांची धरिली हांव ॥४॥
दीनवत्सलें त्या अर्पूनि विरक्ति । छायाचि कृपेची धरिली शिरीं ॥५॥
दक्षपणे तप आचरीन आतां । परम पुरुषार्था न विटो मन ॥६॥
प्रभुकृपालेशें एकाचि घटींत । पावला खट्‍वांग मोक्षाप्रति ॥७॥
यास्तव मजही देवहो, व्हा साह्य । म्हणे वासुदेव धन्य धन्य ॥८॥

॥२८६॥ ।३१-३९।
यदुश्रेष्ठ म्हणे उध्दवा, यापरी । चिंतूनियां करी ग्रंथिभेद ॥१॥
द्विजश्रेष्ठ होई शांत स्थिर मुनि । संन्यास घेऊनि कंठी काल ॥२॥
होऊनि संमयी यथेच्छ संचरे । अलिप्त असंगें भिक्षा मागे ॥३॥
वृध्द त्या अवधूता अवमानें दुष्ट । देती बहु कष्ट तिरस्कारें ॥४॥
दंड-कमंडलु, माला, वल्कलेंही । ओढूनियां, देती फिरुनि कोणी ॥५॥
नदीतीरी भिक्षा भक्षितां, मस्तकीं । उत्सर्ग करिती दुष्ट कोणी ॥६॥
थुंकती, मारिती, बांधिती, कोंडिती । अपशब्द वदती व्यर्थ बहु ॥७॥
ढोंगी, चोर, झोंड, हटटी तैं निर्लज्ज । म्हणति त्या, असभ्य करुनि चेष्टा ॥८॥
वासुदेव म्हणे विष्ठाही फेंकिती । अंगावरी, येती परी शांत ॥९॥

॥२८७॥ ।४०-४५।
निंदूनि बहुत अपानवायुही । सोडिताती पाहीं वदनीं कोणी ॥१॥
खेळणें करुनि खेळती पंजरी । प्रारब्ध तो परी मानी धैर्ये ॥२॥
न सोडीचि धीर, निज शांतिव्रत । वदला ते अपूर्व गाथा ऐकें ॥३॥
सुख-दु:खदाते नव्हती हे जन । देव, देह, कर्म, ग्रह, काल ॥४॥
संसाराचें मूळ मनचि बोलती । ज्ञाते, सत्य उक्ति तयांची ते ॥५॥
सर्वसामर्थ्य या मनाचेंचि लोकीं । कर्मे सात्विकादि तैसे जन्म ॥६॥
शुध्द मनासवें आत्मा साक्षिरुप । आध्यासें आसक्त होतां बध्द ॥७॥
वासुदेव म्हणे स्वयंभू अलिप्त । परस्पराध्यास दु:खकारी ॥८॥

॥२८८॥ ।४६-५०।
दान, धर्म , यम -नियमादि कर्मे । मनाचा संयमें कृतार्थ तीं ॥१॥
मनोविजयचि सकलांचे साध्य । सर्वश्रेष्ठ योग मनोजय ॥२॥
मनोजय होतां दानादि कासया । न जिंकितां तया, काय दानें ॥३॥
तात्पर्य मन हे बलिष्ठांचा राजा । तयासी जिंकितां स्वयें देव ॥४॥
जिंकिल्यावांचूनि दुर्जय मनासी । शत्रूसवें मैत्री करिती मूढ ॥५॥
कल्पित शरीरा मानूनि मी माझे । बुध्दिहीन, भेदें भ्रमती भवी ॥६॥
वासुदेव म्हणे भेदभ्रमें मूढ । करिती संसार आसक्तीनें ॥७॥

॥२८९॥ ।५१-५४।
सुख-दु:खामूळ जनचि म्हणावे । तरी का बाधावे आत्म्यासी ते ॥१॥
जन ते पार्थिव, अविकारी आत्मा । पीडी देह तयां अशक्य हें ॥२॥
पीडा भोगितील देहचि, कां कोप । जिव्हा चावितील दंत जरी ॥३॥
इंद्रियदेवता कारण मानितां । दोष अंगांगांचा आत्म्यासी न ॥४॥
कारण आत्माचि मानितां अन्यास । दोष काय साच एक आत्मा ॥५॥
नानात्व न तेथें भासचि सकळ । आत्मा तो केवळ निर्विकार ॥६॥
वास्तविक सुखदाता, भोक्ता कोण । सुख-दु:खही न सत्य जनीं ॥७॥
वासुदेव म्हणे ग्रह ते देहासी । पीडितां, अत्म्यासी बाधा नसे ॥८॥

॥२९०॥ ।५५-५६।
जडाजडासीच होई कर्मबाधा । चैतन्या अजडा बाधा काय ॥१॥
आत्मरुप काल कारण गणितां । तेही अशक्यता सहज कळे ॥२॥
अग्नी अग्नीप्रति, शीत वा शीतासी । बाधे, भाषा ऐसी व्यर्थचि की ॥३॥
भेदातीत आत्मा असतां एकमेव । पीडा तेथ काय कवणा कैसी ॥४॥
वासुदेव म्हणे यापरी चिंतिता । कारण न क्रोधा कोठें दिसे ॥५॥

॥२९१॥ ।५७-५८।
कदा, कोठें, केंवी, निर्द्वद्वांत द्वंद । नसेचि संभव कवण्यामार्गे ॥१॥
मिथ्या अहंभावा सुख-दु:खाभास । कदा न आत्म्यास स्पर्श त्याचा ॥२॥
चितितां यापरी मिथ्या सुख-दु:खें । दु:ख न आत्म्यातें कदाकाळी ॥३॥
भिक्षु म्हणे ऐसा अचल सिध्दान्त । शास्त्रर्षिप्रणीत जाणूनियां ॥४॥
मुकुंदाड्‍.घ्रि पद्मीं ठेवूनियां प्रेम । अपार तरेन भवसिंधु ॥५॥
वासुदेव म्हणे आत्म्याचा निश्चय । होतां भय काय संसाराचें ॥६॥

॥२९२॥ ।५९-६२।
उध्दवासी बोले कृष्ण ऐशापरी । वैराग्यें सरली विप्रबाधा ॥१॥
असह्य छ्ळही सोसूनि, लवही । ढळलीच नाही तत्वनिष्ठ ॥२॥
आनंदें करीत पृथ्वीपर्यटन । बोधमय जाण गाथा गाई ॥३॥
यास्तव उध्दवा, सुख-दु:खदाता । मनावीण ताता, नसे कोणी ॥४॥
शत्रु-मित्र उदासीनरुप भव । अविवेकोद्भव भ्रांति जाण ॥५॥
लाडक्या उध्दवा, सर्वभाव मातें । अर्पूनि चित्तातें आंवरावें ॥६॥
गाथा हे भिक्षूची योग हा अपूर्व । गात्या-ऐकल्यास भव न बाधे ॥७॥
वासुदेव म्हणे द्वैत-दु:खबाधा । आत्मबोध होतां कैसी होई ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP